थोडा जास्त काळ मिळायला हवा होता…: रतन टाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2024 08:05 AM2024-10-11T08:05:04+5:302024-10-11T08:06:03+5:30

माझे सगळे व्यावसायिक आयुष्य पारंपरिक उद्योगात गेले. मी जे केले त्यात मोठे यश मिळाले हे खरेच; पण एका छोट्याशा चीपच्या मदतीने, सॉफ्टवेअरच्या एका कोडने, स्मार्ट फोनसारख्या एका साध्या स्वस्त यंत्रातल्या कनेक्टिव्हिटीने बाजारपेठेच्या एखाद्या गरजेकडे पाहण्याची जुनी नजरच पूर्णत: बदलून एका रात्रीत नवे ‘प्रॉडक्ट’ जन्माला घालू शकणारा ‘डिसरप्टिव्ह चेंज’ अनुभवण्याची संधी काळाने माझ्या पिढीला दिली नाही. 

should have got a bit longer said ratan tata | थोडा जास्त काळ मिळायला हवा होता…: रतन टाटा

थोडा जास्त काळ मिळायला हवा होता…: रतन टाटा

- रतन टाटा 

गेली काही वर्षे मला सतत वाटते, आणखी थोडा जास्तीचा काळ मिळायला हवा होता. थोडा उशिरा जन्माला आलो असतो तर आजच्या आणि उद्याच्या भारतातल्या या चैतन्यमय कालखंडाचे तारुण्य मला अधिक क्षमतेने अनुभवायला, जगायला मिळाले असते. - हे वाटण्याचे कारण जीवनाविषयीची लालसा नव्हे. भारतात आणि अर्थातच जगभरात आज जे काही घडते आहे, ज्या वेगाने तंत्रज्ञान मानवी आयुष्याच्या सगळ्या शक्यताच बदलायला निघाले आहे; त्याचे आकर्षण ! आणि त्याबद्दलचे औत्सुक्यही !! 

या बदलांना भिडताना जुने संदर्भ पुसून संपूर्ण नवा विचार - कृती करू शकणारे तरुण उद्योजक त्यांच्या ‘स्टार्टअप’च्या कल्पना घेऊन मला भेटतात, तेव्हा वाटते की, ही संधी काळाने माझ्या पिढीला दिली नाही. हे पंचविशीतले तारुण्य माझ्या अनुभवी नजरेचे अंदाज चुकवते. अवघ्या काही वर्षांपूर्वी ज्या ‘कल्पना’ बाजारपेठेत टिकाव धरू शकणार नाहीत, असे मला खात्रीने वाटले होते 
त्यातून जन्माला आलेल्या स्टार्टअप कंपन्या मार्केट लीडर झालेल्या मला दिसतात. बाजारपेठेच्या एका विशिष्ट भागाची नवी गरज नेमकी हेरणे आणि टेक्नॉलॉजीच्या कल्पक उपयोगाने त्या गरजेभोवती नवी कंपनी बांधणे... हाऊ दे अप्लाय ॲण्ड एम्प्लॉय टेक्नॉलॉजी टू देअर व्हिजन... हे सगळे मोठे रोमांचक आहे. 

एक साधा मोबाइल फोन. त्याने किती नवी दारे खुली करावीत? स्मार्ट फोन हाती असलेला कोट्यवधी माणसे म्हणजे वस्तू आणि सेवा यांसाठीची मागणी/मागणीची शक्यता खिशात घेऊन फिरणारी कोट्यवधी रिटेल आऊटलेट्स. पुन्हा यातले ‘नेमके/विशिष्ट’ सेगमेन्ट ‘टार्गेट’ करण्याची सोय. रस्ते आणि वाहतूक यांच्या गैरसोयींमुळे आजवरची पारंपरिक बाजारपेठ जिथे पोचली नव्हती, अशा देशाच्या काेनाकोपऱ्यात पोचून विस्ताराची संधी... जो सुचेल तो प्रयोग करून पाहण्याची शक्यता... जे केले ते फसले, तरी ते मागे टाकून पुन्हा नव्या प्रयोगाकडे वळण्याचे स्वातंत्र्य... सध्या प्रामुख्याने सेवा क्षेत्रापुरते मर्यादित असले, तरी हे सगळे मोठे क्रांतिकारक आहे. हे घडले एका सेलफोनमुळे! आणि अर्थातच इंटरनेटने आणलेल्या ‘कनेक्टिव्हिटी’मुळे!

