बाळासाहेबांची आठवण अन् विचारांचे सोने!

By यदू जोशी | Published: October 27, 2023 07:57 AM2023-10-27T07:57:42+5:302023-10-27T07:59:00+5:30

दसरा मेळाव्यातील भाषणेही ‘तीच’ असतील, तर त्यात वेगळेपण काय? आज एकाच्या दोन शिवसेना होऊनही बाळासाहेबांच्या भाषणातील ठाव दिसत नाही.

shiv sena dasara melava balasaheb memory and thoughts are gold | बाळासाहेबांची आठवण अन् विचारांचे सोने!

बाळासाहेबांची आठवण अन् विचारांचे सोने!

यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

एकच पक्ष, एकच नेता, एकच मैदान, अशी शिवसेनेची वर्षानुवर्षे टॅगलाइन होती. आता त्यांचे दोन पक्ष झाले, दोन नेते झाले आणि मैदानेही दोन झाली. विचारांचे सोने लुटायला काही जण शिवाजी पार्कवर, तर काही जण आझाद मैदानावर गेले. शिवसेनेचे असे काही होईल, असा विचारही कोणी कधी केला नव्हता. उद्याचे कोणी पाहिले. उद्या भाजपच काय कोणत्याही पक्षाबाबत तसे घडू शकेल. अनिश्चिततांचा खेळ फक्त क्रिकेटच नाही तर राजकारणदेखील आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भाषणे आठवतात. त्यांच्या भाषणांमध्ये चिमटे; कोपरखळ्या असायच्या. शब्दांनी विरोधकांना घायाळ करण्याची अपार क्षमता त्यांच्यात होती; पण शिवाजी पार्कवर शेवटच्या दहा मिनिटांत ते लाखो शिवसैनिकांना एक लाइन द्यायचे; पुढे काय करायचे याचा मंत्र त्यात असायचा. प्रश्नांचे काहूर मनात घेऊन आलेल्या शिवसैनिकांपैकी प्रत्येकाशी संवाद साधल्यासारखे बोलण्याची धाटणी होती त्यांच्या भाषणाची. त्वेषाने आलेले शिवसैनिक विचार घेऊन शांतपणे घरी जायचे; म्हणून तर ‘विचारांचे सोने लुटायला चला’ ही टॅगलाइन चपखल बसायची. 

उद्धव ठाकरेंच्या भाषणातून तसे काही जाणवले नाही आणि एकनाथ शिंदेंचेही भाषण या अंगाने ऐकले तर तेच जाणवले. आधी बरेचदा दोघेही जे बोलले त्याची पुनरावृत्ती जाणवली. भाषण तेव्हाच दीर्घकाळ लक्षात राहते वा परिणाम साधते जेव्हा त्यात भाषणाच्या आधीच अंदाज वर्तविता येणार नाही, असे काही तरी नवीन असेल. एखादा मित्र आपल्याला नवीन चांगल्या सिनेमाची स्टोरी सांगायला लागला की आपण त्याला लगेच थांबवतो अन् म्हणतो की प्लीज, स्टोरी सांगू नकोस. मला सिनेमा बघायचाय अन् तू स्टोरी सांगून टाकली तर बघण्यातला इंटरेस्ट निघून जाईल. सिनेमा बघण्याच्या आधीच स्टोरी माहिती असेल तर इंटरेस्ट निघून जातो. ठाकरे आणि शिंदे यांची भाषणे ऐकताना तेच जाणवत राहिले.

नेता बोलत जातो आणि श्रोते कान देऊन ऐकत राहतात. बोलता बोलता नेता एकदम काही तरी वेगळे बोलून जातो आणि तेच नेमके श्रोत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या मनाचा ठाव घेऊन जाते. बाळासाहेबांचे तसेच होते. मात्र, आज एकाच्या दोन शिवसेना होऊनही बाळासाहेबांच्या भाषणातील ते ठाव घेणे दिसत नाही. इतर सगळीकडे करतात तीच भाषणे ठाकरे, शिंदे दसरा मेळाव्यात करत असतील तर त्याचे वेगळेपण उरत नाही एवढेच. बाळासाहेबांच्या भाषणात ‘रिस्क फॅक्टर’ असायचा. मांडत असलेल्या भूमिकेच्या फायद्या-तोट्याचा आधी हिशेब करायचा आणि मग बोलायचे, असे त्यांनी केले नाही. ते जोखीम घ्यायचे; बिनधास्त बोलायचे. अशी जोखीम पत्करून धाडसाने बोलणारे नेते कमी होत आहेत. आजकाल सर्वच नेत्यांबाबत ते जाणवत राहते.

