सर्वसामान्यांचा खांदा, बुडीत कर्जाचा वांदा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 01:11 AM2020-01-30T01:11:01+5:302020-01-30T01:11:25+5:30
मुद्रा या फ्लॅगशिप कार्यक्रमावर तर पंतप्रधानांची राजमुद्रा असून, कसलीही प्राप्ती नसताना दरवर्षी या कार्यक्रमाची व्याप्ती वाढत आहे.
- संजीव उन्हाळे (ज्येष्ठ पत्रकार)
भाजपच्या काळात बँकांच्या बुडीत कर्जाचा आकडा फुगत चालला असून, रिझर्व्ह बँकेनेही विनातारण थकीत कर्ज वाढण्याची शक्यता असून, परिस्थिती खालावण्याची साधार भीती व्यक्त केली आहे. २०१५ला केवळ २ लाख ७९ हजार कोटी बुडीत कर्जाचा आकडा सध्या पावणेदहा लाख कोटींच्या वर गेला असून, हा आकडा सकल वृद्धिदराच्या तुलनेत ९.१ टक्के आहे. आयएल अँड एफएसच्या ºहासानंतर बिगर बँकिंग वित्तीय संस्थांची अवस्था दोलायमान झाली आहे.
मुद्रा या फ्लॅगशिप कार्यक्रमावर तर पंतप्रधानांची राजमुद्रा असून, कसलीही प्राप्ती नसताना दरवर्षी या कार्यक्रमाची व्याप्ती वाढत आहे. या वर्षी तीन लाख कोटी रुपये कर्जाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सवंग लोकप्रियतेसाठी मुद्रावर सहा लाख कोटी रुपयांचा संभाव्य बुडीत कर्जाचा तवंग जमलेला आहे. मुद्राचे केवळ स्टेट बँकेचे बुडीत कर्ज १८.५ टक्के, तर पंजाब नॅशनल बँकेचे २२.७१ टक्के आहे. तथापि, भारतीय रिझर्व्ह बँकेने १ जानेवारी, २०१९ला एक परिपत्रक काढून छोट्या आणि मध्यम उद्योगांना वाटलेली कर्जे पुनर्रचित करण्याची अनुमती दिली. यूपीएच्या काळात अशीच पुनर्रचना करून मोठी कर्जे थकीत म्हणून पुढे दडपण्यात आली. हाच कित्ता भाजप सरकार पुन्हा गिरवत आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, जवळपास सगळ्याच बँकांची कर्जे ही सर्वसामान्य व्यक्तींनी नव्हे, तर सरकारच्या मर्जीतल्या कथित भांडवलदारांनी बुडविलेली आहेत. भारतीय बँकिंग व्यवसायात मोठ्या उद्योगांचा मोठा वाटा आहे आणि सर्वसामान्य माणसांची छोटी बचत त्यासाठी वापरली जाते. बँकांची थकीत कर्जे राहू नयेत, म्हणून केंद्र सरकारने २०१६ मध्ये दिवाळखोरी नादरी संहिता कायदा मंजूर करून कर्जबुडव्यांसाठी राजमार्ग तयार केला. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार ४८ कर्जखाती अशी आहेत की, ज्यांच्यावर दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे, तर ७५० खाती अशी आहेत की, त्यांच्यावर शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. दोन ते तीन लाख कोटी रुपये बुडविणारे टॉप-टेन स्वयंघोषित दिवाळखोर देशाच्या आर्थिक राजधानीतील आहेत. तेवीस उद्योगांकडून १.३२ लाख कोटी रुपये वसूल होणे बाकी होते. त्यात बँकांना ७३,७६३ कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागले. कायद्याच्या परिभाषेत याला हेअरकट असे म्हणतात. असा हेअरकट मारून अनेक जण सुटले, बँकांचे भांडवल गेले अन् बँकांसमोर गहन प्रश्न उभा राहिला. शेवटी हा सर्व पैसा सर्वसामान्यांचा, याचा विसर पडला.
याउलट, परदेशामध्ये गृहकर्जाला अधिक महत्त्व दिले जाते. अमेरिकेमध्ये ७५ टक्के, युरोपमध्ये ८७ टक्के आणि चीनमध्ये ५४ टक्के दिले आहेत. त्यामुळे त्यांचे थकीत कर्जही अत्यल्प आहे. या तुलनेत भारतामध्ये गृहकर्जाचा नुसता बोभाटा करण्यात येतो, पण प्रत्यक्षात ११ टक्के रक्कम बँकांकडून गृहकर्जासाठी उपलब्ध होते. मर्जीतल्या भांडवलदारांचा बँकांवरील पगडा कमी झाल्याशिवाय बँकिंग क्षेत्रातील मोठी सुधारणा होणे शक्य नाही. मुद्राच्या मृगजळात अडकण्यापेक्षा २०२२ पर्यंत पंतप्रधान मोदींच्या प्रत्येकाला घर देण्याच्या आश्वासनपूर्तीसाठी बँकांनी काही केले, तर अधिक योग्य होईल.
२०१३ ते २०१९ मध्ये सरकारी आणि खासगी बँकांनी ४८ लाख कोटी रुपये रिटेल कर्ज दिले. यामध्ये २२ लाख कोटी रुपये रिटेल कर्ज विनातारण आहे. विशेषत: क्रेडिट कार्ड आणि ग्राहकोपयोगी वस्तू, वैयक्तिक कर्ज या
प्रकाराने विनातारणचा प्रघात वाढत चालला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती कृषिकर्जामुळे चिंताजनक बनलेली आहे. बँक आॅफ इंडिया १७ टक्के, आयडीबीआय बँक कृषिकर्ज १५ टक्के इतकी वाढ आहे. विशेषत: डझनभर राज्यांनी कर्जमाफीचा मार्ग निवडला आहे. यामुळे अस्तित्वात असलेले कर्ज तर बुडतेच, पण पुढील खरीप आणि रब्बीसाठी कर्जवाटपाचे प्रमाण कमी होते. मोदी सरकारने पंतप्रधान सन्मान योजनेबरोबरच पीकविमा योजनेचे पैसे थेट शेतकऱ्याला मिळण्याची व्यवस्था केल्यामुळे कर्ज फेडणे हा प्रकार राहिलेला नाही. थेट शेतकºयाच्या खिशात पैसे दिल्यामुळे मतपेढी वाढत असली, तरी बँकपेढी मात्र बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
हा सगळा मोठा व्यवहार सामान्य माणसाच्या बचतीवर होतो, याचे भान ना बँकांना आहे, ना सरकारला. सर्वसामान्यांच्या खांद्यावर हे बुडीत कर्जाचे ओझे टाकले जाते अन् ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’, या म्हणीप्रमाणे थकीत-बुडीत कर्ज झाकून ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येतात. सर्वसामान्यांना कर्ज मिळत नाही. बड्या उद्योगांना पायघड्या घातल्या जातात. एकंदरच ही वाटचाल बँकांच्या खासगीकरणाकडे बेमालूमपणे चालली आहे, हे शहाण्यास सांगणे न लगे.