जिथे एक छोटा बदल, छोटी सुधारणा किंवा छोटी दुरुस्ती करायची, तरी करोडो डॉलर्सचे भांडवल लागते, दीर्घकालीन नियोजन लागते, रूढ व्यवस्थेने तो नवा बदल स्वीकारावा याकरिता माणसांच्या आणि तंत्रज्ञानाच्या पातळीवरही मोठी युद्धे लढावी लागतात, अशा पारंपरिक उद्योगात माझे आयुष्य गेले. त्यामुळे आज विशी-पंचविशीत आपले स्टार्टअप उभारण्याची जिद्द धरणाऱ्या तरुण उद्योजकांकडे मी कौतुकाने आणि औत्सुक्याने पाहतो; तेव्हा कधीकधी असूयाही वाटते... खोटे कशाला सांगू?

माझे सगळे व्यावसायिक आयुष्य पारंपरिक उद्योगात गेले. या काळात मी यश अनुभवले, एकूण उलाढाल कित्येक पटींनी वाढली, टाटा समूह जागतिक स्तरावर अधिक सशक्त करू शकलो हे खरे आहे; पण एका छोट्याशा चीपच्या मदतीने, सॉफ्टवेअरच्या एका कोडने, स्मार्ट फोनसारख्या प्रत्येकाला परवडू शकणाऱ्या एका साध्या यंत्राने आणि कनेक्टिव्हिटीने बाजारपेठेच्या एखाद्या विशिष्ट भागाकडे/गरजेकडे पाहण्याची जुनी नजरच पूर्णत: बदलून टाकू शकणारा ‘डिसरप्टिव्ह चेंज’ माझ्या वाट्याला आला नाही. - हा रोमांच मी अनुभवतो आहे तो माझ्या निवृत्तीनंतर आणि या वाटेवरले माझे नवे शिक्षक आहेत विशी-पंचविशीतले अत्यंत बुद्धिमान, चाकोऱ्या मोडायला बिलकूल न घाबरणारी तरुण मुले.

भारतातल्या स्टार्टअप कम्युनिटीशी माझे नाते सुरू झाले, ते औत्सुक्यातून! तंत्रज्ञान हा या तरुणांचा मुख्य आधार आहे आणि ‘कनेक्टिव्हिटी’ हा रस्ता! शिवाय बदलत्या काळाने त्यांचे बोट धरले आहे. या काळात एखादी कल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या शक्यता आजमावणे तुलनेने सोपे आहे. त्याकरता फार मोठे भांडवल गुंतवावे लागत नाही. लागते ती फक्त बाजारपेठेत तयार होणाऱ्या नव्या गरजा हेरण्याची दृष्टी, नवी गरज पुरवू शकेल किंवा निर्माण करू शकेल अशी ‘आयडिया’ आणि रिस्क घेण्याची तयारी! 

दरवर्षी नवा स्टील प्लान्ट कुणी उभा करू शकत नाही, कारचा नवा प्रोटोटाईप एका रात्रीत तयार होऊ शकत नाही; पण ग्राहकांची खरेदी करण्याची ठिकाणे, सवयी, रीती हे सगळे बदलणारे नवे सॉफ्टवेअर एका रात्रीत लिहिले जाऊ शकते. हे काम एक छोटी टीम आपल्या होस्टेल रूममध्ये, घरात बसून करू शकते व या कामात ‘जग आजवर जसे चालत आले आहे, ती रीत मुळापासून बदलण्याची शक्यता’ असू शकते. - ही शक्यता मला मोहात पाडते आणि या शक्यतांचा उपयोग करून घेऊन तिचा पाठलाग करणारे तारुण्य मी विस्मयाने पाहत असतो.

भविष्यात मूळ धरू शकणारी आणि बाजारपेठेत टिकू शकणारी ‘स्टार्टअप’ची ‘आयडिया’ कशी ओळखावी?-  माझ्या मार्गदर्शनासाठी येणाऱ्यांना मी विचारतो: ‘हाऊ आर यू गोइंग टू मेक अ डिफरन्स?’ - आजवर लोक जे आणि जसे जगत आले आहेत, त्यातला किमान एक तरी ‘अनुभव- प्रकार’ पूर्णत: बदलण्याची ताकद या ‘बिझिनेस प्रपोझल’मध्ये आहे का? - बदल अनेक अर्थांचा असू शकतो. गुणवत्तेचा बदल, बाजारपेठेतल्या विशिष्ट लोकसमूहाच्या जगण्याची गुणवत्ता बदलण्याची आणि सुधारण्याची शक्यता, लोक जसे जगतात - वागतात- खरेदी करतात- विचार करतात त्यात मूलभूत बदल घडविण्याची क्षमता... डू समथिंग दॅट इज गेमचेंजर ! डू समथिंग दॅट इज बेटर ॲन्ड चीपर!!

