शिंदे, फडणवीस आणि धक्क्यांचे रहस्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 10:14 AM2022-07-01T10:14:49+5:302022-07-01T10:15:18+5:30

दमदार मराठा नेतृत्व राज्याला देऊन भाजपने बेरजेचे राजकारण केले आणि फडणवीसांनी सत्ता-लोभाचा दोष देणाऱ्या टीकाकारांचीही तोंडे बंद केली. पुढे?

Shinde, Fadnavis and the secret of shocks | शिंदे, फडणवीस आणि धक्क्यांचे रहस्य!

शिंदे, फडणवीस आणि धक्क्यांचे रहस्य!

googlenewsNext

यदु जोशी, वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत -

देवेंद्र गंगाधरराव फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून परत येत आहेत, असे वाटत असतानाच प्रचंड धक्कातंत्राचा वापर करत भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले. अडीच वर्षांपूर्वीच फडणवीस पुन्हा येईन म्हणत असताना शिवसेनेने राष्ट्रवादी व काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला अन् फडणवीस परत येऊ शकले नव्हते. राज्यसभा व विधान परिषदेची निवडणूक त्यांनी जिंकून दाखविली तर त्यांच्या बंगल्याचा पत्ता बदलेल, असे राज्यसभा निवडणुकीपूर्वी इथे लिहिले होते. त्यांचा पत्ता आता नक्कीच बदलेल पण ते ‘सागर’वरून ‘वर्षा’ला जाणार नाहीत. 

स्वप्नातही कोणी विचार केला नसेल असे महाराष्ट्रात घडले आहे. एका सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाळगले होते. त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे ते पूर्ण करू शकले नाहीत. मुख्यमंत्रीपद त्यांनी स्वत:कडेच घेतले. बाळासाहेबांचे स्वप्न भाजपने आज पूर्ण केले. फडणवीसच मुख्यमंत्री होणार, असे छातीठोकपणे सांगितले जात असताना शिंदे सरकार राज्यात आले आहे. गेले दहा दिवस राज्यातील नाट्यपूर्ण घडामोडींची चर्चा आता पूर्णत: मागे पडून ‘शिंदे मुख्यमंत्री झालेच कसे?’- यावरून प्रचंड खल चांद्यापासून बांद्यापर्यंत होत आहे. आता त्याला  "फडणवीसांच्या उपमुख्यमंत्रीपदाचे शेपूट जोडले गेले आहे. एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करायला लावून पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांचे महत्त्व कमी केले आहे का, अशी चर्चाही आता सुरू झाली आहेच. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील घराणेशाहीचे राजकारण संपविण्याचा चंग बांधला आहे. त्याबाबत त्यांचे मुख्य लक्ष्य हे काँग्रेस पक्ष आहेच. पण, काही राज्यांतील घराणेशाहीला वेसण घालण्याची रणनीतीदेखील मोदींनी आखलेली दिसते आणि त्याच रणनीतीचा एक भाग म्हणून ठाकरे घराण्याला दिलेला हा धक्का असावा, असे मानण्यास मोठा वाव आहे. उद्या ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना खालसा करण्याच्या व्यापक रणनीतीचा हा भाग दिसतो. आजच्या निर्णयाने ‘स्वत:कडे सत्ता घेण्यासाठी फडणवीस सगळे उपद्व्याप करीत होते’, अशी टीका करणाऱ्यांची तोंडे बंद झाली आहेत. भाजपने दमदार मराठा नेतृत्व राज्याला दिले आहे. मोठे बेरजेचे राजकारण त्यांनी केले आहे. ‘आपला सत्तासंघर्ष हा स्वत:ला मुख्यमंत्री करण्यासाठी नव्हता तर २०१९ मध्ये मतदारांनी दिलेल्या जनमताचा आदर करण्यासाठी होता’ हे फडणवीसांनी दाखवून दिले. ठाकरेंकडून भाजपने मुख्यमंत्रीपद हिसकावून घेतले, आता शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेना धनुष्यबाणासह उभी केली जाईल.