मुख्य नेत्यांच्या भाषणांबरोबरच सहकारी नेत्यांची भाषणेही लक्षात राहणे समजू शकतो; पण मुख्य नेत्यांऐवजी सहनेत्यांची भाषणे लक्षात राहणारी असतील तर ती अंर्तमुख करणारी गोष्ट आहे. सिनेमात मुख्य कलाकारापेक्षा सहकलाकाराने भाव खाऊन जाण्यासारखे वाटते ते. गर्दी तर दोघांकडेही मोठी होती. एका ठिकाणी लोक स्वयंस्फूर्तीने आले आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांना आणले होते वगैरे हा राजकारणाचा भाग झाला. 

दोन्ही सभांच्या ठिकाणी फेरफटका मारल्यानंतर एक जाणवले की ठाकरेंच्या सभेत बाहेरून आलेल्यांपेक्षा मुंबईतले लोक अधिक होते तर शिंदेंच्या सभेत मुंबईपेक्षा बाहेरून आलेले अधिक संख्येने होते. मुंबईत शिंदेंचा जम अजूनही म्हणावा तसा बसलेला नाही हे जाणवले. दुसरीकडे हेही वास्तव आहे की ठाकरेंच्या पक्षातले चाळीसएक माजी नगरसेवक एकेक करून शिंदेंच्या पक्षात गेले आहेत. त्यामुळे आज मुंबईत ठाकरेंचे वातावरण शिंदेंपेक्षा अधिक दिसत असले तरी उद्याच्या निवडणुकीत नेटवर्कचा, त्या त्या प्रभागातील नेत्यांचा विषय येईल तेव्हा कोणाचे पारडे भारी असेल, हे महत्त्वाचे ठरणार आहे. 

शिंदेंकडे सत्ता आहे आणि सत्तेचा योग्य वापर पक्षवाढीसाठी त्यांनी चार-सहा महिन्यांत केला तर चित्र बदलूही शकेल. ‘देणारे मुख्यमंत्री’ ही प्रतिमा कामाला येऊ शकते. कारण त्याबाबत उद्धव ठाकरे अगदीच डावे ठरतात. ठाकरेंना मुंबईत काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांची साथ कशी आणि किती लाभते अन् भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी एकनाथ शिंदेंना किती आणि कशी ताकद मुंबईत देते, यावर समोरचा खेळ अवलंबून असेल. शिंदे प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेतच. लोकांना आपले करण्याचे कौशल्य आणि सर्वांना ते आपले वाटतात, अशी प्रतिमा त्यांना उजवी ठरवत राहील.

दुसऱ्या दिवशी बहुतेक सर्व वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर ठाकरे-शिंदेंना अगदी आजूबाजूला आणि समान प्रसिद्धी दिली. एकाला पहिल्या पानावर घेतले आणि दुसऱ्याला आतल्या पानावर ढकलले असे केले नाही. उद्धव ठाकरेंचे भाषण सर्व चॅनलवाले दाखवत होते अन् थोड्याच वेळात शिंदेंचे भाषण सुरू झाले तरी चॅनलवाल्यांनी उद्धवप्रेम दाखवले. उद्धव यांचे भाषण थांबवून शिंदेंचे सुरू केले नाही. एरवी चॅनलना फार गोंजारले जाते; पण त्याचा विशेष फायदा होत नाही, हे आता लक्षात आलेच असेल. एकाच वेळी दोघांची भाषणे झाली तर चॅनलवाले उद्धवनाच दाखवतील हे वेळीच लक्षात येऊन शिंदे यांचे भाषण जरा उशिराने सुरू करायला हवे होते. सल्लागारांनी सल्ला नीट दिल्याचे दिसत नाही.


 

 

Web Title: shiv sena dasara melava balasaheb memory and thoughts are gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.