`मी या तरुण मुलांबरोबर काम करतो, ते केवळ पैसे गुंतवून परताव्याची वाट पाहण्यासाठी नव्हे. मला त्यांच्या कंपनीच्या प्रवासात सहभागी व्हायला आवडते. ती अवघड, कस पाहणारी वाट त्यांच्याबरोबरीने चालायला आवडते. या प्रवासात ही मुले मला खूप काही शिकवतात, हे मी आता अनुभवाने ओळखले आहे. बदलत्या भारतात चांगले मूळ धरलेल्या ‘स्टार्टअप संस्कृती’मध्ये काळजी करावी अशी एक गोष्ट मला दिसते- ‘क्रिएटिव्हिटी’विरुद्ध ‘कन्फ्यूजन’ आणि ‘केऑस’ यांचा झगडा!

भारताच्या पारंपरिक मानसिकतेमध्ये चाकोरी मोडण्याला फार सन्मान नव्हता, त्यामुळे नव्या कल्पनांसाठी दारेही बंदच होती. आता हे बदलते आहे. वेगाने बदलते आहे; पण या बदलाचा वेग अनेकदा गोंधळाचे आणि आवरता न येणाऱ्या पसाऱ्याचे कारण ठरताना मी पाहतो. नव्या कल्पना ऐकून घेण्याची, त्यावर खुल्या विचाराची आणि चिकित्सक देवाण-घेवाणीची व्यवस्था हवीच; पण या चर्चांना प्रत्यक्ष कृतीचे नेटके रूप देण्याची एक निश्चित अशी चौकटही हवी. मोकळेपणाने विचार करण्याचे स्वातंत्र्य आणि त्या विचारांचे कृतीत रूपांतर करण्याचा निश्चित असा मेकॅनिझम हा तोल सांभाळणे अवघड खरेच; पण गुगल आणि फेसबुक यांसारख्या प्रचंड वेगाने वाढत-वाढत अजस्र आकार धारण केलेल्या कंपन्यांनीही हा तोल अचूकपणे सांभाळलेला दिसतो. तेच त्यांच्या व्यावसायिक यशाचे, बदलत्या काळाच्या झंझावातात सतत सुसंगत राहण्याचे आणि मानवी जीवन बदलून टाकण्याचे ‘’गेमचेंजर’ श्रेय कमावण्यामागचे रहस्य आहे.

- नव्या भारताने बरेच बदल पचवले असले, तरी कुठल्याही अधिकारांची उतरंड न मानणारी ‘मुक्त विचारा’ची संस्कृती अनुसरण्यात आपण अजूनही बरेच मागे आहोत. आपली विद्यापीठे पाहा... आणि शास्त्रीय संशोधनाच्या प्रयोगशाळा. जिथे विचारांना खुला वाव असला पाहिजे, अशी ही दोन अतिसंवेदनशील, महत्त्वाची क्षेत्रे; पण दोन्हीकडे गट-तटांनी भरलेले, असूयेने ग्रासलेले, भयाने आक्रसलेले अत्यंत बंदिस्त असे वातावरण आहे. जुन्या पद्धती, विचार, रीती यांची तटबंदी इतकी पक्की, की नव्या विचाराचे आत शिरणे मुश्कीलच !! त्याचा मोठा फटका भारताला बसणार आहे.

- माणसाची गुणवत्ता त्याच्या स्थानावरून मोजण्याची ही ‘खास भारतीय’ प्रथा मोडीत काढल्याबद्दल या देशाने स्टार्टअप कंपन्यांचे आभार मानले पाहिजेत. विदेशातल्या शिक्षणाचा कामाचा अनुभव घेऊन स्वतंत्र व्यवसाय उभारण्यासाठी भारतात परतलेल्या तरुण उद्योजकांच्या पिढीने इथली ‘कार्यसंस्कृती’ बदलायला घेतली आहे. इथे बॉसला वेगळी केबिन नसते, अनेकदा तर बॉसच नसतो. असतात ते एका ध्येयाने झपाटलेले सहकारी. ते एकमेकांना पहिल्या नावाने हाक मारतात. एका समान पातळीवरून गुणवत्तेच्या आधारावर परस्परांशी स्पर्धा करतात. इथे व्यावसायिक यश मिळवण्यासाठी कुणातरी बड्या घरचे बेटे असण्याची सक्ती नसते, सत्ताकेंद्रांशी ‘अर्थपूर्ण जवळीक’ आणि ‘कनेक्शन्स’ असण्याची पूर्वअट नसते.