- अर्थात ही सगळी खेळी केवळ फडणवीस यांच्या पातळीवरच निश्चित झाली असण्याची शक्यता नाही. पक्षश्रेष्ठींच्या मनात फडणवीस यांच्या राजकीय भवितव्याबाबत काय आहे, हे लवकरच समोर येईल. फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा हट्टच मोदी-शहांकडे धरला असता तर ते त्यांना मिळालेदेखील असते. पण, तो मोह टाळत त्यांनी २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे लक्ष्य समोर ठेवत नवीन समीकरणाला वाट करून दिली आहे.

शिंदे-भाजप सरकारमध्ये विकासाचे व्हिजन राबविले जाईल, अशी अपेक्षा आहे. राज्याची सध्या पॅसेंजर झाली आहे, नवे सरकार बुलेट ट्रेन चालवेल. विकासाचे जलयुक्त शिवार उभारेल. गेल्यावेळी केलेल्या चुकांचे आत्मचिंतन फडणवीस यांनी गेल्या अडीच वर्षांत नक्कीच केले असेल, त्या चुका दूर सारून ते सरकारला मार्गदर्शन करतील. आज शिंदे प्रयोग घडवून आणताना त्यांनी भलेमोठे भगदाड पाडून शिवसेनेचा हिशेब चुकता केला. चाणक्यानेही शिकवणी लावावी, असे राजकीय चातुर्य त्यांनी दाखवले. २०१९ आणि २०२२ मधील फडणवीसांमध्ये हाच फरक आहे. ‘देअर इज अ गव्हर्न्मेंट इन महाराष्ट्र, बट देअर इज नो गव्हर्नन्स’, असे ते मध्यंतरी म्हणाले होते. आता शासन आणि सुशासन दोन्ही महाराष्ट्रात आहे, हे दाखवून देण्याची जबाबदारी शिंदे-भाजप यांची असेल.
विठ्ठलाने वीट सोडली अन्..
बंडाचे काही चटके पूर्वीही शिवसेनेला बसले, पण यावेळच्या बंडाने शिवसेना, मातोश्री आणि ठाकरे पुरते होरपळून निघाले आहेत. पुढचा प्रवास खडतर आहे. मुंबई महापालिका हातून जाण्याची भीती आहे. धनुष्यबाणही हातात राहील का याची चिंता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कोंडी केली हे अडीच वर्षांचे सार ! मुख्यमंत्रिपद तर गेलेच, पण पक्षाच्या अस्तित्वाला अन् पक्षावरील ठाकरेंच्या एकछत्री अंमलालादेखील सुरुंग लागला !! ठाकरेंच्या शिवसेनेतील निर्विवाद स्थानालाही पहिल्यांदाच आव्हान मिळाले आहे. शिवसेनेतील ३९ आमदारांना शिवसेना, भगवा, मातोश्री हा ठाकरेंकडे असलेला ब्रँड झिडकारावासा का वाटला याचे आत्मचिंतन नेतृत्वाने करायलाच हवे. पक्षप्रमुखही तेच आणि मुख्यमंत्रीही तेच असे असतानादेखील पक्षाचे आमदार हे विरोधी पक्षनेत्यावर विश्वास ठेवत बाहेर पडतात हे पक्षनेतृत्वाचे अपयश आहे. ठाकरे-शिंदेंच्या भांडणात निष्ठावंत लाखो शिवसैनिक सैरभैर झाले आहेत. ठाकरे घराण्याप्रती त्यांच्या मनात आजही श्रद्धा आहे. त्यांचे काय होणार?

