तिने २४० तास केला फक्त स्वयंपाक!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 10:30 AM2024-01-30T10:30:51+5:302024-01-30T10:31:25+5:30
Food: स्वयंपाकात निपुण. वेगवेगळ्या चवींचे पदार्थ आणि त्यांचं सौंदर्य यावर तिचे सतत वेगवेगळे प्रयोग सुरू असतात. स्वयंपाकाकडे ती केवळ काम म्हणून नाही तर एक मिशन म्हणूनच बघते. पाककलेतली तिची तज्ज्ञता अख्ख्या देशाने मान्य केली आहे.
ती स्वयंपाकात निपुण. वेगवेगळ्या चवींचे पदार्थ आणि त्यांचं सौंदर्य यावर तिचे सतत वेगवेगळे प्रयोग सुरू असतात. स्वयंपाकाकडे ती केवळ काम म्हणून नाही तर एक मिशन म्हणूनच बघते. पाककलेतली तिची तज्ज्ञता अख्ख्या देशाने मान्य केली आहे. १ जानेवारीला ती स्वयंपाकघरात गेली, ती थेट १० जानेवारीला सकाळी अकरा वाजताच स्वयंपाकघरातून बाहेर आली. इतक्या वेळ स्वयंपाकघरात ती फक्त स्वयंपाकच करत होती. न थांबता, न थकता. आनंदाने आणि अभिमानाने. वैयक्तिक कुकिंग मॅरेथाॅनमध्ये भाग घेतलेल्या तिच्या डोळ्यासमोर २४० तास अखंड स्वयंपाक करण्याचं ध्येय होतं. २२७ तास स्वयंपाक केल्यानंतर तिने जेव्हा गॅस बंद केला तेव्हा अख्ख्या देशाने तिच्या नावाचा जल्लोष केला. तिचं नाव जॅन ब्लेस फेला. ती घाना देशात फैलातू अब्दुल रझाक या नावाने ओळखली जाते.
फैलातू घाना येथील तमाले शहरात राहणारी. येथील ‘मिकीज इन’ रेस्टाॅरण्टची संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष. घानाच्या लष्करातील अधिकाऱ्याची पत्नी असलेल्या फैलातूला आपलं स्वत:चं काम हेदेखील राष्ट्रकार्यच वाटतं. आपल्या पाककला कौशल्याच्या बळावर फैलातूला घाना देशाचं नाव, घाना देशातील पदार्थांची समृद्धी आणि संस्कृती, त्यांची चव आणि सौंदर्य जगभर पोहोचवायचं आहे. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणूनच फैलातूने वैयक्तिक कुकिंग मॅरेथाॅनमध्ये भाग घेतला होता. कुकिंग मॅरेथाॅन पूर्ण केल्यानंतर आपण एक महत्त्वाची ‘नेशन असाइण्टमेण्ट’ पूर्ण केल्याचे भाव फैलातूच्या चेहऱ्यावर होते. आपल्या या मिशनमुळे आपल्या घाना या छोट्याशा आफ्रिकन देशाचं नाव जगभरात होईल असा विश्वास फैलातूला आहे. २२७ तास स्वयंपाक केलेल्या फैलातूची कामगिरी आता ‘गिनीज वर्ल्ड रेकाॅर्ड’कडे पोहोचली आहे. या कामगिरीवर त्यांचं शिक्कामोर्तब झाल्यावर फैलातू ही २२७ तास स्वयंपाक करणारी जगातली एकमेव व्यक्ती होणार आहे.
१० दिवस आपल्या देशाचा झेंडा अभिमानानं अंगावर लपेटून फैलातू एकामागोमाग एक पदार्थ करण्यात गुंतली होती. तमाले येथील ‘ माॅडर्न सिटी हाॅटेल’च्या किचनमध्ये फैलातूने आपली अखंड स्वयंपाक करण्याची मोहीम सुरू केली. तिच्या या साहसामध्ये अख्खा देश सहभागी झाला होता. दहा दिवस हाॅटेलमध्ये फैलातूला पाठिंबा देण्यासाठी, तिचा उत्साह वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सामान्य लोक येत होते. घाना देशाचे उपराष्ट्रपती डाॅ. महामुदू बाॅवूमिया, संगीतकार, कलाकार, खेळाड् यासोबतच घानाच्या सैनिकांनी हाॅटेलमध्ये येऊन फैलातूच्या मोहिमेला नैतिक आणि मानसिक बळ दिलं. हाॅटेलमध्ये फैलातूचा उत्साह वाढवण्यासाठी आलेले लोक नाचत होते, गाणी गात होते. हे सर्व पाहून फैलातूचा उत्साह दिवसागणिक वाढतच गेला. या मोहिमेची घोषणा केल्यानंतर घानाच्या उपराष्ट्रपतींनी फैलातूला १,९८१ अमेरिकन डाॅलर्सची मदत करून तिला जग जिंकण्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे आपण ठरवलेलं ध्येय गाठणं किंवा ध्येयाच्या जवळपास पोहोचणं ही बाब फैलातूसाठी फारच महत्त्वाची बनली होती. आपण जर हे ध्येय पूर्ण करू शकलो नाही तर तो पूर्ण देशाने आपल्यावर जो विश्वास टाकला आहे, त्यासोबत प्रतारणा होईल, या जाणिवेनेच गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डच्या सर्व नियमांचं काटेकोर पालन करूनच फैलातूने १० दिवस स्वयंपाकघरात अखंड स्वयंपाक केला.
गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डच्या नियमानुसार दर एक तासातून पाच मिनिटांची विश्रांती फैलातू घेऊ शकणार होती किंवा हा दर तासानंतरचा ब्रेक न घेता २४ तासांनंतर सलग एक तासाचा ब्रेक घेऊन त्यात आराम, जेवण आणि वैयक्तिक स्वच्छता ही कामं आटपू शकणार होती. नियम कितीही कठोर असले तरी आपण नवीन रेकाॅर्ड सेट करणारच या ध्येयाने फैलातू झपाटून गेली होती. या मोहिमेचा संपूर्ण लेखाजोखा, पुरावे गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डकडे पाठवण्यात आले असून, आता त्याची तपासणी सुरू आहे. १२ आठवड्यांनंतर फैलातूच्या जागतिक कामगिरीवर विजयाची मोहोर उमटणार आहे. घानाच्या ‘शेफ असोसिएशनने फैलातूच्या २२७ तास स्वयंपाक या कामगिरीची दखल घेऊन तिला ‘एक्झिक्युटिव्ह शेफ इन घाना’ या किताबाने सन्मानित केलं आहे.
२२७ तासांत १५६ पदार्थ
घाना देशातल्या खाद्यसंस्कृतीने जगातल्या खवय्यांना भुरळ घातली आहे. या कुकिंग मॅरेथाॅनच्या माध्यमातून या संस्कृतीचा प्रचार-प्रसार होण्यासाठी फैलातूने जुने नवे, स्थानिक आणि काॅन्टिनेण्टल असे एकूण १५६ पदार्थ तयार केले. जाॅलाॅफ राइस, वॅकी, फुफू विथ लाइट सूप, तुओ झाकी विथ आयोयो सूप, बीन्स ॲण्ड फॅन्टेन, बांकू विथ ओक्रा स्ट्यू, याॅम पाॅटिस, तुबानी, वासावासा, यांका हिंडा यासारखे अनेक पदार्थ फैलातूने त्यातली पारंपरिक चव राखत आपल्या शैलीने तयार केले आणि सजवले.