मध्य आशियाशी दोस्तीने शरीफ भेटीवर झाकोळ

By admin | Published: July 13, 2015 12:25 AM2015-07-13T00:25:45+5:302015-07-13T00:25:45+5:30

गेला आठवडा भारतासाठी शांतपणे केलेल्या मुरब्बी राजनैतिक मुत्सद्दीगिरीचा ठरला. या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उझबेकिस्तान, कझाखस्तान, तुर्कमेनिस्तान,

Sharif's visit to Central Asia laughs | मध्य आशियाशी दोस्तीने शरीफ भेटीवर झाकोळ

मध्य आशियाशी दोस्तीने शरीफ भेटीवर झाकोळ

Next

विजय दर्डा
(लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)
गेला आठवडा भारतासाठी शांतपणे केलेल्या मुरब्बी राजनैतिक मुत्सद्दीगिरीचा ठरला. या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उझबेकिस्तान, कझाखस्तान, तुर्कमेनिस्तान, किरगिझस्तान आणि ताजिकिस्तान या मध्य आशियातील पाच देशांचा दौरा केला. याआधी मोदी शांघाय सहकार्य परिषदेच्या शिखर परिषदेसाठी रशियातील उफा येथे गेले. तेथे त्यांची पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी भेट झाली. मोदी-शरीफ भेट सुमारे वर्षभराने आणि भारताने कठोर भूमिका घेतल्यानंतर प्रथमच झाल्याने द्विपक्षीय संबंधांतील तणाव निवळण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल या दृष्टीने साहजिकच प्रसिद्धी माध्यमांच्या मथळ्यांचा विषय ठरली; पण मोदींच्या त्यानंतरच्या मध्य आशियाई देशांच्या भेटीने जो संदेश दिला गेला आहे तो दुर्लक्षित करणे पाकिस्तानला परवडणारे नाही. तुम्ही तुमचे मार्ग सुधारा व जागतिक राजनैतिक संबंधांच्या मुख्य प्रवाहात सामील व्हा; अन्यथा तुम्हाला समज येण्याची वाट न पाहता आम्ही मध्य आशियाशी मैत्री करू, असा मोदींच्या या दौऱ्याचा स्पष्ट संदेश आहे.
जागतिक पातळीवर संबंध प्रस्थापित करताना भारताच्या परराष्ट्र धोरणात दोन महत्त्वाचे मुद्दे आकाराला येत आहेत- दहशतवादाचा बीमोड व आर्थिक विकास. मोदींचा मध्य आशियाई देशांचा दौराही हेच लक्ष्य समोर ठेवून झाला. हे पाचही मध्य आशियाई देश मुस्लिम आहेत व नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आहेत. अमेरिकेच्या पुढाकाराने मित्रदेशांनी मोठी लष्करी कारवाई करूनही इराक व सिरियामध्ये ‘इस्लामिक स्टेट’चा (इसिस) प्रभाव वाढत आहे. या विस्तारवादी कट्टर इस्लामी दहशतवादाची झळ पोहोचण्याची भीती या मध्य आशियाई देशांनाही आहेच. विविध देशांमध्ये मोठ्या लष्करी मोहिमा राबवून अमेरिकेला जे जमले नाही ते भारताने करून दाखविले आहे. ते म्हणजे मोठ्या संख्येने असलेल्या मुस्लिम अल्पसंख्य समाजास कट्टर इस्लामी धर्मवेड व दहशतवादी विचारांपासून दूर ठेवण्यात भारताला यश आले आहे. भारताचा हा अनुभव या मध्य आशियाई देशांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असल्याने शांतता आणि स्थैर्यासाठी या देशांसाठी भारत हा स्वागतार्ह मित्र ठरणार आहे. या पाचही देशांच्या नेत्यांशी चर्चा करून मोदींनी या सहकार्याची कवाडे अलगदपणे उघडली आहेत. त्याचा दूरगामी लाभ नक्कीच टिकाऊ स्वरूपाचा असणार आहे.
या पाचही देशांना आपल्या प्रभावाखाली आणण्यासाठी रशिया व चीन यांच्यात स्पर्धा सुरू आहे; पण भारताकडे असलेला अनुभव त्यांच्यापाशी नाही. एक तर रशिया ही अस्ताला जात असलेली महासत्ता आहे व दुसरीकडे चीन ही उदयाला येत असलेली मोठी शक्ती असली तरी त्यांनी आधीच अन्य उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित केले आहे. एकेकाळी हे पाचही देश अविघटित सोव्हिएत संघाचा भाग होते. रशियाचा प्रभाव कमी होत असताना दुसरीकडे चीन आर्थिक वर्चस्व प्रस्थापित करू पाहत आहे. चीनकडून दाखविल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांच्या विकासाचे गाजर नाकारणे या मध्य आशियाई देशांना नाकारणे शक्य नसले, तरी चीनशी जवळीक करताना त्यांच्यातील अस्वस्थता लक्षात येण्यासारखी आहे. या उलट साधनसंपत्तीच्या दृष्टीने भारताच्या मर्यादा असल्या, तरी विकसित तंत्रज्ञान, व्यापारी कौशल्य आणि मुख्य म्हणजे एकाधिकारशाही नसलेली शासनव्यवस्था यामुळे भारत हा पसंतीचा व्यापारी व रणनीतीचा भागीदार ठरणार आहे.
