शिर्डीत घोषणांची ‘शताब्दी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 06:56 AM2018-08-28T06:56:53+5:302018-08-28T06:57:27+5:30
साईबाबांच्या समाधीचे शताब्दी वर्ष येत्या १८ आॅक्टोबरला संपेल. पण, या शताब्दी वर्षात सरकारला
साईबाबांच्या समाधीचे शताब्दी वर्ष येत्या १८ आॅक्टोबरला संपेल. पण, या शताब्दी वर्षात सरकारला आपल्या घोषणांची पूर्तता करण्याची फुरसत मिळाली नाही. शासन दरबारी हा शताब्दी महोत्सव म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचाच भात ठरला. स्वत: शिर्डी संस्थाननेही शंभरएक घोषणा केल्या. प्रत्यक्षात फळास अद्यापतरी काहीही आलेले नाही.
शिर्डी हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे देवस्थान मानले जाते. तिरुपती बालाजीनंतर या देवस्थानचा क्रमांक लागतो. शिर्डीचे वैशिष्ट्य म्हणजे हे तीर्थक्षेत्र सर्वच धर्मांच्या आदरस्थानी आहे. साईबाबांनी स्वत:चा जात-धर्म कधी सांगितला नाही व त्यांना मानणाºया भक्तांनीही कधी याबाबत चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे सर्वच प्रांतातून व सर्वच जाती-धर्मांचे भाविक शिर्डीला येतात. वर्षातून किमान १८० दिवस असे असतात की त्या दिवशी भाविकांचा आकडा लाखांच्या घरात जातो. एवढ्या लोकसंख्येला पुरेशा ठरतील अशा सुविधा मात्र शिर्डीत नाहीत. त्यामुळेच साईबाबांच्या शताब्दी वर्षात शिर्डीचा कायापालट होईल, अशी अपेक्षा होती. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समितीही स्थापन करण्यात आली. शिर्डीसाठी राज्य सरकारने ३२०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. शताब्दी वर्षात टप्प्याटप्याने हा निधी येईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात काहीच झाले नाही.
राष्टÑपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गत १ आॅक्टोबरला शताब्दी वर्षाचा प्रारंभ झाला. स्वत: मुख्यमंत्री त्या सोहळ्याला उपस्थित होते. पण, उद्घाटनाचा सोहळा संपला अन् सरकार शिर्डीला विसरले. नाशिकला कुंभमेळ्याच्या निमित्ताने रस्ते, पाणी या सुविधांत भर पडते. शिर्डीत ही माफक कामेही झाली नाहीत. दर्शनबारी नवीन केली जाणार होती. शिर्डीत वैद्यकीय महाविद्यालय आणता येईल, लेझर शो सुरू करता येईल अशा अनेक कल्पना विश्वस्त मंडळाने मांडल्या. पण कार्यवाहीबाबत शुकशुकाट. शताब्दी वर्षात संस्थानचा कामाचा व्याप वाढेल म्हणून दोन उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी, पोलीस उपअधीक्षक, कार्यकारी अभियंता असे अतिरिक्त मनुष्यबळ सरकारने संस्थानला दिले. पण, या सर्व अधिकाºयांना कामच नाही, अशी परिस्थिती आहे. उलट संस्थानच्या तिजोरीवर त्यांच्या वेतनाचा बोजा वाढला. संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त बिपीन कोल्हे, भाऊसाहेब वाकचौरे ही सर्व मंडळी भाजपची आहेत. शिवसेनेच्या विश्वस्तांनी कामकाजावर बहिष्कार टाकलेला आहे. भाजपकडे एकहाती सूत्रे व त्यांचीच सत्ता असतानाही शताब्दी महोत्सव सुनासुना गेला. विश्वस्त मंडळाने मंदिर परिसरात भगव्या पाट्या लावण्याची घाई केली. तेवढी तडफ इतर कामांत दाखवली नाही. भाजपला हा महोत्सव मनापासून साजरा करावयाचा होता की नाही? हीच शंका या सर्व बाबींतून निर्माण होते. यामागे राजकारणही दिसते. शताब्दी वर्षात प्रारंभी शिर्डीला विमानतळ मिळाले. मात्र, तेथेही अद्याप नाईट लॅण्डिगची सुविधा नाही. सध्या या विमानतळावरून केवळ मुंबई, हैद्राबाद ही उड्डाणे होतात. निधीअभावी तोही विस्तार रखडला आहे.
- सुधीर लंके