शिवीगाळीला म्हणे सहकार्य हवे ...
By admin | Published: February 25, 2016 04:41 AM2016-02-25T04:41:51+5:302016-02-25T04:41:51+5:30
आम्ही तुम्हाला शिव्या देऊ, तुम्ही मात्र आम्हाला सहकार्य करीत राहा, हा भाजपा सरकारचा काँग्रेस पक्षाला दिला जात असलेला मूक सल्ला हे त्याच्या नित्याच्या दुटप्पी व्यवहाराचेच एक नवे
आम्ही तुम्हाला शिव्या देऊ, तुम्ही मात्र आम्हाला सहकार्य करीत राहा, हा भाजपा सरकारचा काँग्रेस पक्षाला दिला जात असलेला मूक सल्ला हे त्याच्या नित्याच्या दुटप्पी व्यवहाराचेच एक नवे चिन्ह आहे. सरकारला विरोध म्हणजे देशाला विरोध, सरकारच्या नेतृत्वाचा उपहास म्हणजे देशद्रोह आणि सरकारला सहकार्य म्हणजेच देशभक्ती ही विचारसरणी लोकशाहीची नाही. जगात ती फॅसिझम म्हणून ओळखली जाते. गेल्या दोन वर्षांत व त्याही आधीपासून भाजपाच्या प्रवक्त्यांनी आणि पुढाऱ्यांनी काँग्रेस पक्षासह देशातील इतर विरोधी पक्षांवर केलेली टीका शिवीगाळीच्या पातळीवर जाणारी होती. या पक्षांवर भाजपाने देशद्रोहापासूनचे सारे गंभीर आरोप केले. देशद्रोह ही जगातली सर्वात वाईट शिवी आहे आणि तिची सरसकट उधळमाधळ करणाऱ्यात भाजपाचा हात कोणी धरणार नाही. सरकारविरोधी मोर्चे आणणाऱ्यांना त्याने देशविरोधी म्हटले. डाव्या पक्षांना आरंभापासून त्यांनी देशद्रोही अशी शिवी दिली. काँग्रेस पक्षाला देशबुडव्यांचा पक्ष असेच ते म्हणत आले. ही सवय थेट व्यक्तिगत पातळीवर जाऊन तो पक्ष रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्यापासून दिल्लीच्या नेहरू विद्यापीठातील कन्हैया या विद्यार्थ्यापर्यंत साऱ्यांसाठीच तशी विशेषणे वापरीत आला. या विद्यार्थ्यांसोबत असलेल्या प्राध्यापकांपासून सहकाऱ्यांपर्यंतच्या साऱ्यांनाच भाजपाच्या मते ते विशेषण लागू होणारे आहे. काँग्रेसला व विशेषत: गांधी घराण्याला शिवीगाळ करताना भाजपाच्या अनेकाना साध्या सभ्यतेचीही जाण उरत नाही. मध्यप्रदेशातील भाजपाच्या एका आमदाराने काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना ते गांधी घराण्याचे बेकायदा वारस (नाजायज औलाद) आहेत अशी अत्यंत घाणेरडी व संतापजनक शिवीगाळ दिली आहे. ती एकट्या राहुल गांधींनाच नव्हे तर सोनिया आणि राजीव गांधी यांच्यावरही चिखलफेक करणारी आहे. या आमदाराचे भाजपाने कौतुक केले की नाही हे अजून कळले नसले तरी त्या पक्षाने त्याला साधी ताकीद दिल्याचे दिसले नाही, हे मात्र खरे आहे. आम्ही तुम्हाला देशद्रोही म्हणू, तुमच्यावर देशविरोधाचा आरोप करू आणि झालेच तर तुम्हाला नाजायज म्हणू, तुम्ही मात्र संसदेत आमच्या वैधानिक कार्यक्रमाला साथ दिली पाहिजे हा