हुरळून जावे काय?

By admin | Published: August 5, 2015 10:26 PM2015-08-05T22:26:37+5:302015-08-05T22:26:37+5:30

जीबाब किंवा जे सत्य भारताचे सरकार, त्याच्या सर्व तपासी यंत्रणा आणि भारतीय जनता यांना अगदी पहिल्या दिवसापासून ज्ञात होते, या सत्याची प्रचिती आणून देणारे भक्कम पुरावेदेखील

Should you get scared? | हुरळून जावे काय?

हुरळून जावे काय?

Next

जीबाब किंवा जे सत्य भारताचे सरकार, त्याच्या सर्व तपासी यंत्रणा आणि भारतीय जनता यांना अगदी पहिल्या दिवसापासून ज्ञात होते, या सत्याची प्रचिती आणून देणारे भक्कम पुरावेदेखील हाताशी होते आणि तरीही कांगावखोर पाकिस्तान या सत्याला सपशेल नाकारीत होते, तेच सत्य पाकिस्तानातील एका तपासी यंत्रणेच्या निवृत्त अधिकाऱ्याने नि:संदिग्ध शब्दात मांडल्यानंतर तमाम भारतीयांनी खरोखरीच हुरळून जावे, अशी स्थिती आहे काय, असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. तारिक खोसा नावाचे सद्गृहस्थ पाकिस्तानच्या केन्द्रीय तपास यंत्रणेचे (एफआयए) प्रमुख होते आणि त्यांनी त्याच राष्ट्रातील ‘डॉन’ (पहाट) या प्रतिष्ठित वृत्तपत्रात एक लेख लिहून २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई शहरावर करण्यात आलेल्या दहशवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचाच कसा हात होता, याचा सारा तपशील नमूद केला आहे. परिणामी भारत आजवर जे साऱ्या जगाच्या कानीकपाळी ओरडून सांगत होता आणि पाक जे नाकारीत होता, त्याची त्याच राष्ट्रातील एका निवृत्त का होईना, जबाबदार व्यक्तीने पुष्टी करावी, याला निश्चितच एक महत्व आहे. त्याचबरोबर खोसा यांच्या धाडसाबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. (अर्थात ते या लेखाचे पितृत्त्व नाकारणार नाहीत, हे गृहीत धरुन) भारत-पाक सीमेवर चकमक वा गडबड झाली की भारतातील अनेक खासगी चित्रवाहिन्यांवर त्याची चर्चा केली जाते व या चर्चेत निवृत्त पाकी सेनाधिकाऱ्यांना आवर्जून पाचारण केले जाते. पण त्या साऱ्यांची भूमिका नेहमीच भारताला खोटे ठरविण्याची असते. त्या पार्श्वभूमीवर खोसा यांनी २६/११च्या घटनेचा संपूर्ण तपशील सादर करुन अशा सेनाधिकाऱ्यांचा चांगलाच मुखभंग केला आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आता तरी आपल्या चुकांची कबुली द्यावी आणि तेथील न्यायालयात दाखल खटल्यांचा सत्वर निपटारा करावा, असा सल्लादेखील खोसा यांनी आपल्याच सरकारला दिला आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी फेटाळून लावताना, या हल्ल्यातील जो एकमात्र दहशतवादी जिवंतपणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात सापडला होता व ज्याला कालांतराने दीर्घकालीन न्यायालयीन प्रक्रियेनंतर फासावर लटकविले होते, तो अजमल आमीर कसाब मुळात पाकिस्तानी नाहीच असा कांगावा प्रारंभी पाकिस्तानने केला होता. काही काळ लोटल्यानंतर त्याचे पाकी असणे आणि सदर हल्ल्यामागील सूत्रधार पाकिस्तानातीलच असणे, या दोन बाबी पाकिस्तानने स्वीकारल्या होत्या. ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याविरुद्ध खटलादेखील भरला गेला, पण तो केवळ लुटुपुटीचा वाटावा अशीच त्याची आजवरची प्रगती आहे. ही दोन सत्ये वगळता बाकीची सारी सत्ये पाकने आजवर नाकारलीच आहेत. खोसा यांनी मात्र जे भारत आजवर पुन्हा पुन्हा जगाला सांगत होता, तेच सांगितले आहे. त्यात जे एकूण दहा दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत शिरले ते कसे पाकिस्तानी होते, त्यांना तेथील सिंध प्रांतात ‘लष्कर’ने कसे प्रशिक्षित केले होते, या दहशतवाद्यांनी एका मच्छिमार बोटीने भारतीय सागरी हद्दीत प्रवेश करुन भारतीय मच्छिमारांच्या बोटीचा ताबा घेतल्यावर पाकी बोट कराचीला कशी परत नेली गेली, कराचीतीलच एका खोलीतून मुंबईवरील हल्ल्याचे कसे नियोजन केले गेले व नंतर या खोलीचा कसा तपास लागला आदि सर्व तपशील आला आहे. हल्ल्यास आर्थिक मदत करणारेदेखील जेरबंद झाले आहेत व त्यांच्यावर आरोप ठेवले गेले आहेत, याचाही उल्लेख केला गेला आहे. याचा अर्थ तपासाची सारी प्रक्रिया अगोदरच पूर्ण केली गेली असून केवळ न्याय होणे बाकी आहे व तो लवकरात लवकर व्हावा, हा तारिक खोसा यांचा आग्रह आहे. पण मूळ मुद्दा तिथेच अडकून पडला आहे. २६/११च्या याच हल्ल्यातील अजमल कसाब हा खऱ्या अर्थाने कसाब असल्याचे दृष्टीस पडूनदेखील भारतीय तपासी यंत्रणेने आणि न्यायव्यवस्थेनेही त्याला तडकाफडकी दंडित न करता, बचावाची पूर्ण संधी दिली होती. अगदी अलीकडे याकूब सईद फाशी प्रकरणात त्याला स्वत:चा बचाव करता यावा म्हणून भारतातील न्यायव्यवस्थेने जो जगावेगळा पायंडा पाडून दाखविला त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील सरकार आणि लष्कर तर राहोच पण तेथील न्यायव्यवस्थादेखील कोणीही आश्वस्त व्हावे, अशी खचितच नाही हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. याकूब सईद आणि त्याचा भाऊ व १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा सूत्रधार टायगर मेमन यांनी भले त्या काळात पाकिस्तानात आश्रय घेतला होता व त्या राष्ट्रानेही त्यांना तो दिला होता. पण त्यांना तिथे मिळणारी वागणूक किती हिणकस होती, हेही एव्हाना उजेडात आले आहे. याचा अर्थ इतकाच की, भारताविरुद्धचा द्वेष तेथील सरकार आणि लष्कर यांच्या रोमारोमात भिनला आहे आणि तेथील न्यायव्यवस्थेला त्यापासून वेगळे काढावे, असा एकही आधार अद्याप गवसलेला नाही. त्यामुळेच असे म्हणायचे की, तारिक खोसा यांचे धारिष्ट्य कितीही वाखाणण्याजोगे असले आणि त्यांनी पाकी सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले असले तरी अपेक्षित नेत्रसुधार होईल याची शाश्वती देता येत नाही.

Web Title: Should you get scared?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.