रशिया विरुद्ध चीन अशा या राजनैतिक वर्चस्वाच्या स्पर्धेत तिसरा प्रतिस्पर्धी म्हणून भारताकडे आणखीही एक पारंपरिक जमेची बाजू आहे. ती म्हणजे १९७० च्या दशकापासूनचे भारत व रशियाचे मैत्रीपूर्ण संबंध. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली घट्ट विणलेले हे भारत-रशिया मैत्रीचे बंध काळाच्या ओघातही टिकून राहिले आहेत. खरे तर उफा येथे झालेल्या बैठकीत रशियाच्या मध्यस्थीनेच भारताला शांघाय सहकार्य परिषदेचे (एसओसी) सदस्य करून घेण्यात आले; पण येथेही चीनने संतुलनाची खेळी खेळली आणि पाकिस्तानलाही या संघटनेत घेण्यात आले. मात्र, हा सौदाही फायद्याचाच म्हणावा लागेल. ‘सार्क’सारख्या क्षेत्रीय संस्थेप्रमाणे येथेही पाकिस्तानने सुरळीत चाललेल्या गाड्यात खोडा घालण्याची खेळी केली तर ती अंगाशी येऊन पाकिस्तान आणखी एकाकी पडेल.
म्हणूनच मध्य आशियातून नैसर्गिक वायू दक्षिण आशियात आणण्यासाठी प्रस्तावित केलेली ‘तापी’ (तेर्कमेनिस्तान- अफगाणिस्तान- पाकिस्तान- इंडिया) पाईपलाईन मूर्त स्वरूपात येण्याची आशा आहे. पृथ्वीच्या या भागात ऊर्जा साधनांचे एक चतुर्थांश साठे आहेत. म्हणूनच भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी हा स्वस्त व परवडणारा पर्याय ठरू शकतो. अशा प्रकारे पंतप्रधान मोदी यांनी पारंपरिक ठिकाणांवरून लक्ष दूर करून मध्य आशियाई क्षेत्राकडे वळणे यामुळे आपल्या परराष्ट्र धोरणात निर्माण झालेले असंतुलन दूर झाले आहे; पण या देशांच्या मैत्रीचे दूरगामी व शाश्वत लाभ पदरी पाडून घेण्यासाठी पंतप्रधानांच्या या एका भेटीनंतरही बरेच काही करावे लागेल. या दौऱ्याने मार्ग मोकळा झाला आहे. आता त्यावरून पुढे जात घट्ट मैत्रीची भक्कम इमारत उभी करण्याचे काम कष्टपूर्वक करावे लागेल.
पाकिस्तानकडून मोठ्या आशा बाळगून बसण्यातही काही अर्थ नाही. पाकिस्तान हा वर्गातील व्रात्य विद्यार्थीच राहणार आहे; पण त्याला वर्गातून हाकलून देणे शक्य नसल्याने कोणतीही अपेक्षा नसली तरी त्याच्याशी संवाद साधत राहणे भाग आहे. त्यांना हवे तर दिलेली वचने मोडू द्यात, सीमेच्या पलीकडून गोळीबार करू द्यात; पण या चुका भारी पडतील याची त्यांना जाणीव होईल अशी ध्येयधोरणे ठेवणे हेच आपल्याला करावे लागेल. दहशतवाद संपुष्टात आणण्यात पाकिस्तानकडून खरोखरीच मदतीची अपेक्षा ठेवणे म्हणजे वस्तीतील गुंडांच्या म्होरक्यालाच चोर व पाकीटमारांना आवर घालायला सांगण्यासारखे होईल. भारताशी सतत संघर्षाचा पवित्रा घेऊन त्यात अपयशी होण्यापेक्षा सहकार्याचा मार्ग अधिक हितावह आहे याची पक्की जाण पाकिस्तानी आयएसआयच्या धुरिणांना मिळेल यासाठी भारतीय सुरक्षा दले नक्कीच परिणामकारक धोरण स्वीकारतील. इस्लामाबादमधील राजकीय नेतृत्वाला हे शहाणपण काहीसे आलेले दिसत असले, तरी तेथील शक्तिशाली लष्करप्रमुखांच्या डोक्यात वेगळेच वारे आहे.
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
स्वीत्झर्लंडच्या मार्टिना हिंगिसला जोडीला घेऊन सानिया मिर्झाने विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविण्याचा क्षण खरोखरीच खूप आनंददायी होता. भारतातील महिला टेनिसपटूंच्या दृष्टीने ही सर्वोत्तम कामगिरी आहे व त्यावरून क्रीडा क्षेत्रात याहूनही धवल कामगिरी केली जाऊ शकते याची प्रचीतीही त्यावरून येते. अनेक गेम हातचे गेल्यानंतरही सानिया व मार्टिनाने हताश न होता कोर्टवरील जोरदार फटके व कणखर मानसिकता या जोरावर विम्बल्डनच्या इतिहासात आपले नाव नोंदविले.

Web Title: Sharif's visit to Central Asia laughs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.