शेख हसीना, मोहम्मद युनूस व ढाक्याची मलमल...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 10:48 AM2024-08-10T10:48:48+5:302024-08-10T10:50:07+5:30
शेख हसीना यांना ‘हुकूमशाही’ भोवली; पण त्यांच्या कारकिर्दीत बांगलादेशने उद्योगात घेतलेली भरारी टिकविण्याचे मोठे आव्हान डॉ. युनूस यांच्यापुढे आहे.
श्रीमंत माने, संपादक, लोकमत, नागपूर
दिल्लीजवळच्या हिंडन येथील वायुदलाच्या तळावर थांबलेल्या शेख हसीना यांचे भवितव्य अधांतरी आहे. त्या कुठे जातील, काय करतील काहीच निश्चित नाही. हिंसाचारात विदीर्ण झालेल्या बांगलादेशच्या अंतरिम सरकारची धुरा डाॅ. मोहम्मद युनूस यांनी खांद्यावर घेतली आहे. बांगलादेश मुक्तीनंतर सत्तरच्या दशकात नियोजन आयोगाचे ते सदस्य होते. नंतर त्यांना त्या कामाचा कंटाळा आला. आयोग सोडून ते चितगाव विद्यापीठात अर्थशास्त्र शिकवायला गेले. पुढे त्यांनी ग्रामीण बँकेच्या माध्यमातून ऐंशी-नव्वदच्या दशकात मायक्रोक्रेडिट, मायक्रोफायनान्सचे नवे माॅडेल जगापुढे ठेवले. शांततेच्या नोबेलने त्यांच्या कामगिरीची दखल घेतली गेली.
स्वयंसहाय्यता गट किंवा बचतगटाच्या प्रतिकृती भारतासह जगभरातील विकसनशील टापूत उभ्या राहिल्या. गरिबांच्या हातात पैशाचा व्यवहार आला. अब्जावधी बायाबापड्यांना बँकिंग व्यवस्थेची ओळख झाली. थोडक्यात, त्यांनी गरिबांच्या झोपड्यांमध्ये समृद्धी आणली आणि चतकोर भाकरीसाठी, चार-दोन टका रकमेसाठी होणाऱ्या हाणामाऱ्या थांबल्या. आता हिंसाचार, बेराेजगारी व महागाईच्या स्वरूपातील वेगळे आव्हान डाॅ. युनूस यांच्यापुढे आहे. त्यांना आता आधी खरीखुरी शांतता प्रस्थापित करावी लागेल. हिंसाचारामुळे रुळावरून घसरलेले अर्थव्यवस्थेचे गाडे पूर्वपदावर आणावे लागेल. अल्पसंख्याक हिंदूंवरील हल्ले थांबवावे लागतील.
हिंसाचाराने बांगलादेशची अर्थव्यवस्था, उद्योग व व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत. बाजारात अन्नधान्य, भाजीपाला व जीवनाश्यक वस्तूंची भयंकर टंचाई आहे. वाहतूक बंद आहे. जाळपोळ, तोडफोडीत सार्वजनिक संपत्तीचे प्रचंड नुकसान झाले आहे. खासगी घरे व कार्यालयांच्या नुकसानीचा अंदाज लावणेही कठीण आहे. दहा दिवसांपूर्वी, २९ जुलैला ‘द फाॅरेन इन्व्हेस्टर्स चेंबर ऑफ काॅमर्स अँड इंडस्ट्रीज’ने (फिक्की) नुकसानीचा आकडा तब्बल १० अब्ज डाॅलर्स इतका सांगितला. नंतरच्या दहा दिवसांत त्यात किमान तितकीच वाढ झाली असावी. केवळ ग्राहकोपयोगी वस्तूंच्या व्यापाराचे नुकसान कोट्यवधी डाॅलर्समध्ये आहे.
डाॅ. युनूस यांच्यापुढील सर्वांत मोठे आव्हान शेख हसीना यांच्या पंधरा वर्षांच्या कारकीर्दीत बांगलादेशने उद्योगात घेतलेली भरारी टिकविण्याचे आहे. हसीना यांनी तिथल्या राजकारणात भलेही हुकूमशाही राबविलेली असेल, तथापि त्यांच्याच कार्यकाळात बांगलादेशने विकासाची भरारी घेतली. २०१० मधील अतिगरिबीचे ११.८ टक्के प्रमाण २०२२ मध्ये ५ टक्क्यांवर आले. वर्कफोर्समध्ये महिलांचा सहभाग वाढविला. मध्यंतरी तिथले दरडोई उत्पन्न भारतापेक्षा अधिक होते. बांगलादेशची अर्थव्यवस्था वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिथल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात ऐंशी टक्के वाटा खासगी उद्योगांचा आहे. जगातील वेगाने वाढणाऱ्या मोजक्या अर्थव्यवस्थांमध्ये बांगलादेशचा समावेश होतो. भारतानंतरची दक्षिण आशियातील ही दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून, आकाराने ती जगात ३५ व्या, तर लोकांच्या क्रयशक्तीबाबत २५ व्या क्रमांकावर आहे.
