सजा झालीच पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 05:02 AM2018-01-16T05:02:42+5:302018-01-16T05:02:46+5:30
डहाणूलगतच्या सागरात ४० विद्यार्थ्यांनी भरलेली लाँच बुडून तीन विद्यार्थिनी प्राणास मुकल्या. ही दुर्घटना असली तरी तिला कारणीभूत असलेले लाँचचे मालक, वाहक, खलाशी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत
डहाणूलगतच्या सागरात ४० विद्यार्थ्यांनी भरलेली लाँच बुडून तीन विद्यार्थिनी प्राणास मुकल्या. ही दुर्घटना असली तरी तिला कारणीभूत असलेले लाँचचे मालक, वाहक, खलाशी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. तशाच स्वरूपाचे गुन्हे बंदर खात्याचे, मेरिटाइम बोर्डाचे, सागरी पोलीस दलाचे आणि महसूलचे संबंधित अधिकारी यांच्याविरुद्धही दाखल झाले पाहिजेत; आणि हे सर्व खटले जलदगती न्यायालयात चालवून त्यांना कठोर सजाही झाली पाहिजे. सागरी पोलिसांच्या स्पीड बोटी नादुरुस्त होत्या. परिणामी त्या वापरता आल्या नाहीत. त्यामुळे बचावकार्य उशिरा सुरू झाले. त्याची किंमत तीन विद्यार्थिनींना जीव देऊन मोजावी लागली. या बोटी सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी कोणाची होती? कुणी हलगर्जी केली? याचा सखोल तपास व्हायला हवा. महसूलची यंत्रणा पूर्वी ठाणे जिल्हा असताना दुर्घटनास्थळी पोहोचण्यासाठी जेवढा वेळ घ्यायची तेवढाच वेळ तिने पालघर जिल्हा झाल्यानंतरही पालघरहून घटनास्थळी येण्यासाठी घेतला. यालाही जबाबदार जे कुणी असतील त्यांच्याविरुद्धसुद्धा कायद्याचा फास आवळला पाहिजे. बोटी मिळाल्यात; पण त्यांच्या वापरासाठी लागणारे डिझेल, पेट्रोल, चालक, देखभालीसाठी तंत्रज्ञ यांचा पत्ताच नाही. त्यासाठी आर्थिक तरतूद नाही. आवश्यक ते परवाने आणि सुरक्षात्मक यंत्रणा, सुविधा आहेत की नाही याची खातरजमा कुणी करीत नाही, हे सारेच भयानक आहे. मुंबईवरील हल्ला झाल्यानंतरही ही बेफिकिरीची स्थिती कायम आहे. मुंबईवरील हल्ल्यानंतर मुंबई परिसरातील सर्वच टोलनाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले. परंतु नव्या मुंबईतून आरडीएक्सचा साठा सुरत आणि अहमदाबादमध्ये गेला तो ठाणे, भिवंडी, वाडामार्गे हे कळाल्यावर तेथील टोलनाक्यांवरील फूटेज तपासणीसाठी मागविले असता कळाले की, या फूटेजचे रेकॉर्डिंग करणारी, ते साठवणारी, ते हवे तेव्हा उपलब्ध करून देणारी ‘मास्टर कंट्रोल रूम’च साकारली गेलेली नव्हती. अशी बेफिकिरी याही बाबतीत दाखविली गेली आहे. त्याचे मोल तीन विद्यार्थिनींना आपला जीव देऊन मोजावे लागले आहे. सेल्फी काढताना बोट कलंडून दुर्घटना घडल्याचे चालकाचे म्हणणे आहे. मुलांनी अशा ठिकाणी जबाबदारीने वागले पाहिजे. पालकांनीही त्यांना तशी जाणीव करून द्यायला हवी. कमला मिल दुर्घटनेनंतर बेकायदा हॉटेलवर कारवाई करण्यात आली. मोजोज्, वन अबव्हच्या मालकांना बेड्या ठोकल्या गेल्या. दबावापोटी ही वेगवान कारवाई करण्यात आली. तसाच वेग डहाणू बोटीच्या दुर्घटनेविषयीदेखील हवा. तरच अशा दुर्घटना भविष्यात टाळू शकू.