शरद पवार यांनी मातीतला खेळ जगभरात नेला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 04:03 AM2020-12-12T04:03:20+5:302020-12-12T04:03:49+5:30
Sharad Pawar Birthday : शरद पवार यांनी नेहमीच देशी खेळांना प्राेत्साहन दिले. १९८० मध्ये ते अखिल भारतीय कबड्डी असाेसिएशनचे अध्यक्ष हाेते. तेव्हापासून कबड्डीचा देशभरात, जगभरात प्रसार व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न राहिले आहेत.
- शांताराम जाधव
(अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू)
शरद पवार यांनी नेहमीच देशी खेळांना प्राेत्साहन दिले. १९८० मध्ये ते अखिल भारतीय कबड्डी असाेसिएशनचे अध्यक्ष हाेते. तेव्हापासून कबड्डीचा देशभरात, जगभरात प्रसार व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न राहिले आहेत. त्यांनी प्रथम आशियाई देशांमध्ये ताे रुजविण्याचा प्रयत्न केला. बांगलादेश, नेपाळ, थायलंड, भूतान आदी देशांमध्ये स्पर्धा आयाेजित केल्या.
तेथील संघांना भारतात निमंत्रित केले. त्यांच्यामुळेच कबड्डीचा आशियाई स्पर्धांमध्ये समावेश झाला. १९९० मध्ये सर्वप्रथम बीजिंग एशियाडमध्ये कबड्डी दिसली. जपानच्या एका राजकीय दाैऱ्यादरम्यान तेथील टाेग्यानाे शहराच्या महापाैरांशी चर्चा करून त्यांनी कबड्डीबाबत माहिती दिली. याचे फलित म्हणून १९८० मध्ये भारताचे महिला व पुरुष संघ जपानला गेले. त्यामध्ये मी सहभागी हाेताे. टाेग्यानाे शहरातील शाळांमध्ये आम्ही कबड्डीचे सादरीकरण केले. पुढे जपानमध्ये कबड्डीचा प्रसार झाला. मातीतील खेळांचा प्रसार कसा हाेईल, ताे जगभरात कसा पाेहाेचेल, याबाबत पवार नेहमी सजग असतात.
कबड्डी ऑलिम्पिकमध्ये पाेहाेचावी, हे ध्येय ठेवून त्यांनी खेळाडू घडविले, त्यांना प्राेत्साहन दिले. अगदी जिल्हा पातळीवरील स्पर्धांच्या आयाेजनावरही ते लक्ष ठेवून असतात. खेळाडूंना नाेकऱ्या मिळाव्यात, त्यांचे करिअर घडावे, यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले.
लहान-माेठ्या संस्थांना कबड्डीच्या प्रचार-प्रसारासाठी प्राेत्साहन दिले. आर्थिक बळ दिले. त्यांच्यामुळेच आमच्यासारखे सामान्य कुटुंबातील खेळाडू नाव कमावू शकले. एकेकाळी केवळ एका टी-शर्टवर आम्ही स्पर्धा गाजविल्या. पण, आज गुणवान खेळाडूला एका सिझनसाठी दीड काेटी रुपये मिळतात. हे केवळ पवार यांच्यामुळे शक्य झाले आहे. आज जगभरातील ३५ देशांमध्ये हा खेळ पाेहाेचला आहे.