बंडानंतर काही बडवे चर्चेत आले. मातोश्री अन् वर्षावरही हे बडवे सक्रिय होते, विठ्ठलाच्या पायाशी कुणाला येऊ देत नसत. विठ्ठलाभोवती त्यांनी तटबंदी उभारली होती म्हणतात. शिवसेनेचे एक आमदार सांगत होते, एकदा मी एका बडव्याला सांगितले, माझे एवढे काम करून द्या. बडवा म्हणाला, मला किती मिळतील, आमदार म्हणाला, ५० लाख.... यावर बडव्याने त्याला हाकलल्यासारखे करत उत्तर दिले, ‘काय फक्त ५० लाख? अरे ! मी जे घड्याळ घातले आहे ना तेच २५ लाखांचे आहे!’
- विठ्ठलाभोवती बडव्यांच्या गर्दीचे आरोप नेहमीच होत आले आहेत. या बडव्यांना त्यांची जागा दाखवत भक्तांशी थेट कनेक्ट होतो तो खरा विठ्ठल. मातोश्रीतील विटेवर उभे राहून भक्तांच्या (शिवसैनिकांच्या) कल्याणाचा विचार करण्याऐवजी मातोश्रीतील विठुरायाने मुख्यमंत्रिपदाच्या विटेवर उडी घेतली अन् गल्लत झाली. आता नियतीने मूळ विटेवर परत आणले आहे.

इंदिरा गांधी पंतप्रधान अन् काँग्रेसच्या अध्यक्षही होत्या. दिल्लीतले काही बडवे त्यांच्या कानाशी लागायचे, अमुक तीनजण तुमच्याविरुद्ध कारवाया करताहेत म्हणून सांगायचे. एकदा काँग्रेस कार्यसमितीची बैठक झाली, दुपारच्या जेवणावेळी इंदिराजींनी स्वत: ताटे तयार केली आणि त्या कारवाया करणाऱ्या सदस्यांच्या जागेवर जाऊन जेवण नेऊन दिले. दुसऱ्या दिवशीपासून कारवाया थांबल्या.

- पक्षातील नाराजांच्या मनात एखादी गाठ पडली असेल तर ती मऊ हाताने सोडवायला हवी, शिवसेनेतही तसेच झाले असते तर बंड कदाचित टळले असते. शिवसेनेने दगडांना देव केले यात शंकाच नाही, त्यामुळेच शिवसेना सोडून कोणी जाते तेव्हा वाईट वाटतेच, पण शिवसेनाच शिवसेनेला सोडून गेल्याचे जे सध्याचे चित्र आहे त्याचा दोष दोन्हींकडे जातो. रोज उठून मोदी-शहांना शिव्या देण्याचा संजय राऊत यांचा अजेंडा होता, आमदारांचा नाही. आमदारांना मतदारसंघांमध्ये कामे, निधी हवा होता, हे ठाकरेंच्या लक्षात आले नसेल का? ठाकरे सत्तेत रमले नाहीत. जनतेला उद्धवजी आपलेसे वाटत होते, पण सरकार आपले वाटत नव्हते, हेही खरेच !
एकनाथ शिंदेंचे पुढे काय होईल?

फडणवीस हे महाविकास आघाडी सरकारला तीन चाकांचा ऑटो म्हणायचे. आता ऑटोचालक ते नगरविकासमंत्री अन् आता मुख्यमंत्री असा विलक्षण प्रवास केलेले एकनाथ शिंदे राज्याची धुरा सांभाळणार आहेत. लोकांची सेवा करण्यात आनंद वाटणारा, लोकांमध्ये रमणारा, सगळ्यांना भेटणारा, शहरी असला तरी ग्रामीण बाज असलेला हा दिलदार नेता आहे. त्यांच्याकडे फक्त इनकमिंग नाही, तर आऊटगोईंगदेखील आहे. एकनाथराव शिवसेनेचा सातबारा आपल्या नावावर करायला निघाले आहेत.
बाळासाहेबांचे वारसदार म्हणून घरातलेच असलेले राज ठाकरे यांनीही असा दावा केला होता, पण जमले नाही. शिवसेना भवन आणि मातोश्री आहे तोवर ठाकरे नावाचा ब्रँड संपविणे कठीण आहे, पण शिंदे हे फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आहेत. उद्या शिंदेंना पक्ष म्हणून शिवसेना पूर्णत: हायजॅक करता आली नाही, धनुष्यबाण मिळवता आला नाही तर हे आमदार भाजपमध्ये चला असा आग्रह शिंदेंकडे धरतील व राजकीय भवितव्यासाठी एक पक्ष, एक चिन्ह आणि एक महाशक्ती हवी असे वाटल्याने त्यांची पावले भाजपकडे वळू शकतील.
 

Web Title: Shinde, Fadnavis and the secret of shocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.