विखे-थोरातांचा बिनकनातीचा तमाशा अन् सेनेची नसती उठाठेव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 02:24 AM2020-06-25T02:24:56+5:302020-06-25T02:25:25+5:30

यावेळच्या तमाशाचे खास वैशिष्ट्य असे की, विखे-थोरात यांच्यातील सवाल- जबाबात शिवसेनेने नाहक आपला बाण ताणला आहे.

Shiv Sena Radhakrishna Vikhe Patil Over His Criticism Against Thorat | विखे-थोरातांचा बिनकनातीचा तमाशा अन् सेनेची नसती उठाठेव

विखे-थोरातांचा बिनकनातीचा तमाशा अन् सेनेची नसती उठाठेव

googlenewsNext

- सुधीर लंके
‘बिनकनातीचा’ तमाशा हा शब्दप्रयोग ग्रामीण भागात परिचित आहे. पूर्वी तमाशाला खास रंगमंच नसायचा. तो कोठेही सुरू व्हायचा आणि लोकांचे मनोरंजन करायचा. राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात व शिवसेना यांनी सध्या असाच तमाशा आरंभला आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना निष्ठावान कोण व लाचार कोण? यावर यांचे वगनाट्य सुरूझाले आहे. यावेळच्या तमाशाचे खास वैशिष्ट्य असे की, विखे-थोरात यांच्यातील सवाल- जबाबात शिवसेनेने नाहक आपला बाण ताणला आहे.
थोरात-विखे हा वाद राज्याला नवा नाही. मध्यंतरी या दोघांना ‘टॉम अँड जेरी’ची उपमा दिली गेली होती. हे दोघेही दीर्घकाळ काँग्रेस या एकाच पक्षात होते. दोघेही साखर कारखानदार व एकाच जिल्ह्यातील. मतदारसंघही एकमेकाला लागून. तरीही त्यांचे पटत नाही. ते सोयीने भांडतात व सोयीने वेळप्रसंगी एकत्रही येतात. (हो, ते एकत्र येतात. कारण आजवर या दोघांनी कधीही विधानसभा निवडणुकीत एकमेकाला अडचणीत आणलेले नाही.) या दोघांचे राजकारण समजून, उमजून आपापल्या सोयीने पद्धतशीर सुरूअसते. तिसऱ्या माणसाला ते लवकर कळत नाही. त्यामुळे त्यांच्यात जो पडतो तोच मुर्खात निघतो.