- बदलत्या भारताच्या व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत असे उद्योगक्षेत्रातले हे तरुण चित्र मला मोठी उमेद देते.
माझी पिढी हे घडवू शकली नाही...

‘नॅनो’ यशाची कहाणी अपयशाची कारणे

माझ्या कल्पनेतली नॅनोची प्रतिमा ‘अफोर्डेबल फॅमिली कार’ अशी होती. पण ती बाजारात उतरवली गेली ‘चीपेस्ट कार’ म्हणून! - इथे सारे फसले!

‘टाटा नॅनो’. मला ही कल्पना सुचली बंगळुरूमध्ये.  एका महत्त्वाच्या बैठकीसाठी गेलो होतो. सकाळी ऑफिसच्या दिशेने निघालो, तेव्हा पाऊस पडून गेला होता. माझ्या गाडीशेजारून आई-वडील आणि दोन मुले असे एक चौकोनी मध्यमवर्गीय कुटुंब जाताना मी पाहिले. पुढल्याच चौकात निसरड्या रस्त्यावरून ती स्कूटर घसरली आणि एक छोटासा अपघात झालेला दिसला. 
मला वाटले, भारतातला मध्यमवर्ग वाढतो-बदलतो आहे; तर त्याच्या चौकोनी कुटुंबाला सामावून घेईल, शिवाय त्याच्या खिशाला परवडेल अशी आत्तापेक्षा थोडी मोठी आणि अधिक सुरक्षित गाडी का असू नये? जी गाडीपेक्षा स्वस्त पण दुचाकीपेक्षा सोयीची असेल..

- मग त्या कल्पनेला वास्तव रूप देण्याच्या नादाने मी झपाटून कामाला लागलो. ‘नॅनो’ या एका उत्पादनाने आमच्या समूहाची प्रतिमा एकदम कालसुसंगत बनवली. पश्चिम बंगालमधल्या सिंगूरमध्ये उसळलेल्या वादामुळे अख्खा प्लांट उचलून दुसऱ्या राज्यात हलवण्यात वेळ वाया गेला. पण  मागे पाहताना मला महत्त्वाचे कारण दिसते ते आमच्या टीमला आलेले शैथिल्य. ते दिले होते यशाने. उत्पादन सुरू होण्याआधी ३ लाख गाड्यांची नोंदणी पूर्ण रक्कम भरून झाली होती. वर्षभरानंतर आपल्या प्रॉडक्टमध्ये ग्राहकांना इतकाच रस शिल्लक राहील का, याचा अंदाज घेण्यात आणि त्यासाठीची तजवीज / प्रयत्न करण्यात ‘नॅनो’ची टीम अपयशी ठरली. 

आणखी एक महत्त्वाचे कारण होते : नॅनो ही ‘चीपेस्ट’ - स्वस्तातली (आणि म्हणून कनिष्ठ मध्यमवर्गीयांची) कार आहे या सूत्राभोवती गुंफलेले मार्केटिंग देशातल्या बदलत्या, ‘अपवर्ड मुव्हिंग’ समाजमनाचा कानोसा घेण्यात पार फसले. ‘नव्या’ दृष्टीने आखलेले, उभारलेले एखादे प्रॉडक्ट ‘जुन्या’ आणि ‘पारंपरिक’ विचारांनी चालणाऱ्या सिस्टीमच्या हाती दिले गेले की फसते, याचे नॅनो हे उदाहरण आहे. माझ्या कल्पनेतली नॅनोची प्रतिमा ‘अफोर्डेबल फॅमिली कार’ अशी होती. पण ती अतिशय आक्रमकतेने बाजारात उतरवली गेली ‘चीपेस्ट कार’ म्हणून! या दोन्हीतला सूक्ष्म फरक नजरेआड होऊ देणे अंतिमत: मूळ कल्पनेचा खून करणारेच ठरले. 

मुलाखत : वाणी कोला
शब्दांकन आणि अनुवाद : अपर्णा वेलणकर
(लोकमत वृत्तसमूहातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या ‘दीपोत्सव’ या दिवाळी अंकासाठी २०१६ मध्ये घेतलेल्या मुलाखतीवर आधारित प्रदीर्घ लेखाचे संपादित संक्षेपन.)

 

Web Title: should have got a bit longer said ratan tata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.