Shiv Shankar Bhau Patil: शिवशंकरभाऊ : मातीत रुजलेल्या समर्पणाची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 05:50 AM2021-08-05T05:50:44+5:302021-08-05T05:51:36+5:30

Shiv Shankar Bhau Patil: शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानचे शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निस्पृह जीवनाची सार्थक वाटचाल त्यांच्या निधनाने विसावली आहे...

Shivshankarbhau: The story of devotion rooted in the soil | Shiv Shankar Bhau Patil: शिवशंकरभाऊ : मातीत रुजलेल्या समर्पणाची कहाणी

Shiv Shankar Bhau Patil: शिवशंकरभाऊ : मातीत रुजलेल्या समर्पणाची कहाणी

googlenewsNext

- - राजेश शेगोकार
(उपवृत्त संपादक, लोकमत, अकोला)
दर शुक्रवारी शेगावातील संत गजानन महाराज संस्थानमधील दान पेट्या उघडल्या जातात. मंदिराच्या परिसरातच असलेल्या पाठशाळेत विश्वस्त व दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या उपस्थितीत भक्तांनी दिलेले दान माेजले जाते. दानपेटीत निघालेले साेने, चांदी, हजार पाचशेच्या नाेटा, वेगवेगळ्या केल्या जात असताना एका व्यक्तीचे लक्ष मात्र या दानपेटीत आलेल्या दहा, वीस व पंचवीस पैशांच्या नाण्यांकडे असते, ही नाणी दिसली म्हणजे एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद पसरताे... जाेपर्यंत दानपेटीत ही नाणी येतील ताेपर्यंत संस्थानच्या सेवाकार्यावरील गरिबांचा विश्वास कायम राहील, अशी धारणा असलेली ती व्यक्ती म्हणजे संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील. त्यांच्या लेखी सामान्य भक्तांनी दिलेले हे दान संस्थानसाठी ‘लाख’मोलाचेच राहिले. कारण अशा भक्तांच्या श्रद्धेतूनच संस्थानचा आदर्शवत डोलारा उभा राहिला. या संस्थेच्या उभारणीसाठी सामान्य भक्तांनी दिलेला खारीचा वाटा सदैव लक्षात ठेवूनच उपक्रम राबविले जातात. त्यामुळे हे संस्थान इतकं चांगलं व्यवस्थापन कसे काय करू शकते, हा कुतूहलाचा विषय झाला आहे. हे सर्व शक्‍य झाले ते केवळ  शिवशंकरभाऊ पाटील यांच्या दूरदृष्टी व्यक्तिमत्त्वामुळेच. 
भाऊ म्हणजे व्यवस्थापनाचे चालतेबोलते आदर्श विद्यापीठ. पांढरे शुभ्र धोतर, सदरा, डोक्यावर गांधी टोपी अन्‌ गळ्यात पांढरा रुमाल अशा वेशातील भाऊंनी कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प हाती घेतले, पूर्णत्वास नेले. पण, कोटीच्या कोटी उड्डाणे त्यांच्यातील साधूवृत्तीला कधीही विचलित करू शकले नाहीत. कारण सर्वसामान्य भक्तांच्या कष्टाच्या पाच-दहा पैशाचे मूल्य त्यांनी जाणले... त्यामुळे एकेकाळी केवळ ४५ लाखांचे उत्पन्न असलेले श्री संत गजानन महाराज संस्थानचे बजेट आता दाेनशे काेटींच्या घरात पोहोचले आहे. मात्र, तरीही संस्थानमध्ये सोन्या-चांदीचा झगमगाट नाही तर मानवतेचा व सेवेचा भाव पदोपदी दिसून येतो तो केवळ शिवशंकरभाऊ नावाच्या विद्यापीठामुळेच. 