मोदींपासून व्यंकय्यांपर्यंतच्या साऱ्यांचा धोशा केवढा विषारी किंवा निरर्थक ठरतो हे येथे जाणकारांनी लक्षात घ्यायचे. लोकशाहीत विरोधी पक्षांनी सरकारवर टीका करावी आणि सरकारनेही त्या टीकेला सणसणीत उत्तर द्यावे हे अपेक्षित आहे. मात्र या देवाणघेवाणीत किमान सभ्यतेचे पालन साऱ्यांनी करावे हे अपेक्षित आहे. त्यातून भाजपा हा धर्माशी नाते सांगणारा पक्ष आहे. हिंदू धर्म अशा अर्वाच्य शिवीगाळीला मान्यता देत नाही. त्या महान धर्माने शत्रूंनाही सभ्यतेने वागविण्याची शिकवण देशाला दिली आहे. त्या धर्माचे बिरुद लावून हिंडणाऱ्या पक्षाच्या पुढाऱ्यांनी आपल्या राजकीय विरोधकांबाबत टीकेची असली तरी किमान सभ्यतेची पातळी सोडू नये हे अपेक्षित आहे. मात्र आम्हीच तेवढे देशभक्त आहोत आणि आम्हाला वगळता बाकीचे सारे देश बुडवायलाच निघाले आहेत अशी धारणा करून घेणाऱ्यांकडून अशा सभ्यतेची अपेक्षा करणे हीच चूक होते. या पक्षाच्या लोकांनी १९७७ च्या निवडणुकीतील पराभवानंतर इंदिरा गांधी देश सोडून पलायन करतील असा प्रचार समाजात करून पाहिला. त्यांच्या दुर्दैवाने १९८० च्या निवडणुकीत इंदिरा गांधींना लोकांनी प्रचंड बहुमतानिशी पुन्हा सत्तेवर आणले. राजीव गांधींचे सरकार १९८९ मध्ये सत्तेवरून पायउतार झाले तेव्हा स्वत: राजीव गांधी आपल्या पत्नी व मुलांसह देश सोडून इटलीच्या आश्रयाला जातील अशी भाषा भाजपा व संघाच्या लोकांनी खाजगीत देशभर केली. मात्र त्यानंतरही देशाने काँग्रेसला पुनश्च एकवार सत्तेवर आणले. काँग्रेसच्या राजवटीत झालेला हिंसाचार देशविरोधी होता आणि आमच्या राजवटीतला हिंसाचार मात्र देशभक्तीपर होता असाच बनाव भाजपाच्या प्रवक्त्यांनी आणि पुढाऱ्यांनी आजवर केला. त्यांनी दिल्लीतील शीखविरोधी हिंसाचार देशद्रोही ठरविला आणि गुजरातेतील मुस्लीम विरोधी हिंसाचार देशभक्तीपर ठरविला. इंदिरा गांधींची हत्त्या करणाऱ्या गुन्हेगारांचा गौरव करणाऱ्या व केंद्र सरकारला दुबळे करू शकणाऱ्या आनंदपूर साहिब ठरावाशी एकनिष्ठ असणाऱ्या अकाली दलाशी भाजपाने राजकीय सख्य केले आणि ते देशभक्तीपर असल्याचे देशाला सांगितले. दिल्लीत अरविंद केजरीवालांच्या आप पक्षाने भाजपाला धूळ चारली. भाजपाच्या लोकांनी केजरीवालांवर राजकीय बालिशपणाचा व देशविरोधाचा आरोप केला. केजरीवालांच्या पाठोपाठ नितीशकुमारांनी बिहारमध्ये त्या पक्षाला अस्मान दाखविले. नितीशकुमारांवर तसा आरोप करण्याची हिंमत भाजपाला अजून झाली नसली तरी काही लोक लालूप्रसाद यांच्यावर तसा आरोप करून मोकळे झाले. ही स्थिती संसदेत विरोधकांचे सहकार्य मागण्यासाठी उपयुक्त आहे असे वाटणाऱ्यांच्याच बुद्धीची कीव केली पाहिजे.