शशी थरुरांचे चुकले काय ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 01:05 AM2018-07-14T01:05:20+5:302018-07-14T01:06:12+5:30
हिंदू पाकिस्तान हा शब्द प्रथम भाजपच्या अरुण शौरींनी व नंतर त्याच पक्षाच्या राम जेठमलानी या दोन माजी मंत्र्यांनी वापरला. आता तो काँग्रेसच्या शशी थरुर यांनी वापरला एवढेच.
हिंदू पाकिस्तान हा शब्द प्रथम भाजपच्या अरुण शौरींनी व नंतर त्याच पक्षाच्या राम जेठमलानी या दोन माजी मंत्र्यांनी वापरला. आता तो काँग्रेसच्या शशी थरुर यांनी वापरला एवढेच. पाकिस्तान हा स्वत:ला मुस्लीम राष्ट्र म्हणविणारा देश आहे. संघ आणि त्याच्या परिवारातले लोक जेव्हा हिंदू राष्ट्र म्हणतात तेव्हा त्यांच्याही मनात भारताला हे ‘हिंदूंचे राष्ट्र’ बनविण्याचाच विचार असतो.(शशी थरुर यांनी या दोन्ही विचारातील धर्मराष्ट्राचा मुद्दा अधोरेखित केला आहे एवढेच). भारतातील कोणत्याही अल्पसंख्य वर्गाला सुखासमाधानाने जगू न देण्याचा विडा उचललेल्या संघ परिवाराने त्याला एका धर्माचे राष्टÑ बनविण्याचा विडा उचलला आहे. तो इरादा ‘पाकिस्तान हे मुस्लीम राष्टÑ’ बनविण्याच्या मुस्लीम लीगच्या जुन्या इराद्याहून फक्त धर्माच्या नावाबाबत वेगळा आहे. त्यासाठी संसदेत थरुर आणि राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपने एवढा गदारोळ उठविण्याचे कारण नाही. प्रत्यक्षात भारताला ‘हिंदू राष्टÑ’ म्हणायला पं. नेहरूंएवढेच सरदार पटेलही राजी नव्हते. बी.एम. बिर्ला या कोलकत्याच्या उद्योगपतीला लिहिलेल्या पत्रात पटेलांनी ‘भारताला हिंदू राष्टÑ म्हटले तर काश्मीरचे काय, पंजाबचे काय, अतिपूर्वेकडील राज्यांचे आणि केरळचे काय’ असा प्रश्न विचारला होता. साऱ्या वर्गांना सोबत घेऊन राष्टÑ पुढे न्यायचे तर त्यात सर्वधर्मसमभाव राखणेच आवश्यक आहे असे ते त्या पत्रात म्हणाले आहेत. आजच्या जगातली ९३ राष्टÑे स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणारी आहेत. त्यात युरोप व आफ्रिकेसह, आशियातील बहुसंख्य देशांचा समावेश आहे. त्यातील अनेक देशात ख्रिश्चनांची बहुसंख्या आहे. तरीही ती राष्ट्रे स्वत:ला ख्रिस्ती राष्टÑ म्हणवत नाहीत. उलट कोणताही कायदा ख्रिस्ती धर्माच्या प्रभावापासून मुक्त राहिला पाहिजे याची ते डोळ्यात तेल घालून खबरदारी घेतात. इंग्लंडचे स्वत:चे चर्च आहे आणि इंग्लंडची राणी त्याची प्रमुख आहे. तरीही इंग्लंड हे सेक्युलर राष्टÑ आहे. जगातील कोणताही देश आता एकधर्मी, एकभाषी वा एका संस्कृतीचा राहिला नाही. नाही म्हणायला पाकिस्तान, अफगाणिस्तान, सिरिया व सौदी अरेबिया ही राष्ट्रे स्वत:ला मुस्लीम राष्टÑे म्हणवितात. त्यात ज्यू धर्माच्या इस्रायलचाही समावेश आहे. पण अशी राष्टÑे बोटावर मोजता यावी एवढी थोडी आहेत. भारतात अल्पसंख्याकांची संख्या २० टक्क्यांहून अधिक आहे. प्रत्यक्षात ती २६ कोटींहून मोठी आहे. ही संख्या अमेरिका, रशिया व जपानहूनही मोठी आहे. तिचे वेगळे अस्तित्व नाकारून तिला ‘हिंदू राष्टÑ’ म्हणायला लावणे हाच मुळात एक धार्मिक अन्याय आहे. ‘तुम्ही जेव्हा भारताला हिंदू राष्टÑ बनविण्याची भाषा बोलता तेव्हा तुम्हाला भारताला हिंदू पाकिस्तान बनवायचे असते’ ही शशी थरुर यांची भाषा यासंदर्भात समजून घेतली पाहिजे. एकधर्मी देशांची कल्पना आता इतिहासजमा झाली आहे. तिला वर्तमानात स्थान नाही. मात्र वर्तमान मागे नेऊन त्यावर इतिहास लादायचा ज्यांचा प्रतिगामी प्रयत्न आहे त्यांना या बदलाशी काही देणेघेणे नाही. ते अजूनही वेदांच्या, उपनिषदांच्या, मनुस्मृतीच्या आणि रामायण व महाभारताच्या काळात वावरतात. त्याच काळाचे गोडवे गातात. त्यांना देशांच्या स्वातंत्र्यलढ्याशी कर्तव्य नसते व आताच्या संवैधानिक भारताविषयीही त्यांना आस्था नसते. अशी माणसे शशी थरुरांवर रागावणारच. ‘मोदींना मत न देणाºयांनी पाकिस्तानात चालते व्हावे’, ‘गाईचे रक्षक नाहीत ते देशद्रोही आहेत’ किंवा ‘या देशात राहायचे असेल तर आम्ही सांगू तीच भाषा तुम्ही बोलली पाहिजे’ असे म्हणणारे तथाकथित देशभक्त देशात आता फार आहेत. त्यांच्या एकारलेपणाला खंबीर उत्तर देण्याचे व तुम्हाला या देशाचा हिंदू पाकिस्तान बनवायचा आहे काय असा प्रश्न शशी थरुरांनी विचारला असेल तर त्यांचे साºया जाणकारांनी अभिनंदनच केले पाहिजे. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि त्याचे तसे असणे घटनेला मान्य आहे. मात्र धर्मनिरपेक्षतेचे मूल्यच ज्यांना मान्य नाही ते अजूनही हिंदूराष्ट्राची भाषा बोलतात व तसे राष्ट्र अस्तित्वात आणण्याची इच्छा बाळगतात. तात्पर्य, हा दोन मूल्यांमधील संघर्ष आहे व त्याकडे कमालीच्या डोळसपणे पाहणे गरजेचे आहे.