‘ती’, ‘ती’ चा गणपती, समाज आणि बुद्धिदाता श्री गजानन

By admin | Published: September 12, 2016 12:27 AM2016-09-12T00:27:36+5:302016-09-12T00:27:36+5:30

कोणे एकेकाळी महाराष्ट्रापुरता मर्यादित असलेला सार्वजनिक गणेशोत्सव आता देशातील अन्य प्रांतांनीही आपलासा केला असून, यंदा अकरा दिवस चालणारा हा उत्सव आता अंतिम टप्प्यात पोहोचत

'She', 'she' of Ganapati, society and intellectualist Mr. Gajanan | ‘ती’, ‘ती’ चा गणपती, समाज आणि बुद्धिदाता श्री गजानन

‘ती’, ‘ती’ चा गणपती, समाज आणि बुद्धिदाता श्री गजानन

Next

विजय दर्डा, (लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)
कोणे एकेकाळी महाराष्ट्रापुरता मर्यादित असलेला सार्वजनिक गणेशोत्सव आता देशातील अन्य प्रांतांनीही आपलासा केला असून, यंदा अकरा दिवस चालणारा हा उत्सव आता अंतिम टप्प्यात पोहोचत असताना हा उत्सव, तो सुरू करण्यामागील लोकमान्य टिळकांची संकल्पना आणि ही संकल्पना पुढे चालू ठेवण्याबाबत समाजाकडून केले जात असलेले प्रयत्न आणि त्याच संकल्पनेचा विस्तार करण्यासाठी होत असलेले सायास यांचे सिंहावलोकन करण्याची हीच योग्य वेळ आहे.
ज्या परिस्थितीत लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवास सुरु वात केली ती परिस्थितीच पूर्णपणे भिन्न होती. परकीय सत्तेच्या विरोधात जनमत संग्रहित करणे, समाजात जागृती निर्माण करणे हाच टिळकांचा मुख्य हेतू होता. परकीय सत्तेच्या जोखडातून देश स्वतंत्र झाल्याने निम्मा हेतू साध्य झाला; पण समाजास जागे करण्याचा हेतू मात्र पूर्णांशाने साध्य झाला नाही. अर्थात ते काम कुणा एकट्या दुकट्याचे नाही आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे त्याला संपूर्ण समष्टीची वैचारिक एकरूपता प्राप्त झाल्याखेरीज ते होणारही नाही. पण तशी सुरु वात कोणी तरी करणे गरजेचे असते व एकदा ती झाली की समाजातील एखादा का होईना वर्ग तिला स्वीकारायला सिद्धही होत असतो. याचा अगदी ठसठशीत दाखला म्हणजे ‘लोकमत’ने सुरू केलेला ‘ती’ चा गणपती हा उपक्रम. तीनेक वर्षांपूर्वी पुण्यनगरीत म्हणजे लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची जिथे सुरुवात केली तिथेच ‘लोकमत’ने हा उपक्र म सुरू केला आणि आता राज्यातील काही शहरांनीही तो स्वीकारला आहे व कालांतराने हा ‘ती’ चा गणपती वा गणेशोत्सव स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करील यात शंका नाही.
परंतु हे सारे काही सुरळीत वा सोपे होते असे नाही. ‘लोकमत’च्या या उपक्र माबाबत काहींनी थेट विरोध केला, तर काहींनी नाके मुरडली. का आणि कशासाठी? पारंपरिक आणि बुरसटलेली, महिलांना उपासनेचा अधिकार नाकारणारी आणि खरे तर महिलांना समानतेची तर राहोच पण दुय्यम वा तिय्यम दर्जाची वागणूक देणारी अहंभावाने प्रेरित पुरु षी मानसिकता हेच त्यामागील कारण. एकप्रकारे या मानसिकतेने महिलांचा जो कोंडमारा होत होता त्यातून त्यांना मोकळेपणाचा श्वास घेण्याची मोकळीक ‘लोकमत’च्या ‘ती’ चा गणपतीने प्राप्त करून दिली.
पुण्यातील यंदाच्या ‘ती’ च्या गणेशोत्सवाला तर अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत भारताच्या महिला स्पर्धकांनी जी अजोड कामगिरी बजावली तीच या गणेशोत्सवाची मुख्य प्रेरणा होती आणि त्यानिमित्ताने स्त्रीशक्तीचा मोठा जागर केला गेला. भव्य शोभायात्रा आणि मध्यरात्री झालेल्या पथनाट्याच्या माध्यमातून या स्त्रीशक्तीचा जणू साक्षात्कारच समाजाला घडवून दिला गेला. विशेष म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांसह निघालेल्या या शोभायात्रेचे नेतृत्व पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांनी केले. ते पाहून मी भारावलो. त्यातील आणखी एक लक्षणीय बाब म्हणजे आपल्या व्यक्तिगत कर्तबगारीवर स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करून दाखविलेल्या महिलांपासून गृहिणींपर्यंत सर्वांचाच यात सहभाग होता. पण हे पुरेसे आहे काय, असा प्रश्न जर विचारला गेला तर दुर्दैवाने त्याचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागेल. कारण पुरुषी मानसिकता आजही समाजात आपली पाळेमुळे घट्ट धरून आहे.
