शरीफ आणि शरीफजादे!

By Admin | Published: December 30, 2014 11:14 PM2014-12-30T23:14:27+5:302014-12-30T23:14:27+5:30

शेजाऱ्यांनाच चावावेत म्हणून स्वत:च्या घरात भरपूर साप पाळायचे़... त्यांना मोठं करायचं... यासारखा कोणताच मूर्खपणा नाही़ कारण शेजारी आहे, की आपल्याला पाळणारा मालक, असं साप बघत नाही़

Sharif and Sharif! | शरीफ आणि शरीफजादे!

शरीफ आणि शरीफजादे!

googlenewsNext

शेजाऱ्यांनाच चावावेत म्हणून स्वत:च्या घरात भरपूर साप पाळायचे़... त्यांना मोठं करायचं... यासारखा कोणताच मूर्खपणा नाही़ कारण शेजारी आहे, की आपल्याला पाळणारा मालक, असं साप बघत नाही़ त्याच्या जिवाशी खेळणाऱ्या प्रत्येकाला तो डंख करतोच़ पाकिस्तानने हाच मूर्खपणा गेल्या अनेक वर्षांपासून चालवला आहे़ शेजारी देशाला (म्हणजेच भारताला) कायम दहशतीखाली ठेवण्यासाठी, त्यांच्या सुरक्षा यंत्रणा कायम अस्थिर ठेवण्यासाठी पाकिस्तानने गेल्या काही वर्षांमध्ये असे अनेक साप पाळले़ त्यांना मोठे केले़ पण तेच साप आता पाकिस्तानच्या जिवावर उठले आहेत, त्यांनाच चावत आहेत़ पेशावर हल्ल्यानंतर पाकिस्तानला आपण पाळलेले दहशतवादी साप किती घातक आहेत, याचा साक्षात्कार झाला आहे.
पाकिस्तानमध्ये ३५ हून अधिक अशा दहशतवादी संघटना आहेत, ज्यांनी त्यांच्याच भूमीत गेल्या दहा वर्षांमध्ये सुमारे ५५ हजार लोकांचा बळी घेतला आहे. गेल्या तीन दशकांचा इतिहास पाहिला, तर पाकिस्तानने दहशतवादी संघटनांना कसे मोठे होऊ दिले, हे स्पष्टपणे लक्षात येते. १९८०च्या दशकात पाकिस्तानमध्ये हरकत-उल-जिहाद अल इस्लामी अर्थात हुजी, हरकत-उल-मुजाहिद्दीन आणि हिज्बुल मुजाहिद्दीन या संघटना सक्रिय होत्या. यातील हुजी आणि हिज्बुल मुजाहिद्दीन या संघटना अजूनही धुमाकूळ माजवत आहेत. त्यानंतर १९९०च्या दशकात उदयास आली ती आतापर्यंत सर्वाधिक घातक ठरलेली लष्कर-ए-तय्यबा. या संघटनेचे सर्वांत मोठे टार्गेट ठरली ती अमेरिका. या संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला मारण्यात अमेरिकेला यश आले असले, तरी ही संघटना समूळ नष्ट करणे या महासत्तेलाही जमले नाही़ त्यासोबतच जमियत उल मुजाहिद्दीन, मुताहिदा जेहाद कौन्सिल, तहरिक उल मुजाहिद्दीन, अल बद्र आणि तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनांनी धुमाकूळ घालणे सुरू केले. २००० नंतर जैश-ए-मोहम्मदचा जन्म झाला. या साऱ्या कुरापतखोर दहशतवादी संघटनांना पाठीशी घालण्याचे काम वेळोवेळी पाकिस्तानमधील तत्कालिन सरकारांनी केले आहे.
मुंबईत १९९३ साली झालेला हल्ला, संसदेवर झालेला हल्ला, मुंबईवरील २६/११ चा हल्ला या साऱ्या कुरापती पाकिस्तानने पाळलेल्या दहशतवादी संघटनांनीच केल्याचे तपासाअंती सिद्ध झाले आहे. पाकिस्तानने हाफीज सईदसारख्या म्होरक्याला मोकाट सोडून आपण दहशतवाद्यांच्या पाठीशी असल्याचेच अनेकदा दाखवून दिले आहे. पेशावर हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दहशतवाद्यांविरोधात लढा उभारण्याची मोठी गर्जना केली. पण दुसऱ्याच दिवशी मुंबई हल्ल्यामागचा मास्टरमाइंड झकीउर रहेमान लख्वीची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर लाजेखातर पाकिस्तानने त्याला पुन्हा ताब्यात घेतले. तालिबानी संघटनांच्या तळांवर हल्ले सुरू केले. शिवाय फाशीची बंदी उठवून दहशतवाद्यांना फासावर लटकवणेही सुरू केले. सहा दहशतवाद्यांना फासावर लटकवल्यानंतर आता आणखी ५०० दहशतवाद्यांना फासावर लटकवणार असल्याचे जाहीर करून टाकले. तसेच, दहशतवाद्यांवरील खटले लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी लष्करी न्यायालय सुरू करण्याची घोषणाही केली. ही सर्व पावले म्हणजे पाकिस्तान सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. कारण ‘गुड तालिबानी’ म्हणत पाळलेला हा साप आपल्याच अंगावर धावून आल्यानंतर त्याला मारण्यासाठी काठी शोधण्यासाठी धावाधाव करण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळेच पाक सरकारने सुरू केलेल्या कारवाईतून फारसे काही निष्पन्न होईल, असे वाटत नाही. कारण ही कारवाई म्हणजे पेशावरमध्ये शाळेवर झालेल्या हल्ल्याची क्षणिक प्रतिक्रिया आहे. दीडशेहून अधिक तालिबानी दहशतवाद्यांना ठार मारल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी केला आहे. मात्र, ही केवळ एका दहशतवादी संघटनेवरील कारवाई आहे. पण, तालिबानसारख्या आणि त्याहीपेक्षा भयंकर दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये धुमाकूळ माजवत आहेत, यांच्यावर कारवाई करायची असेल, तर पाकिस्तानला आपली लष्करी शक्ती खर्ची घालावी लागेल.
ता.क. - पेशावर हल्ला हा भारतासाठी मोठा धडा आहे. आपल्या देशात छुप्या पद्धतीने वावरणारे दहशतवादी आणि जिहादसाठी तयार होणारे तरुण ‘साप’ वेळीच ठेचावे लागणार आहेत. आसाममध्ये बोडो अतिरेक्यांनी ७५ हून अधिक आदिवासींचे बळी घेतले. या कारवायांना प्रत्युत्तर देण्यास उशीर लावून, भारत सरकारही ‘शरीफजादे’च ठरले आहे. आता या भारतीय शरीफजाद्यांनी फक्त ‘गुड बोडो अँड बॅड बोडो’ किंवा ‘गुड नक्षल अँड बॅड नक्षल’ असेच म्हणणे बाकी राहिले आहे.

पवन देशपांडे

(लेखक हे लोकमतच्या मुंबई आवृत्तीचेउपमुख्य उपसंपादक आहेत.)
 

Web Title: Sharif and Sharif!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.