आजचा अग्रलेख - महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील शरदाचं चांदणं!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 04:26 AM2020-12-12T04:26:29+5:302020-12-12T08:02:43+5:30

Sharad Pawar Birthday : श्रीयुत शरदचंद्र गाेविंदराव पवार... महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात अखंडपणे शीतल चांदण्याचे, उत्साहाचे आणि सुसंस्कृत सार्वजनिक जीवनाचा आग्रह धरणारे सातत्यपूर्ण प्रवाहित राहणारे नेतृत्व! या चांदण्याच्या शीतल प्रकाशाचा परिसस्पर्श प्रत्येक क्षेत्रास झाला आहे.

Sharad Pawar in the politics of Maharashtra and the country | आजचा अग्रलेख - महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील शरदाचं चांदणं!

आजचा अग्रलेख - महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील शरदाचं चांदणं!

Next

श्रीयुत शरदचंद्र गाेविंदराव पवार... महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात अखंडपणे शीतल चांदण्याचे, उत्साहाचे आणि सुसंस्कृत सार्वजनिक जीवनाचा आग्रह धरणारे सातत्यपूर्ण प्रवाहित राहणारे नेतृत्व! या चांदण्याच्या शीतल प्रकाशाचा परिसस्पर्श प्रत्येक क्षेत्रास झाला आहे. आजचा आधुनिक महाराष्ट्र आणि देशाच्या नव्या आर्थिक धाेरणाला आकार देण्यात त्यांचा माैलिक वाटा आहे, त्याचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आहे. पन्नास वर्षांहून अधिक काळ लाेकशाहीची मंदिरे असलेल्या विधिमंडळ आणि संसदेत अविरत काम करण्याचादेखील त्यांचाच विक्रम आहे. त्यांच्या अंगी असलेल्या असंख्य गुणांचा अभिमान मराठी माणसांनी आपल्या काेंदणात जपून ठेवावा, असा आहे.

महाराष्ट्राचे नेतृत्व करताना समाजातील प्रत्येक  घटकाची काळजी वाहणारे त्यांचे नेतृत्व आहे. चार वेळा महाराष्ट्राचे नेतृत्व करताना त्यांनी स्वीकारलेली धाेरणे आणि घेतलेले धाडसी निर्णय महाराष्ट्राला फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराने वाटचाल करण्यास बळ देत गेले. राेजगार हमीचा कायदा, धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा कायदा, नव्या औद्याेगिक वसाहती स्थापन करून मराठी माणसाला उद्याेगी बनविण्याचा धडाका, महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण, मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार, लातूर-किल्लारीच्या भूकंपानंतरचे पुनर्वसनाचे जगाने नाेंद घेण्याजाेगे कार्य, सहकार चळवळीला साथ, फळबाग शेतीवाढीसाठी याेजना सुरू करणारे जनक, अशी असंख्य कामे नाेंदविता येतील. सामाजिक न्याय, महिलांचे सबलीकरण, औद्याेगिक विकास, शेती सुधारणा, शिक्षणाची संधी, राेजगारवाढीसाठीचे प्रयत्न करीत राष्ट्रीय विचार आणि जागतिक पातळीवरील बदलांचे भान त्यांनी कायम ठेवले. महाराष्ट्र आज जाे विविध क्षेत्रांत आघाडीवर आहे, त्यात अनेक नेत्यांनी आपल्या अथक परिश्रमांनी भर घातली असेल; त्यात आघाडीवरचे नाव शरदचंद्रजी पवार आहे.


गेल्या अडीच दशकांपासून त्यांनी राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावली. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी समर्थपणे सांभाळलीच. सर्वांत माेठी कामगिरी त्यांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून केली. सलग दहा वर्षे देशाच्या कानाकाेपऱ्यांत जाऊन तेथील शेती उत्पादन कसे वाढेल, याचा ध्यास घेतला हाेता. एकेकाळी अन्नधान्य आयात करून काेट्यवधी लाेकांची दाेन वेळच्या जेवणाची साेय करावी लागत हाेती. अशा भारत देशाच्या वाढत्या लाेकसंख्येला पुरेल इतके उत्पादन करून जागतिक बाजारपेठेत भारत आता अन्नधान्य, फळे-भाज्या निर्यात करणारा देश बनविण्यात शरदचंद्र पवार यांचाच सिंहाचा वाटा आहे. शेतकऱ्यांची मानसिकता बदलण्यासाठी त्यांना जगभरातील शेतीच्या ज्ञानाचे भांडार उपलब्ध करून दिले. राज्यकर्त्याची कर्तव्ये काेणती असतात आणि लाेककल्याणकारी व्यवस्थेमध्ये ती कशी पार पाडायची असतात, याचा वस्तुपाठ त्यांनी घालून ठेवला आहे.

राजकीय मतभेद किंवा अभिनिवेश बाजूला ठेवून सर्व राज्यांना कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मदत करण्याची भूमिका त्यांनी नेहमी घेतली. याशिवाय लातूर भूकंप पुनर्वसनाच्या अनुभवाने समृद्ध झालेल्या पवारसाहेबांनी स्वत:हून गुजरातमधील कच्छ भूकंपाच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेतली. १९९३ मध्ये बाॅम्बस्फाेटाने मुंबई महानगरी हादरली हाेती तेव्हा त्यांनी केवळ चाेवीस तासांत ते महानगर पूर्ववत प्रवाही केले. एका खेड्यात जन्मलेले शरद पवार यांनी शहरांच्या विकासकामांतील गती ओळखली हाेती; म्हणूनच मुंबईकरांना दिलासा दिला आणि अशा हल्ल्यांचा आम्ही भारतीय लाेक धीराेदात्तपणे मुकाबला करू शकताे, याचा विश्वास दिला.

राजकारणाव्यतिरिक्त क्रीडाक्षेत्रात त्यांनी उत्तुंग कामगिरी केली. भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाची यशस्वी जबाबदारी स्वीकारली. कुस्ती, कबड्डीसारख्या भारतीय खेळांना प्राेत्साहन दिले. मराठी भाषेत इतर भाषांतील साहित्यकृती कशा येतील, यासाठी प्रयत्न केले. अशा या धीराेदात्त नेतृत्वावर अनेक निर्णयांवरून टीका झाली, आराेप झाले, हेटाळणी करण्यात आली; पण ते कधी डगमगले नाहीत. त्यांनी विचारांशी तडजाेड कधी केली नाही. यासाठी त्यांचे नेतृत्व हे सातत्याने शीतल चांंदण्याचा प्रकाश देत सर्वांना प्रेरक ठरले आहे. आज त्यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त ‘लाेकमत परिवारा’तर्फे हार्दिक हार्दिक शुभकामना!

Web Title: Sharad Pawar in the politics of Maharashtra and the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.