गरिबांच्या पोरांनी शिकूच नये काय ?
By सुधीर महाजन | Published: July 26, 2019 12:22 PM2019-07-26T12:22:59+5:302019-07-26T12:34:30+5:30
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रात शिक्षण हे सामान्यांसाठी उरले नाही. उलट गोरगरिबांच्या मुलांनी शिकूच नये, अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे.
- सुधीर महाजन
शेतकऱ्याच्या आत्महत्या आता नित्याच्या; रोज मरे त्याला कोण रडे. महाराष्ट्रात या आत्महत्याग्रस्त कुटुंबाचं पुढं काय होतं याचा विचार कोणीच करीत नाही. सरकारी मदत देऊन मोकळं व्हायचं, जोडीदाराच्या दु:खाच्या भारासह कुटुंबाचं सगळं ओझं खाद्यांवर घेणाऱ्या माताभगिनी खेड्याखेड्यांतून दिसतात. मध्यंतरी नाना पाटेकरने त्यांच्या दु:खावर फुंकर टाकण्याचा प्रयत्न केला; पण फाटलेल्या आभाळाला कुठंकुठं थिगळं लावणार? पण आत्महत्यांचे सत्र मात्र थांबले नाही. आजवर पुरुष आत्महत्या करीत होते; पण मध्यंतरी मराठवाड्यात दोन महिलांनी तोच मार्ग स्वीकारला. आत्महत्येच्या या सत्राने आता ग्रामीण भागात पुढच्या पिढीला विळख्यात घेतले आहे. बीडच्या धारूर तालुक्यातील मोहखेडचा योगेश किसन राठोड आणि सोलापूर जिल्ह्यातील देगावच्या रूपाली रामकृष्ण पवार या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. कारण शिक्षणासाठी पैसे नव्हते आणि पैसा उभा करण्यापायी पालकही हतबल झाले होते.
या दोघांच्या आत्महत्येच्या बातम्या सुन्न करणाऱ्या होत्या. शेतकरी जगता येणे शक्य नाही म्हणून आत्महत्या करतो. त्यांच्या शिकणाऱ्या मुलांकडेही दुसरा पर्याय नसतो का? की आत्महत्येचा वारसाच तो सोडून जातो? शिक्षण क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राने या दोन घटनांकडे केवळ आत्महत्या या नजेरेने पाहावे ही गोष्ट संवेदना गोठल्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रात आत्महत्याचा हा दुसरा टप्पा तर सुरू झाला नाही. आपल्या शिक्षणासाठी आई-बाप पैसा उभा करू शकत नाहीत, ही सल फार मोठी. आधीच कर्जाने पिचलेला बाप या नव्या कर्जाखाली दबून जाणार ही भीती आणि त्या भीतीपोटीच या दोघांनी हा शेवटचा मार्ग स्वीकारला.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रात शिक्षण हे सामान्यांसाठी उरले नाही. उलट गोरगरिबांच्या मुलांनी शिकूच नये, अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे. जागोजागी शिक्षणसम्राटांच्या जहागिऱ्या उभ्या राहिल्या. त्यातून एका नव्या सरंजामशाहीचा उदय झाला. फुले- आंबेडकरांच्या नावाचा जयघोष करीत ही नवी संस्कृती जन्माला आली, याचे दु:ख आहे. ही सरंजामशाही शिक्षणापुरती मर्यादित राहिली असती, तर ठीक; पण तिचे ध्येय सत्ताप्राप्ती आहे आणि सत्तेची चव सगळेच सम्राट चाखताना दिसतात आणि सत्तेत बसून आपल्या सोयीची धोरणे ठरविण्याचा प्रयत्न होतो. ग्रामीण भागात तर चित्र भयावह आहे. शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक आहेत; पण शिक्षणच मिळत नाही. गुरुजी जिल्ह्याच्या ठिकाणावरून जा-ये करतात. शिक्षणाचा दर्जा घसरला. त्यामुळे ही कीड सगळीकडेच पसरली आहे.
उच्चशिक्षणासाठी पैसा नाही म्हणून ते सामान्यांच्या आवाक्यात नाही. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली दुसरीसाठीच विद्यार्थ्याला लाखावर खर्च येतो. उच्चशिक्षणाचा तर गरिबांनी विचार करायलाच नको. शिकून सगळी शहाणी झाली, तर नव्या सरंजामदारांना भालदार-चोपदार कुठून मिळणार? असा ‘नाही रे’ वर्ग निर्माण करणे ही गरज तर नाही ना, अशी शंका यायला लागली आहे. दुसरीकडे शिक्षणातील स्पर्धा वाढली. ग्रामीण-शहरी अशी दरी स्पष्ट झाली आहे. रूपाली पवार तर उच्चशिक्षणासाठी या स्पर्धेत पात्र ठरली होती. फक्त तिच्याकडे पैसे नव्हते. आपल्यामुळे वडिलांना जमीन विकावी लागू नये म्हणून तिने स्वत:ला संपविले. ही हतबलता जागोजागी दिसते. माणसं जगणंच विसरली ती आयुष्याचं ओझं ओढताना दिसतात. त्यांच्या डोळ्यात स्वप्नांची जागा भकास नजरेने घेतलेली असते आणि नजरेतले भकासपण अंगावर येते. आता हा एक नवीन प्रश्न समोर येऊन उभा राहिला आहे.