दसरा मेळाव्याचे सीमोल्लंघन, शिवाजी पार्कात की बीकेसीवर..?

By अतुल कुलकर्णी | Published: September 25, 2022 09:59 AM2022-09-25T09:59:07+5:302022-09-25T10:00:40+5:30

जल्लोष करा... गुलाल उधळा... बँड वाजवा... शिवाजी पार्कवर एका साहेबांना परवानगी मिळाली आहे... दुसऱ्या साहेबांनी रीतसर पैसे भरून बीकेसीचे मैदान ताब्यात घेतले आहे..!

shiv sena uddhav thackeray eknath shinde dasara melava shivaji park bkc ground spacial article | दसरा मेळाव्याचे सीमोल्लंघन, शिवाजी पार्कात की बीकेसीवर..?

दसरा मेळाव्याचे सीमोल्लंघन, शिवाजी पार्कात की बीकेसीवर..?

googlenewsNext

अतुल कुलकर्णी,
संपादक, मुंबई 

प्रिय कार्यकर्त्यांनो,
नमस्कार.
जल्लोष करा... गुलाल उधळा... बँड वाजवा... शिवाजी पार्कवर एका साहेबांना परवानगी मिळाली आहे... दुसऱ्या साहेबांनी रीतसर पैसे भरून बीकेसीचे मैदान ताब्यात घेतले आहे..! आता एक साहेब, दुसऱ्या साहेबाला मैदान मिळू नये म्हणून दिल्लीत जाणार आहेत...! तर दुसरे साहेब, पहिल्या साहेबांचे मनसुबे उधळून लावण्याच्या तयारीत आहेत. तेव्हा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनो, डबे वाजवा... थाळी वाजवा... मिळेल ते वाजवा... कारण आपल्याला पूर्वी एकाच मैदानावरून विचाराचे सोने मिळत होते. आता तसे होणार नाही... यावेळी दसरा-दिवाळीच्या तोंडावर... विचारांचा डबल धमाका सेल आहे..! दसऱ्याच्या मुहूर्तावर विचारांचे सोने मोफत लुटण्याची नामी संधी आहे..! 

या डबल धमाक्याची झलक नेस्को संकुलात आणि राजधानी दिल्लीत दिसून आली आहे. त्या दिवशी एकाने महाराष्ट्रात बाप पळवणारी टोळी आल्याचे जाहीर केले... तर दुसऱ्याने, बापाचा पक्ष विकणारी टोळी असल्याचे सांगून टाकले..! त्यामुळे दसऱ्याच्या मेळाव्यात एकदम बावनकशी सोनं मिळणार, हे निश्चित..! एका साहेबांनी कमळाबाई आणि ‘मिंधे’ गट राज्यात सक्रिय झाल्याचे सांगितले... तर दुसऱ्या साहेबांनी आम्ही ‘मिंधे’ नाही ‘खंदे’ गट आहोत, असे सांगून टाकले. या साहेबांनी अस्मान दाखवण्याची भाषा केली... त्या साहेबांनी तीन महिन्यांपूर्वीच तुम्हाला अस्मान दाखवले, असे सांगून टाकले... हे फक्त ट्रेलर होते...! खरा सिनेमा दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळेल.

कोण गद्दार, कोण खुद्दार याचे उत्तर लवकरच मिळेल. ही लढाई गद्दार आणि खुद्दार यांच्यात आहे. मुंबई कोणाच्या बापाची..? याचे उत्तरही यानिमित्ताने मिळेल, असा आशावाद घेऊन तुम्ही जर विचारांचे सोने लुटण्याच्या मोहिमेत सहभागी होणार असाल, तर तुमच्या अपेक्षा चूक नाहीत. नक्की तुम्हाला याचे उत्तर त्या दिवशी मिळेल... खुद्दार आणि गद्दारांची लढाई एकमेकांचे बाप काढण्यापर्यंत पोहोचली आहे. ‘मेरी कमीज से तुम्हारी कमीज सफेद कैसी’, त्या धर्तीवर माझे हिंदुत्व पक्के, तुझे कच्चे, अशी हिंदुत्वाची नवीन व्याख्याही ऐकायला मिळू शकते. हे कलियुगातले विचारमंथन आहे. वासुकी नावाच्या नागाने देव आणि असुरांना समुद्रातून अमृत काढण्यासाठी समुद्रमंथनाकरिता मदत केली होती. त्यातून अमृत कोणाला मिळाले..? आणि विष कोणाच्या वाट्याला आले, ही कथा तुम्हा सगळ्यांना माहिती आहे.

यानिमित्ताने विचारांचे मंथन होणार आहे. त्या मंथनातून मराठी साहित्यात अनेक नवनव्या शब्दांची भर पडण्याची शक्यता आहे. मराठी शब्दकोश समृद्ध करण्याची या डबल धमाक्याच्या निमित्ताने आयती संधी चालून आली आहे. कोणत्या बाजूने मराठी साहित्यात जास्त भर पडेल, याची नोंद ठेवायला तयार राहा. तो एक ऐतिहासिक क्षण असेल. याआधी मैद्याचे पोते, अवलाद, गद्दार-खुद्दार, बाप विकणारे, वाकड्या तोंडाचे गांधी, पिलावळ, बारा पारावरचा मुंजा हे शब्द मराठी साहित्यात डौलाने विराजमान झाले आहेत, हे तुम्हाला माहीत आहेच.

अशावेळी काही बोरुबहाद्दर पत्रकार रस्त्यावरचे खड्डे, शाळांची दुरवस्था, आरोग्याची हेळसांड, आदिवासी महिलांना झोळीत दवाखान्यात न्यावे लागते... असले निरर्थक प्रश्न उपस्थित करतील. विकासाचे मुद्दे किती मांडले गेले, याची विचारणा करतील. मात्र अशा फुटकळ गोष्टींकडे आणि उठवळ पत्रकारांकडे लक्ष देऊ नका. शेवटी धर्म... जाज्वल्य अभिमान... या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. ते आहे तर सगळं आहे. तेव्हा चला, तयारीला लागा... शिवाजी पार्कच्या दिशेने जायचं की बीकेसीच्या मार्गानं...? हे मनात पक्के करा... यावर्षी सीमोल्लंघनासाठी दोन मार्ग आपल्यासमोर आहेत... या साहेबांचे आणखी काही आमदार त्या साहेबांकडे सीमोल्लंघनासाठी जाण्याची तयारी करत असल्याच्या बातम्या आहेत. तुम्ही विचार करा... सीमोल्लंघनासाठी कोणत्या दिशेनं जायचं हे ठरवा... शेवटी विचारांचं सोनं लुटणं जास्त महत्त्वाचं आहे. डबल धमाका सेल आहे. कुठे जास्त डिस्काउंट मिळतो, ते पाहा... शेवटी ‘गांधी’ विचार गाठीला आला पाहिजे, तेच शाश्वत सत्य आहे, हे विसरू नका..! उगाच नाही ‘गांधी’ विचार जगभरात टिकला आहे...
- तुमचाच, बाबूराव

Web Title: shiv sena uddhav thackeray eknath shinde dasara melava shivaji park bkc ground spacial article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.