स्वत:च्या ओळखीसाठी तिने मोजली २० वर्षं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2024 07:52 AM2024-03-16T07:52:21+5:302024-03-16T07:54:45+5:30

खाणीत असं भूमिगत होऊन कष्टात आयुष्य घालवणं तिला मंजूर नव्हतं. 

she counted 20 years for her identity | स्वत:च्या ओळखीसाठी तिने मोजली २० वर्षं!

स्वत:च्या ओळखीसाठी तिने मोजली २० वर्षं!

एखाद्या साहसी चित्रपटाची कथा शोभावी असं आयुष्य ३४ वर्षांच्या चे रॅनच्या वाट्याला आलं. २० वर्षांपासून स्वत:च्या ओळखीसाठी धडपडणाऱ्या चे रॅनने एका परक्या शहरात आपलं आयुष्य आता संपूर्णपणे नव्यानं जगायला सुरुवात केली आहे. 

चे रॅन हे खरंतर तिचं टोपण नाव. चीनमध्ये राहणाऱ्या आपल्या मुलाला आणि उत्तर कोरियात राहणाऱ्या आपल्या नातेवाइकांना काही त्रास होऊ नये म्हणून तिने आपली मूळ ओळख लपवली आहे. चे रॅन ही मूळची उत्तर कोरियातील. माध्यमिक शिक्षण आटोपल्यानंतर तीही आपल्या कुटुंबीयांप्रमाणेच खाणीवर कामाला जाऊ लागली. पण, खाणीत असं भूमिगत होऊन कष्टात आयुष्य घालवणं तिला मंजूर नव्हतं. 

दुसरीकडे चांगलं काम देतो, असं सांगणाऱ्या दलालावर विश्वास ठेवून तिनं आणि तिच्या मैत्रिणीनं नदी ओलांडून चीनच्या हद्दीत प्रवेश केला. तिथे प्रवेश केल्या केल्या तिला आणि तिच्या मैत्रिणीला वायव्य चीनमध्ये नेण्यात आलं. तिथे त्यांच्यासमोर फक्त दोनच पर्याय ठेवण्यात आले. बारमध्ये काम करून ग्राहकांचं मन रिझवायचं किंवा चिनी माणसाशी लग्न करायचं. 

बारमध्ये काम करणं आपल्याला जमणार नाही हे ओळखून चे रॅनने चिनी माणसाशी लग्न करण्याचा पर्याय स्वीकारला.  तिच्यापेक्षा आठ वर्षांनी मोठ्या असलेल्या एका चिनी शेतकऱ्याने तिला विकत घेतलं. तिथं तिची आणि तिच्या मैत्रिणीची ताटातूट झाली. त्या दोघी एकमेकींना कधीच भेटू शकल्या नाहीत.

खरंतर, चे रॅनला तो चिनी माणूस अजिबात आवडला नव्हता. पण, याला नकार दिला तर तिला आणखी कोणाला तरी विकलं जाईल हे ओळखून तिनं त्या माणसासोबत राहण्याचा पर्याय स्वीकारला. ती त्या चिनी शेतकऱ्याबरोबर ईशान्य चीनमध्ये असलेल्या त्याच्या डोंगराळ भागातल्या एका गावात आली. गावातलं त्याचं माती-दगडांचं घर बघून तिला त्याच्या परिस्थितीचा अंदाज आला. चे रॅनला चिनी भाषेचा ओ का ठो कळत नव्हता. त्यामुळे ती ना त्या शेतकऱ्याशी बोलू शकत होती ना त्याच्या घरातल्यांशी. त्यामुळे इथून पळून जाण्याचा मार्ग तिच्यासाठी फारच अवघड होऊन बसला. १७ वर्षांपूर्वी  चीनमधील त्या गावात नाइलाजाने राहण्यास चे रॅन तयार झाली.

तो चिनी शेतकरी तिच्यासोबत वाईट वागला नाही. पण, त्याची एकच अट होती ती म्हणजे चे रॅननं तो म्हणेल तसं वागलं पाहिजे. तो तिला बायकोप्रमाणे वागवायचा. तिची इच्छा नसतानाही ती गरोदर राहिली. तिनं गर्भपात करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण, ते यशस्वी झाले नाहीत. तिला मुलगा झाला. मुलाला पाहिल्यानंतर तिचं मन बदललं. तिनं यापुढचं आयुष्य आपल्या मुलासाठी चीनमध्ये घालवण्याचं ठरवलं.

उत्तर कोरियातून चीनमध्ये आलेले स्थलांतरित सापडल्यास त्यांना बळजबरीनं मायदेशी पाठवलं जातं. आणि मग तिथं गेल्यानंतर देश सोडण्याचा आरोप लावून त्यांना कैदेत ठेवलं जातं, छळलं जातं. असं होऊ नये म्हणून चे रॅनला आपली ओळख लपवणं भाग होतं.

काही वर्षांनी चे रॅन आणि तिचा नवरा जवळच्या एका छोट्या शहरामध्ये राहायला आले. तिथे आल्यानंतर चे रॅनने भांडी घासण्याची कामं करायला सुरुवात केली. चिनी भाषा शिकू लागली. नंतर तिने एका सुपर मार्केटमध्ये, एका चहाच्या दुकानात आणि अन्न वितरित करण्याच्या दुकानात काम केलं. 

तिथे तिला तिच्यासारख्या फसवून चीनमध्ये आणलेल्या, विकल्या गेलेल्या अनेक उत्तर कोरियन महिला आणि मुली भेटल्या. चीनमध्ये उत्तर कोरियातल्या ज्या मुली आणि महिलांनी चिनी माणसाशी लग्न केलं त्यांना एक ओळखपत्र देण्यास सुरुवात केली होती. तिलाही ते ओळखपत्र मिळवायचं होतं. पण, चे रॅनच्या नवऱ्यानं आणि घरच्यांनी त्याला विरोध केला. त्या शहरात तिला एक दलाल भेटला. त्याच्या मदतीनं चे रॅन आणि तिच्यासारख्या अनेक उत्तर कोरियन महिला आणि मुली लाओस, थायलंडमार्गे दक्षिण कोरियात पोहोचल्या. 

...आणि चे रॅन स्वप्नं पाहू लागली 

दक्षिण कोरियन  सरकारच्या आर्थिक मदतीनं चे रॅन आणि मानवी तस्करीच्या बळी ठरलेल्या अनेक उत्तर कोरियन महिला आणि मुलींना आधार मिळाला. त्याच्याच बळावर चे रॅननं आता एक भाड्याचं घर आणि आवश्यक सामानसुमान घेतलं. यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे चे रॅनला दक्षिण कोरियाचं सरकारी ओळखपत्र मिळालं आहे. आता ती आपल्या भविष्याची, चीनमध्ये आपल्या मुलाला भेटण्याची स्वप्नं पाहू लागली आहे. खाद्य क्षेत्रात काम करण्यासाठीचं बॅरिस्टा प्रमाणपत्र चे रॅनला मिळालं आहे. नेल आर्टचं प्रशिक्षण आता ती घेते आहे.

 

Web Title: she counted 20 years for her identity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.