सध्या थोरात महाविकास आघाडीत मंत्री आहेत, तर विखे विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये. ‘आपण एवढी वर्षे काँग्रेसमध्ये होतो; पण सत्तेसाठी लाचार झालेला प्रदेशाध्यक्ष आपण पाहिला नाही,’ अशी टीका विखेंनी थोरातांवर केली. त्यावर थोरात यांनीही प्रत्युत्तर दिले. ‘विरोधी पक्षनेते असताना राधाकृष्ण विखे यांना आपण अनेकदा मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना पाहिले,’ असे ते म्हणाले. म्हणजे विखे हे सतत देवेंद्र फडणवीस यांचे उंबरठे झिजवत होते, असे त्यांना म्हणायचे आहे. या दोघांमध्ये हा सवाल-जबाब नेहमी सुरूच असतो. विखे आपल्या शैलीप्रमाणे आक्रमक बोलतात, तर थोरात मवाळपणे; पण साखरेतूनही कडू गोळी देण्यात थोरात माहीर आहेत. या दोघांचीही ही भांडणे जनतेला आता सरावाची झाली आहेत. त्यांच्या या भांडणात शिवसेनेला नावीन्य का वाटले? हे आश्चर्य आहे.
विखेंनी थोरातांवर केलेली टीका त्यांच्यापेक्षाही शिवसेनेला अधिक झोंबलेली दिसते. म्हणून त्यांनी आपल्या मुखपत्रातून ‘विखेंची टुरटुर’ या अग्रलेखातून विखे यांचे वाभाडे काढले. विखे सतत पक्षांतर करीत असल्याने सेनेने त्यांना ‘टूर्स अँड ट्रॅव्हल’ कंपनीची उपमा दिली. वास्तविकत: युती सरकारच्या काळात राधाकृष्ण विखे व त्यांचे वडील बाळासाहेब यांना सेनेत प्रवेश देऊन सेनेनेही या कंपनीशी भागीदारी केली होती. अगदी अलीकडे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी उद्धव ठाकरे संगमनेर या थोरातांच्या मतदारसंघात त्यांच्या विरोधात शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते. तेव्हाही ठाकरे यांनी ‘मातोश्री’वरून आणलेली ओंजळभर फुले राधाकृष्ण विखेंवर उधळली होती. ‘थोरात यांनी आता घरी बसायला हरकत नाही’ असे उद्धव त्यावेळी म्हणाले होते. ‘तुम्ही आमच्यासोबत आलात ते बरे झाले. कारण, तिकडे कर्मदरिद्री लोक आहेत. आज मला बाळासाहेब ठाकरे व बाळासाहेब विखे या दोघांचीही आठवण येते’ असेही उद्धव हे विखे यांना म्हणाले होते. म्हणजे विखे यांनी काँग्रेसमधून भाजपत जे पक्षांतर केले, त्याचे ठाकरे यांनी समर्थन केले होते. त्यांच्याच मुखपत्राने आज विखे यांना सततच्या पक्षांतरामुळे ‘टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनी’ म्हणून संबोधले. ‘थोरात यांनी घरी बसावे’ असा सल्ला देणारा पक्ष आज थोरात यांच्यामुळेच सत्ता उपभोगतो आहे. त्यामुळे विखे जशा भूमिका बदलतात, तशी शिवसेनाही भूमिका बदलते हे या सर्व पुराणावरून ध्यानात येते. शिवसेनेच्या मुखपत्रातून झालेल्या टीकेनंतर विखे यांनी खासदार संजय राऊत यांना उद्देशून पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी सेनेऐवजी व्यक्तिगत राऊत यांच्यावर टीका केली आहे. ‘राऊत यांची छाती फोडून पाहिली तर एकाच वेळी उद्धव ठाकरे व शरद पवार असे दोघेही नेते दिसतील’ असे विखे पत्रात म्हणतात. राऊत हे ‘मातोश्री’शी निष्ठावान नाहीत. तसेच त्यांचे बोलविते धनी पवार असावेत, असेही विखे या पत्रातून ध्वनीत करू इच्छितात.

राज्य कोरोनात होरपळत असताना ही टीकाटिपण्णी जनतेचे काय भले करणार? शाळा, कॉलेज बंद असताना ‘बालिश बहु बायकांत बडबडला हा’ हा अनुप्रास अलंकार ही मंडळी कोणाला शिकवू पाहत आहेत. विखे हे दुसऱ्यांचे वाकून पाहतात अशी टीका सेनेने केली आहे; पण नगर जिल्ह्यात अनेक शिवसैनिक विखेंच्या ताटाखालचे मांजर आहेत. जिल्ह्यात अनेक शिवसैनिक हे विखे सैनिक म्हणूनच ओळखले जातात, हे सेनेला ठाऊक नसावे का? विखे-थोरातांच्या या बिनकनातीच्या तमाशात सेनेची नसती उठाठेव कशासाठी? हे अनेकांना उलगडलेले नाही. विखे-थोरात वाद राज्याला नवीन नाही. हे नेते सोयीने भांडतात व सोयीने एकत्रही येतात. या दोघांच्या तमाशात यावेळी शिवसेनेने एंट्री का मारली आहे? हे सैनिकांनाही उमगले नसेल.

(आवृत्तीप्रमुख, लोकमत, अहमदनगर)

Web Title: Shiv Sena Radhakrishna Vikhe Patil Over His Criticism Against Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.