Raj Thackeray: ...तरच मनसेच्या झेंड्यावरची शिवमुद्रा शोभेल, राज ठाकरेंना 'लाभेल'!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 05:03 AM2020-02-11T05:03:48+5:302020-02-11T10:18:44+5:30
शिवसेनाप्रमुखांना हिटलरचे आकर्षण होते. राज यांनाही ते असू शकते. मात्र राज यांना याचा विसर पडला की, विश्वबंधुत्व, विश्वकल्याणाची अपेक्षा ठेवून राजमुद्रेत ‘विश्ववंदिता’ या शब्दाचे प्रयोजन केले आहे.
राज कपूर हे आपल्या चित्रपटाकरिता भव्यदिव्य सेट उभारायचे, स्टारकास्ट घ्यायचे. त्यामुळे त्यांना रुपेरी पडद्यावरील ‘शोमन’ असे संबोधिले जात होते. महाराष्ट्रातील राज ठाकरे हे पक्षाचे अधिवेशन घेतील, मोर्चा काढतील किंवा फोटोबायोग्राफी प्रकाशित करतील, तरी तो भव्यदिव्य असतो. त्यामुळे राजकारणातील राज हेही एका अर्थाने ‘शोमन’ आहेत.
भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी, पाकिस्तानी नागरिकांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी काढलेला मोर्चा हाही असाच राज यांच्या शोमनशिपचा पुरावा होता. लोकसभा निवडणुकीकडे पाठ फिरवल्यावर व विधानसभा निवडणुकीत एकुलत्या एक आमदारापलीकडे हाती काही न लागल्यानंतर आता महापालिका निवडणुकांकरिता मनसेने पक्षाचे पहिले अधिवेशन अलीकडेच आयोजित केले. यापूर्वी बिहार, उत्तर प्रदेश येथून येणाऱ्या लोंढ्यांविरोधात वातावरण तापवून मराठीच्या मुद्द्यावर मनसेने राजकीय पोळी भाजली. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपला अर्धचंद्र देत शरद पवार यांची करंगळी धरून सत्तेचा सोपान गाठला. आता हिंदुत्वाचे अवकाश आपल्याला मोकळे झाल्याचा भाजपच्या चाणक्यांचा सल्ला ऐकून मनसेने आपला झेंडा बदलला. बांगलादेशी, पाकिस्तानी यांच्या विरोधात षड्डू ठोकले.
अधिवेशनात बोलताना राज यांनी केंद्र सरकारच्या सीएए व एनआरसीविरोधात निघणाऱ्या मोर्चांना मोर्चाने उत्तर दिले जाईल, असे जाहीर केले. त्यानंतर, मनसेच्या नेत्यांनी आपला मोर्चा सीएएच्या समर्थनार्थ नसून घुसखोरांविरोधात असल्याची सारवासारव केली. राज यांनी मोर्चात बोलताना केलेली दगडाला दगडाने व तलवारीला तलवारीने उत्तर देण्याची भाषा ही शाहीनबाग, नागपाडा वगैरे ठिकाणी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना चिथावणारी होती. केंद्रात सत्तेवर आल्यावर देशासमोरील आर्थिक प्रश्न सोडवण्यात फारसे यश न आलेल्या भाजप सरकारने दिल्ली विधानसभा निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा हिरिरीने मांडला. येणाऱ्या पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांत हिंदुत्वाचे अस्त्र भाजप वापरणार, असे संकेत सध्या मिळत आहेत. सीएए, एनआरसी किंवा राम मंदिर या कुठल्याच मुद्द्यांवर समोरून जहाल प्रतिसाद येत नसल्याने हिंदुत्वाची भट्टी कशी पेटवायची, असा प्रश्न भाजपला पडला आहे. अशा वेळी तलवारीला तलवारीने उत्तर देणारा एखादा भिडू लाभला, तर भाजपला अपेक्षित ठिणगी पडू शकते, असे त्या पक्षातील काही नेत्यांना वाटत आहे. मात्र, भाजपसारख्या देशाची सत्ता ताब्यात असलेला पक्ष जर हिंदुत्वाच्या गर्जना करणार असेल, तर मनसेने हिंदुत्वाच्या नावाने केलेले म्यांव म्यांव कोण कशाला ऐकेल व मनसेला या मुद्द्यावर कशाला मतदान करील, अशी शंका वाटते. भाजपला हिंदुत्वाच्या अवकाशात भागीदार नको, हे शिवसेनेच्या लक्षात येताच त्यांनी त्यांची साथ सोडली.
कुठल्याही ‘भाई’चा ‘बारक्या’ हा कधीच भाई होत नाही. त्यामुळे मनसेचा आपल्या राजकीय फायद्याकरिता वापर करायचा, हा भाजपचा हेतू लपून राहिलेला नाही. समजा, हिंदुत्वाचा मुद्दा चालला नाही व सत्तेकरिता पुन्हा मित्रपक्षाची गरज लागली, तर संख्याबळावर भाजप शिवसेनेला जवळ करील की मनसेला, याचाही शांतपणे विचार करण्याची गरज आहे. काही महिन्यांपूर्वी राज यांच्या पाठीमागे कोहिनूर खरेदीसंबंधी लागलेला (की लावला गेलेला) ईडीच्या चौकशीचा ससेमिरा अचानक बंद झालेला आहे. मनसेची बदललेली भूमिका व ईडीची बंद झालेली फाइल, याचा अन्योन्यसंबंध असल्याचे सर्वसामान्यांच्या मनात घोळत राहिल्यावाचून राहत नाही. राज यांनी नाशिकमध्ये सत्ता असताना काही चांगली कामे केली. राज्यात बेकायदा टोलवसुलीला वेसण घालण्याकरिता आंदोलन केल्याने काही बेकायदा टोलनाके बंद झाले. राजकारणात सध्या राज यांच्याकरिता कठीण काळ आहे. अशा वेळी त्यांनी सावधपणे बाळासाहेबांच्या समाजकारणाचा वसा सांभाळला, तर लोकांच्या मनातील त्यांचे स्थान प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाईल आणि शिवमुद्रेचा स्वीकार सार्थ ठरेल.