शिवशक्ती-भीमशक्ती, लिट्टी चोखा-पुरणपोळी!
By यदू जोशी | Published: November 25, 2022 02:51 PM2022-11-25T14:51:53+5:302022-11-25T14:52:17+5:30
Maharashtra Politics: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात घरातल्या दुभंगाबरोबरच भाजप, मनसेनेही घुसखोरी केली आहे. त्यामुळे इतरही मतदारांना चुचकारण्यावाचून गत्यंतर नाही!
- यदु जोशी
(सहयोगी संपादक, लोकमत)
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नवीन मित्र शोधावे लागत आहेत. २५ वर्षे युतीत सडल्याचे सांगत भाजपशी काडीमोड घेतल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणारे ठाकरे यांनी आता ॲड. प्रकाश आंबेडकर यांना साद घातली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकारांच्या पुरोगामी विचारांचा धागा त्यांनी त्यासाठी पकडला. असे धागे अधूनमधून कामास येतात. रिडल्स, नामांतर, एमआयएमशी दोस्ती हे विषय त्यावेळी विसरायचे असतात. आता आंबेडकरांची भीमशक्ती आणि ठाकरेंची शिवशक्ती एकत्र येण्याची चिन्हं आहेत. ॲड. आंबेडकरांमुळे होणारे मतांचे विभाजन भाजपच्या पथ्यावर पडते हा पूर्वानुभव लक्षात घेता ठाकरे त्यांना जवळ घेऊ पाहत असावेत. सध्याच्या दलित नेत्यांपैकी ॲड. प्रकाश आंबेडकर हे व्यापक आणि प्रभावी आहेत.
ते निवडणुकीचे राजकारण करतात; त्यांचे आठवलेंसारखे मागच्या दाराने नसते. मतांवर परिणाम करणारे नेते म्हणूनच ते ठाकरे आणि अजित पवारांनाही हवे आहेत. भाजपलाही ते कधीकधी हवेच असतात. ॲड. प्रकाश आंबेडकर मात्र दरवेळी नवीन मित्र शोधतात. गेल्या वेळी त्यांनी काँग्रेसला हात केला होता; पण एमआयएमसोबत गेले. यावेळी यादीत शिवसेना दिसते!
पूर्वी मुंबईत निवडणूक म्हटली की उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी तेथील नेत्यांना प्रचारासाठी इथे आणले जायचे. आता उलटे घडत आहे. शिवसेनेला बिहारमध्ये जावे लागत आहे. आदित्य ठाकरे तेथील मुख्यमंत्री नितीशकुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना भेटले. भाजपविरोधातील बिहारी मते मुंबई महापालिका निवडणुकीत आपल्या बाजूने वळावीत हा त्यामागचा हेतू दिसतो.
नितीशकुमार किंवा तेजस्वी यादव यांच्या पक्षांचे कुठलेही बळ मुंबईत नाही; पण त्यांना मानणारे बिहारीबाबू मात्र आहेत. या दोन नेत्यांशी आपली जवळीक असल्याचे दाखवत मुंबईतील बिहारींवर प्रभाव टाकण्याची खेळी दिसते. हक्काच्या मराठी टक्क्यात आपल्याच घरातून वाटेकरी निर्माण झालेले असल्याने अन्य घरांतील मते आपल्या झोळीत पाडून घेण्याचा खटाटोप त्यांना करावाच लागणार आहे.
एरवी हुकमी मराठी मतांच्या जोरावर जिंकणाऱ्या शिवसेनेला भाजप, मनसे आणि आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केलेली विभागणी यामुळे इतरही मतदारांना चुचकारणे आवश्यक झाले आहे. मुंबईतील भाजपविरोधी हिंदीभाषिक मतदार काँग्रेसकडे वळतो, असा आजवरचा अनुभव आहे. तसेच याहीवेळी झाले तर ते ‘मातोश्री’ला परवडणारे नाही. उद्या समजा शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशी युती मुंबईत झाली तरी विनाप्रयासाने हिंदी भाषिक मते ठाकरेसेनेच्या पारड्यात पडण्याची शक्यता नाही. म्हणूनच आज बिहारला गेले, उद्या कदाचित लखनौला जाऊन अखिलेश यादव यांनाही भेटतील. स्वत:च्या कक्षा रुंदावणे ही कधीकधी राजकीय अपरिहार्यतादेखील असते. एकेकाळी छटपूजेला विरोध करणाऱ्यांना ‘मराठी-बिहारी भाईभाई’ म्हणावे लागत आहे. मुंबईतील विजयासाठीच्या प्रयत्नांचा रस्ता व्हाया पाटणा जाताना दिसत आहे. लिट्टी चोखा (बिहारी पदार्थ) आणि पुरणपोळी एकाच ताटात वाढण्याचा हा प्रयत्न आहे. मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुका लगेच होतील असे वाटत नाही. न्यायालयीन निर्णय का येतो यावर निवडणुकांच्या तारखा अवलंबून असतील. मध्ये किमान तीनचार महिन्यांचा काळ गेला तर महापालिकेशी ठाकरे सेनेची असलेली नाळ आणखीच ढिली होईल. कॅगच्या चौकशीचा ससेमिरा लागलेला आहेच. शिंदे-फडणवीस सरकार महापालिकेचा कारभार हाकून मातोश्रीची कोंडी करेल. तोवर ठाकरेंकडील काही खासदार व आमदार गळाला लावले जातील. महापालिका निवडणूक जवळ येईल तसे ठाकरेसेनेचे नगरसेवक शिंदे गटात वा भाजपत जाताना दिसतील.
मनसेनेही भाजप-शिंदेंना साथ दिली तर आणखी अवघड होईल. ही सगळी शक्यता लक्षात घेऊनच धडपड सुरू आहे. दिल्लीहून काँग्रेसश्रेष्ठींचा असा निरोप आहे म्हणतात की मुंबईत ठाकरेसेनेसोबतच निवडणूक लढा. तसे झाले तर दोघांना आपापली व्होट बँक ही एकमेकांकडे वळती करावी लागेल. हिंदुत्ववादी प्रतिमा जपताना ठाकरेसेनेला धर्मनिरपेक्ष मते आपल्याकडे वळवावी लागतील आणि हिंदुत्ववादी मते पदरात पाडून घेतानाही कसरत करावी लागेल.