गारमेंट उद्योग हा बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेचा शब्दश: कणा आहे आणि त्याला मलमली कपड्याचा दोनशे वर्षांपूर्वीचा तलम इतिहासही आहे. ‘ह्योच नवरा पाहिजे’ या चित्रपटातील दादा कोंडके व जयश्री टी यांच्यावर चित्रित, ‘बंगलोरी नको मंगलोरी, मलमल आणा की ढाक्याची, देईन तुला कायमची पोरी दाैलत ही तीन लाखांची’, हे गाणे आठवते ना. मेघना नदीकाठच्या दुर्मीळ कापसापासून तयार होणाऱ्या मलमली कापडाची अशी दंतकथा बनली आणि सध्या गारमेंटबाबत हा देश जगाचा राजा आहे. जगभरातील नामांकित ब्रॅण्ड्सचे उत्पादन बांगलादेशात होते. पर्यावरणपूरक उद्योग म्हणविल्या जाणाऱ्या जगातील टाॅप टेन ग्रीन गारमेंट्समधील नऊ, वीसपैकी अठरा व शंभरपैकी तब्बल ५८ कंपन्या बांगलादेशात आहेत. त्यांच्या दर्जानुसार प्लॅटिनम रेटेड ऐंशी, गोल्ड रेटेड ११९, सिल्व्हर रेटेड १० आणि रेटिंग नसलेल्या चार कंपन्या हे बांगलादेशचे वैभव आहे.
या उद्योगाची एकूण गरज लक्षात घेतली, तर तिथे पिकणारा कापूस नगण्य ठरतो. बांगलादेशची वार्षिक गरज २५ लाख गाठींपेक्षा अधिक आहे. तथापि, देशांतर्गत उत्पन्न जेमतेम १ लाख गाठी आहे. त्यामुळे अमेरिका, राष्ट्रकुलातील देश किंवा भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आदी देशांमधून कापूस आयात होतो. २०२३-२४ मध्ये भारतातून ६३३ दशलक्ष डाॅलर्स किमतीचा कापूस बांगलादेशला निर्यात झाला. भारताच्या एकूण कापूस निर्यातीपैकी हा निम्मा हिस्सा होता. आयातीवर अवलंबून असलेला हा उद्योग स्वस्त महिला कामगार, अद्ययावत तंत्रज्ञान व उद्योगस्नेही सरकारी धोरणांमुळे इतका वाढला की, बांगलादेशच्या एकूण निर्यातीत गारमेंट इंडस्ट्रीचा वाटा तब्बल ८५ टक्के आहे. गारमेंटशिवाय अलीकडच्या काही वर्षांमध्ये औषधनिर्मिती हा बांगलादेशात भरभराटीला आलेला नवा उद्योग आहे. हा उद्योग सध्या सरासरी १२ टक्क्यांनी वाढतो आहे. कमी विकसित ४८ देशांमध्ये केवळ बांगलादेशच औषधी उत्पादनांमध्ये स्वयंपूर्ण आहे.
या दोन उद्योगांशिवाय, बांगलादेश स्वतंत्र होण्याच्या आधीपासून, अगदी ब्रिटिश आमदानीतील ढाका, चितगाव, खुलना भागांतील जहाजबांधणी, सायकली, चर्मोद्योग, ताग उद्योगांनी बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेला मोठे बळ दिले आहे. तथापि, एकूणच भारतीय उपखंडात सध्या बेरोजगारीची समस्या जटिल बनली आहे. भारताइतके नसले तरी डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणता येईल इतके मोठे तरुणांचे प्रमाण बांगलादेशातही आहे. त्यामुळे अधिकाधिक रोजगाराची गरज आहे. बांगलादेश ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स (बीबीएस)च्या ताज्या अहवालानुसार, आधीच्या वर्षाच्या तुलनेत २०२४ मधील पहिल्या तिमाहीत बांगलादेशातील बेरोजगारी ३.५१ टक्क्यांनी वाढली. २ लाख ४० हजार नव्या बेराेजगार युवकांची भर पडली आणि देशातील एकूण बेराेजगारांची संख्या २५ लाख ९० हजारांवर पोहोचली. १९७१ च्या स्वातंत्र्यलढ्याला पन्नास वर्षे उलटून गेल्यानंतरही स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांना तीस टक्के आरक्षण देण्याविरोधात विद्यार्थी, युवक रस्त्यावर उतरणे, त्यांनी हिंसक आंदोलन करण्यामागे हे असे वाढत्या बेकारीचे मोठे कारण आहे. याच बेकार तरुणांनी मोठ्या विश्वासाने डाॅ. मोहम्मद युनूस यांच्या हाती देश सोपविला आहे.
shrimant.mane@lokmat.com