गणेश किंवा गजानन ही आदिदेवता म्हणून ओळखली जाते आणि म्हणूनच तिला अग्रपूजेचा मान आहे. पण पूजा करण्याचा हा मान स्त्रियांनाही उपलब्ध आहे का? खरे तर प्रत्येक देवाचा आणि मानवाचाही जन्म एका स्त्रीच्याच उदरातून होत असतो. पण गणपतीची जन्मकथा त्याच्या असामान्य मातृभक्तीशीही जोडली गेली आहे. पण आज समाजाला त्याची आठवण तरी आहे का? आपल्या मातेच्या अनुज्ञेचा भंग करू पाहणाऱ्या पित्याशी युद्ध करणाऱ्या गणपतीची आराधना करणारे किती लोक त्यांच्या डोळ्यादेखत एखाद्या मातेची विटंबना होत असताना तिच्या रक्षणासाठी धावून जातात? भर रस्त्यात एखाद्या मुलीची अवहेलना केली जाते, तिच्यावर तेजाब फेकले जाते, तिची अडवणूक केली जाते, तिच्यावर बलात्कार केला जातो पण एरवी गणेशोत्सवाच्या निमित्ताने नाचगाण्यात आपल्या शरीराची रग झिजविणारे अशा वेळी कुठे जातात?
सामाजिक सुधारणांना कायद्याची जोड मिळाली
तर सुधारणांची गती वाढते म्हणतात. त्याच हेतूने देशात बालविवाह प्रतिबंध कायदा आला, हुंडा प्रतिबंध
कायदा केला गेला आणि समाजातील विषमता व जातिभेद नष्ट व्हावेत म्हणून आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहित करण्याचे सरकारी धोरण आले. पण प्रत्यक्षात दिसून काय येते, तर अजूनही पाळण्यात लग्ने लावली जातात, भक्कम हुंडा घेतल्यानंतरही सून म्हणून घरात आणलेल्या मुलीचा छळ करून प्रसंगी तिला जिवंत जाळले जाते आणि आंतरजातीय विवाह करू पाहणाऱ्या वा केलेल्या मुला-मुलींना ठार मारून त्याला ‘आॅनर किलिंग’ असे गोंडस नाव दिले जाते.
श्रीगणेश हा सुखकर्ता आहे. अमंगळाचा नाशकर्ता आहे. विघ्नहर्ता आहे. पण म्हणून तोच सारे करील, आपण काहीही करण्याची आवश्यकता नाही असा याचा मुळीच अर्थ नाही. वाईटातून चांगले घडतच असते. गरज असते ती त्यासाठी विशिष्ट दिशेने जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची आणि मनात सकारात्मकतेची भावना रुजवून
घेण्याची. ‘लोकमत’ने ‘ती’ चा गणपतीची संकल्पना
हाती घेतली ती मुळी याच हेतूने. महिलांना समान दर्जा मिळावा या हेतूने ही संकल्पना साकारत असतानाच शनि शिंगणापूर आणि हाजी अली या धार्मिक स्थळांमध्ये महिलांना प्रवेशाचा जो निर्णय झाला, तो योगायोगच आहे.अर्थात समाजाच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्याचे जे अनेक मार्ग आहेत त्यातील एका मार्गावरून चालण्याचा आम्ही केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे. असाच प्रयत्न करण्याची प्रेरणा तो बुद्धिदाता आणखी अनेकांना देईल याची आम्हाला खात्री आहे.
जाता जाता : एक योगशिक्षक म्हणून देशाला
आणि जगालाही ज्ञात असलेल्या रामदेव बाबा यांचा उद्योगाच्या क्षेत्रातील आजवरचा प्रवास कोणीही
थक्क व्हावे असाच आहे. खास भारतीय वनस्पती, कंद आणि मुळं यांच्यातील जे मोल आजवर केवळ ग्रंथित स्वरूपात होतं त्यांना त्यांनी उत्पादनात रूपांतरित
केलं. आजच्या परिभाषेत ज्यांना एफएमसीजी म्हणजे जनसामान्यांच्या दैनंदिन उपभोगाच्या विपुल उत्पादनांच्या बाजारपेठेत बाबांच्या पतंजलीने जबरदस्त धडक मारली आहे. या क्षेत्रात नाही म्हटले तरी बहुराष्ट्रीय कंपन्यांचीच मक्तेदारी आहे. पण येत्या तीन वर्षांत आपण त्यांना धूळ चारू व अलोम विलोम करण्यास भाग पाडू हा बाबांचा आत्मविश्वास सार्थ की अनाठायी हे काळच सांगेल. पण महाराष्ट्रात ते जी सुमारे पाच हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करीत आहेत तिचे मात्र स्वागत केलेच पाहिजे.

Web Title: 'She', 'she' of Ganapati, society and intellectualist Mr. Gajanan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.