शरद पवार : तंत्रज्ञान, विज्ञानप्रेमी पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 04:22 AM2020-12-12T04:22:18+5:302020-12-12T04:22:47+5:30

Sharad Pawar Birthday : शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाजाचं मॉडेल मांडणारा ‘सुपर कॉम्प्यूटर’ हवा होता, पण अमेरिकेने तो देण्यास नकार दिला आणि मग आपणच तो विकसित केला. पुढं या ‘सुपर कॉम्प्यूटर’चा उपयोग राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापनासाठी कसा करता येईल, यासाठी आग्रही असलेले पवार मी पाहिले.

Sharad Pawar: Technology, science lover Pawar | शरद पवार : तंत्रज्ञान, विज्ञानप्रेमी पवार

शरद पवार : तंत्रज्ञान, विज्ञानप्रेमी पवार

Next

- विजय भटकर
(ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ) 

ज्येष्ठ नेते शरद पवार ऐंशीवा वाढदिवस साजरा करत आहेत. आपल्या संस्कृतीत आगळंवेगळं महत्त्व असलेल्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याचाही योग त्यांच्या आयुष्यात लवकरच येणार आहे. प्रथम मी त्यांना निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो. जवळपास ३०-३२ वर्षे झाली त्यांच्या आणि माझ्या पहिल्या भेटीला. त्यावेळी मी त्रिवेंद्रममध्ये संशोधन करत होतो. १९८७ला पुण्यात आलो आणि पुढच्याच वर्षी गुढीपाडव्याला सी-डॅकची स्थापना झाली. या संस्थेच्या कामानिमित्तानेच पवार आणि माझी पहिली भेट झाली. सी-डॅकच्या माध्यमातून संगणक साक्षरता आणण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले होते. आयटी क्षेत्र नुकतेच बाळसे धरू लागले होते. त्यावेळी पवार आवर्जून सी-डॅकमध्ये येत. जिथे वेगळे काम चालते, नव्या संकल्पनांचा वेध घेतला जातो, तिथे पवार जातात. इथले तंत्रज्ञान ग्रामीण भागात घेऊन जाता येईल का, हा सी-डॅक प्रयोगशाळेत येण्याचा त्यांचा उद्देश असे.

अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना पवार विरोधी पक्षनेते होते. त्याही वेळी ते अचानक प्रयोगशाळेत आल्याचे आठवते. अनेक शंका ते विचारायचे. संगणकाचा वापर मराठीत कसा करता येईल, छोट्या शाळांमध्ये संगणक कसा नेता येईल, गावखेड्यात संगणक साक्षरता कशी आणता येईल, हे त्यांचे प्रश्न असायचे. आयटीच्या जोरावर ज्ञानाधिष्ठित क्रांती घडवून आणण्यासाठी संगणक साक्षरता वाढविणं गरजेचं आहे, हे ज्यांनी जाणलं त्या द्रष्ट्या नेत्यांमध्ये पवार यांचा उल्लेख करावा लागतो.

पवार मला हेलिकॉप्टरमध्ये बसवून बारामतीला घेऊन गेले होते. जाताना खाली पाहून ते सांगायचे की, या ठिकाणी अमकी वस्ती...तिथं इतकी गायीगुरं आहेत वगैरे. या मंडळींत परिवर्तन घडवून आणण्यासाठी मला बारामतीला संगणक घेऊन जायचा आहे. तेव्हा त्यांचं ‘बारामतीप्रेम’ मला दिसायचं. बारामतीला इंटरनेट कनेक्शन घेऊन जाण्यासाठी त्यांनी केलेला आटापिटा मी पाहिला आहे. टेलीकॉम क्षेत्राची प्रगती नुकतीच सुरू झाली होती. वाजपेयींच्या मंत्रिमंडळातील दूरसंचारमंत्र्यांना फोन लावून त्यांनी ते काम करुन घेतलं. ‘ईटीएच ते बारामती’ असे इंटरनेट कनेक्शनचे काम पवार यांनी कमी वेळेत करवून घेतलं. राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीमुळं संगणकक्रांती सुरू झाली. त्यावेळी शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाजाचं मॉडेल मांडणारा ‘सुपर कॉम्प्यूटर’ हवा होता, पण अमेरिकेने तो देण्यास नकार दिला आणि मग आपणच तो विकसित केला. पुढं या ‘सुपर कॉम्प्यूटर’चा उपयोग राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापनासाठी कसा करता येईल, यासाठी आग्रही असलेले पवार मी पाहिले. अमेरिकेच्या दौऱ्यावर पवार गेले, तर त्याही वेळी ते संगणकाचे अत्याधुनिक ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करत. इंटेलसारख्या कंपन्यांच्या टॉप अधिकाऱ्यांना ते नावानिशी ओळखत.

कृषिमंत्री असताना पवार यांना अनेकदा भेटलो. त्यांना अनेक राष्ट्रीय नेत्यांचे फोन यायचे. तेव्हा जाणवायचे की, त्या सर्वांसोबत त्यांचे त्यांचे व्यक्तिगत मैत्रीचे नातेसंबंध आहेत. सर्वांना ते जवळचे वाटतात. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे आकलन असणारे, व्यवहार चतुर, पंडित नेहरूंप्रमाणे विज्ञान-तंत्रज्ञानाच्या साह्याने तळागाळातल्या माणसांचे जीवन बदलवण्याची आस्था बाळगणारे शरद पवार भारताचे नेतृत्व करू शकतात, असं मला नेहमी वाटतं.
(शब्दांकन - सुकृत करंदीकर)

Web Title: Sharad Pawar: Technology, science lover Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.