शेवग्याचं झाड आणि म्हातारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 11:54 PM2018-05-15T23:54:01+5:302018-05-15T23:54:01+5:30
दादासाहेब मोठे गोष्टीवेल्हाळ. सतत गोष्टी सांगण्याचा त्यांना शौक. आजही ते असेच मावशीकडे आले.
- अतुल कुलकर्णी
दादासाहेब मोठे गोष्टीवेल्हाळ. सतत गोष्टी सांगण्याचा त्यांना शौक. आजही ते असेच मावशीकडे आले. म्हातारी दिसली की तिला म्हणाले, चला तुम्हाला एक गोष्ट सांगतो. म्हातारीला पण काम नव्हते. ती म्हणाली सांगा आणि दादासाहेब सुरू झाले. एका गावात एक सुखी कुटुंब राहत होते. सगळे भाऊ-बहीण गुण्यागोविंदाने नांदत होते. त्या घरात एकेदिवशी एक साधू आला. त्याने घरात दोन-चार दिवस मुक्काम केला. घरातले कर्ते पुरुष सकाळी उठायचे. परसबागेत शेवग्याच्या शेंगाचे झाड होते. घरातल्या तरुणांचा एकच कार्यक्रम असे. सकाळी उठून झाडाजवळ जायचे. शेंगा तोडायचे. बाजारात नेऊन शेंगा विकायच्या आणि येणाऱ्या पैशात घरचं सामानसुमान घेऊन ते परत यायचे. ते पाहून साधूने त्या तरुणाला विचारले...
बाबारे हे किती दिवस चालूयं?
- अनेक वर्षांपासून चालूयं.
पण तुम्हाला दुसरं नवीन काही करावं असं वाटत नाही का? किती दिवस याच झाडाच्या शेंगा तोडत आयुष्य काढणार? त्यावर त्या तरुणाकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. तो म्हणाला, चालूयं. आता तर माझा मुलगादेखील याच झाडाच्या शेंगा तोडायला मदत करतो आणि तो पण माझ्यासोबत बाजारात येतो. तोही या झाडावरच गुजराण करतो. साधू काही बोलला नाही. रात्री सगळे झोपल्यावर साधूने शेवग्याच्या झाडाखाली अॅसिड टाकले. झाड उभ्या उभ्या जळून गेले. सकाळी सगळे उठले. शेंगा तोडायला गेले तर झाडं कोसळले. होत्या तेवढ्या शेंगा सगळ्यांनी तोडून घेतल्या आणि दुसºया दिवसापासून सगळे काम शोधायला लागले. कुणी कुठे तर कुणी कुठे काम शोधू लागले. कालांतराने तोच साधू पुन्हा त्या गावात आला. तरुणांनी त्या साधूला ओळखले. प्रेमाने घरी नेले आणि सांगितले, तुम्ही झाड तोडले म्हणून आम्ही हातपाय हलवू शकलो. नाही तर आम्ही आहे त्याच ठिकाणी राहिलो असतो...
तात्पर्य काय माहिती आहे का म्हातारे... असं म्हणत दादासाहेब म्हणाले, म्हातारे, कलियुगातही असचं आहे. साचलेल्या संचितावर किती दिवस काढायचे...? कधी ना कधी साचलेले धन संपते, जमा केलेले पाणी संपते... मात्र वाहते पाणी आणि सतत येणारे धन कधी संपत नाही. हे त्यांना कळाले नाही म्हणून त्या साधूने ते झाडंच तोडून टाकले. पण झाड तोडणं हा काही उपाय नाही ना म्हातारे... तूच सांग बरं...
त्यावर म्हातारी हसली आणि म्हणाली, गोष्ट चांगली, तात्पर्यही चांगले पण आपल्याकडे कोणत्या राजकीय पक्षाला हे लागू होते सांग बरं... दादासाहेब हसले आणि म्हणाले, तूच सांग... त्यावर म्हातारी हसत हसत म्हणाली, काँग्रेसला लागू होते का रे ही गोष्ट...? त्यांच्या पक्षातले लोकही असेच भारी. नवीन काही करायचे नाही, त्यांना वाटते अजूनही लोक हातावरच ठप्पा मारतात. म्हणून ते दुसरं काही नवीन करण्याची इच्छाच ठेवत नाहीत. जे आहेत तेही आपापसात एकमेकांना कसं कोंडीत पकडता येईल त्याच कामावर असतात... म्हणून विचारते... त्यावर दादासाहेब म्हणाले, म्हातारे, ही गोष्ट राष्टÑवादी पक्षाला लागू होते की नाही...? तेही तसेच असं नाही वाटत... त्यावर म्हातारी म्हणाली, मी काय बोलणार...? काही लोकांना स्वत:च झाड आहे असं वाटतं....