शरद पवार : पैलवानांचा आधार बनलेला नेता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 03:59 AM2020-12-12T03:59:40+5:302020-12-12T04:00:32+5:30
Sharad Pawar Birthday : ज्येष्ठ नेते शरद पवार हे तब्बल १९७० पासून कुस्तीच्या व पैलवानांच्या पाठीशी आधार बनून राहिले आहेत. ते १९७१-७२ ला मुंबई तालीम संघाचे अध्यक्ष होते व आज ते महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत.
- दीनानाथसिंह
ज्येष्ठ नेते शरद पवार हे तब्बल १९७० पासून कुस्तीच्या व पैलवानांच्या पाठीशी आधार बनून राहिले आहेत. ते १९७१-७२ ला मुंबई तालीम संघाचे अध्यक्ष होते व आज ते महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. राज्य मंत्रिमंडळात ते १९७२ ला अर्थ व क्रीडा राज्यमंत्री असताना, महाराष्ट्रातील मल्लांचा संघ तेहरान येथील जागतिक कुस्ती स्पर्धेला निघाला होता. त्या संघात महाराष्ट्र केसरी रघुनाथ पवार, श्यामराव साबळे (तुरंबे) व माझा समावेश होता; परंतु त्यास हरयाणाने हरकत घेतली. त्यामुळे आमचा दौरा रद्द होण्याची वेळ आली.
आम्ही तातडीने पवारसाहेबांना जाऊन भेटलो. त्यांनी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाशी बोलून महाराष्ट्राच्या संघाचा त्यामध्ये समावेश केलाच; शिवाय दौऱ्याचा खर्चही राज्य शासनाकडून त्यांनी केला. अशा अनेक प्रसंगांत, अडचणींमध्ये पवारसाहेब कुस्ती क्षेत्राच्या पाठीशी राहिले आहेत. लाल मातीतील कुस्तीबद्दल त्यांना कायमच आस्था राहिली. कुस्तीतील पहिल्या पिढीतील दिग्गज गणपतराव आंदळकर, श्रीपती खंचनाळे, मारुती माने यांच्यावर त्यांनी अतीव प्रेम केले. हरिश्चंद्र बिराजदार यांच्या आजारपणाचा सर्व खर्च त्यांनी उचलला.
महाराष्ट्रातील अनेक मल्लांच्या आजारपणाच्या काळात त्यांनी पाच-पाच लाखांपर्यंतची मदत केली आहे. मल्ल असोत की अन्य कोणताही कलावंत असो, तो यशोशिखरावर असतो तेव्हा अनेक जण त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतात; परंतु मल्लांच्या उतारवयात आर्थिक स्थिती बेताची असताना त्यांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानायला आमच्याकडे शब्द नाहीत. कुस्ती असो की पैलवानांच्या जीवनातील व्यक्तिगत काही अडचण असो; त्यासाठी पवार साहेबांकडे गेल्यावर काहीतरी मदत नक्की होणार, हा विश्वास कायमच वाटत आला आहे.