बांधाच्या पलीकडे पाहणारे नेते

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 04:13 AM2020-12-12T04:13:19+5:302020-12-12T04:14:18+5:30

Sharad Pawar Birthday : शरद पवार यांनी वीसेक वर्षांपूर्वी सांगितले की, मराठवाड्याचे वाळवंट होते आहे. गेल्या दशकातल्या लागोपाठच्या दुष्काळांनी ते सिद्ध झाले. ग्लोबल वॉर्मिंगबद्दल बोलणारे, धोक्याचा इशारा देणारे ते पहिले राजकारणी.

Sharad Pawar : Leaders looking beyond the dam | बांधाच्या पलीकडे पाहणारे नेते

बांधाच्या पलीकडे पाहणारे नेते

Next

- कृषिरत्न विजय अण्णा बोराडे
(विश्वस्त, मराठवाडा शेती साहाय्य मंडळ, औरंगाबाद) 

शरद पवार यांनी वीसेक वर्षांपूर्वी सांगितले की, मराठवाड्याचे वाळवंट होते आहे. गेल्या दशकातल्या लागोपाठच्या दुष्काळांनी ते सिद्ध झाले. ग्लोबल वॉर्मिंगबद्दल बोलणारे, धोक्याचा इशारा देणारे ते पहिले राजकारणी. शेतीचा पतपुरवठा वाढला, पेरणीपासून भांडवल मिळाले, तरच शेतकऱ्याला खरा आधार मिळेल हे त्यांनीच सांगितले. मंत्री असताना त्यांनी फलोत्पादन अभियानाला नवी ऊर्जा दिली. महाराष्ट्राला पहिल्या वर्षी १६० कोटी दिल्यानंतर हे खर्च कराल तर दुप्पट पैसे देईन, असे जाहीरपणे सांगितले, पण आपली यंत्रणा ते करू शकली नाही.

डॉ.मनमोहन सिंग सरकारची शेतकऱ्यांना ७१ हजार कोटींची कर्जमाफी, हे पवार यांचे कृषिमंत्री म्हणून चर्चेत राहिलेले सर्वांत मोठे योगदान. खरे तर त्यापेक्षा अधिक मोठे योगदान, आयातीसाठी ओळखला जाणारा भारत शेतमालाचा सर्वांत मोठा निर्यातदार बनला हे आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यावेळी शेतकऱ्यांना लाभार्थी बनविण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. शेती कर्जाविषयीचा पुलोद सरकारच्या काळात त्यांनी बंडिंगच्या कर्जाचे ९ कोटी रुपयांचे व्याज माफ करून सुरुवात केली होती. मात्र वारंवार कर्जमाफी हा शेती व शेतकरी संकटातून बाहेर काढण्याचा कायमस्वरूपी उपाय नाही, हे त्यांनी वारंवार बोलून दाखविले.

शेतीवरचा बोजा कमी करायला पाहिजे. दोन किंवा तीन भाऊ असतील, तर एकानेच शेती सांभाळायची, इतरांनी दुसरा काहीतरी उद्योग करून शेतीवरचा आर्थिक ताण कमी होईल, हे पवार  सांगत आले. पवारच बघा, कसं शेतीच्या विरोधात बोलतात, अशी टीका त्यांच्यावर झाली.
१९९०-९१ मध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी रोहयोखाली १०० टक्के अनुदानाची फलोत्पादन योजना आणली, कोरडवाहू फळबागांचा नवा अध्याय लिहिला गेला. तेव्हाही त्यांच्यावर टीका झाली. अलीकडे त्यांनी शेतीची सगळी कामे रोहयोमधून करायला पाहिजेत, असे सांगितले. तेव्हाही टीका झाली, पण टीकाकारांनी मजुरांच्या टंचाईवर उपाय मात्र सांगितले नाहीत. कृषिपंपाची मीटरवर वीजबिलाची पद्धत त्यांनी बंद केल्याला ४० वर्षे झाली. अश्वशक्तीच्या प्रमाणात वीजबिल देण्याचा त्यांचा प्रयोग अनोखा होता. त्याचप्रमाणे, अनुदानावर शेततळ्यांच्या योजनेमुळे कोरडवाहू शेतीला जणू जीवदान मिळाले. महत्त्वाचे म्हणजे, शेततळ्यांमुळे शेतकऱ्यांना पाणी लीटरमध्ये मोजण्याची सवय लागली. थेंबाथेंबाचा हिशेब मांडला जाऊ लागला.

Web Title: Sharad Pawar : Leaders looking beyond the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.