१९५८पासून श्री संत गजानन महाराज संस्थानच्या सेवेत सेवाधारी असलेले भाऊ, १९६२ मध्ये विश्‍वस्त झाले व १९७८ मध्ये व्यवस्थापक झाले. संस्थानच्या सेवेत येण्यापूर्वी भाऊ राजकारणाचाही दरवाजा ठोठावून  आले. थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर त्यांनी केलेल्या विकासकामांची आजही चर्चा होते. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी त्यांना विधानसभा किंवा लोकसभेची उमेदवारी देऊ केली होती. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या कुठल्याही नेत्यासाठी ही सुवर्णसंधी होती. मात्र, हा माझा मार्ग नाही, असे ठामपणे सांगत भाऊंनी सेवावृत्ती निवडली ती आयुष्याच्या अखेरपर्यंत जपली. भाऊंनी व्यवस्थापनशास्त्रालाही अचंबित होईल असे विश्‍व उभारले आहे. ‘आनंद सागर’ हा त्यातीलच एक उपक्रम. 
या प्रकल्पाचे काम सुमारे १५ वर्षे चालेल व किमान ३०० ते ५०० कोटींचा खर्च येईल, असा तज्ज्ञांचा अंदाज होता. संस्थेकडे तेव्हा केवळ ३० लाख शिल्लक होते. त्यामुळे आनंद सागरसाठी बँकेचे १५ कोटी रुपये कर्ज घेऊन केवळ तीन वर्षात म्हणजे २५ कोटीमध्ये प्रकल्प पूर्ण झाला. या प्रकल्पाचे  व संस्थानचे व्यवस्थापन पाहून जागतिक कीर्तीचे विक्रम पंडित यांनासुद्धा भुरळ पडली व आरोग्यसेवेच्या माध्यमातून त्यांनी आपली सेवा रुजू केली. त्यांनी ७०० कोटी रुपये देऊ केले, मात्र भाऊंनी आराेग्य याेजनेचा आराखडा तयार करत फक्त ७० कोटी रुपये घेतले. त्याची परतफेड केली. 
शंकरबाबा पापळकर या शेकडाे अनाथांच्या बापाला त्यांचा मदतीचा हात सतत मिळाला; पण भाऊंनी कुठेही गवगवा केला नाही, देवावर श्रद्धा नसलेले बाबा आमटेही भाऊंच्या कामाने प्रभावित झाले हाेते. शेगावातील यात्राेत्सवात लाखाे भाविक येतात, मात्र कुठेही अव्यवस्था दिसून येत नाही. प्रत्येक भाविकाला महाप्रसाद मिळेलच याची खात्री असते. अतिशय कमी खर्चात निवासव्यवस्था, मोफत प्रवासव्यवस्था, नाममात्र शुल्कामध्ये वैद्यकीय उपक्रम हे सारे प्रकल्प राबविताना जे व्यवस्थापनशास्त्र वापरले गेले आहे तो पॅटर्न देशभरात कुठल्याही संस्थेत दिसत नाही. संत गजानन महाराजांच्या जुन्या मंदिराचा जीर्णाेद्धार करताना संपूर्ण मंदिरच बदलले; पण एकही दिवस दर्शन व्यवस्था बंद नव्हती व कुठेही बांधकामाचा मलबा दिसून आला नाही, 
 संस्थानने पंढरपूर व त्र्यंबकेश्वर येथे श्रींचे मंदिर उभारले. कपिलधारा, आळंदी, ओंकारेश्वर, गिरडा आदी ठिकाणी शाखा सुरू केल्या. संस्थानच्या या प्रत्येक शाखेत तीच शिस्त, तोच सेवाभाव व तीच व्यवस्था दिसून येते.  माहिती तंत्रज्ञानाचा आधार घेत उभारलेले अभियांत्रिकी महाविद्यालय जसे नव्या युगाचे प्रतीक करण्याचे तसेच आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राबविलेल्या प्रकल्पांसोबतच आज सातपुड्यातील आदिवासींची संपूर्ण पिढी शिक्षित करण्याचे श्रेयसुद्धा शिवशंकरभाऊ यांनाच जाते. मनाचा पवित्रपणा अन्‌ सेवेची वृत्ती यामधूनच व्यवस्थापन गुरू कसा असावा आदर्श त्यांनी घालून दिला. त्यांच्या कार्याचे भाविकांना कायम स्मरण राहील. 

Web Title: Shivshankarbhau: The story of devotion rooted in the soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.