रेल्वेपेक्षा श्रेयवादाची एक्स्प्रेस सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:30 AM2017-11-18T00:30:00+5:302017-11-18T00:33:38+5:30

मनमाड- मालेगाव- धुळे- इंदूर या ३५४ कि.मी.च्या रेल्वेमार्गाला अंतिम मान्यता मिळाल्याने खान्देशच्या दृष्टीने ही मोठी उपलब्धी आहे. आता या मार्गाच्या श्रेयावरून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे आणि भाजपाचे धुळ्यातील आमदार अनिल गोटे यांच्या गटात सुरू झालेला विवाद हा अशोभनीय असा आहे.

 Shreywada Express Express than the train | रेल्वेपेक्षा श्रेयवादाची एक्स्प्रेस सुसाट

रेल्वेपेक्षा श्रेयवादाची एक्स्प्रेस सुसाट

Next

मनमाड- मालेगाव- धुळे- इंदूर या ३५४ कि.मी.च्या रेल्वेमार्गाला अंतिम मान्यता मिळाल्याने खान्देशच्या दृष्टीने ही मोठी उपलब्धी आहे. आता या मार्गाच्या श्रेयावरून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे आणि भाजपाचे धुळ्यातील आमदार अनिल गोटे यांच्या गटात सुरू झालेला विवाद हा अशोभनीय असा आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, सुरेश प्रभू यांच्या पुढाकारामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागला आहे. गडकरी यांच्याकडील शिपिंग मंत्रालयाने या मार्गासाठीची ६ हजार १८५ कोटींची तरतूद स्वनिधीतून करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने रेल्वे मंत्रालय, महाराष्टÑ व मध्य प्रदेश सरकारला आर्थिक तोशीस लागणार नाही. असे नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत निश्चित झाले आहे. लवकरच या मार्गाचे भूमिपूजन होणार आहे. हा मार्ग व्हावा यासाठी सर्वपक्षीय नेते, विविध व्यावसायिक, नागरिक, सामाजिक व स्वयंसेवी संस्था यांनी अनेक वर्षे आंदोलने केली. प्रत्येक निवडणुकीत या रेल्वे मार्गाचा प्रचाराचा मुद्दा असायचा.
धुळेकर तर हा मार्ग होईल, यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. परंतु डॉ.सुभाष भामरे हे केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट झाले आणि त्यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पाठपुरावा करून या प्रश्नाला गती दिली. भामरे यांच्या निमंत्रणावरून दोन महिन्यांपूर्वी प्रभू धुळ्यात आले आणि त्यांनी या रेल्वे मार्गाची घोषणा केली. रेल्वेमंत्र्यांनी घोषणा केल्याने धुळेकरांना आनंद झाला.अचानक प्रभू यांच्याकडील रेल्वे मंत्रालय काढले गेले. पुन्हा या रेल्वेमार्गाविषयी अनिश्चितता पसरली. श्रेयवादातून पुन्हा नकारात्मक वातावरण तयार होऊ लागले. माहिती अधिकारात रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीचा वापर करीत संभ्रम वाढविला गेला. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या आग्रही भूमिकेमुळे हा मार्ग होणारच, असा विश्वास भाजपा कार्यकर्ते देत होते. पण अनेक वर्षांचा अनुभव लक्षात घेता धुळेकर संभ्रमात होते.नवी दिल्लीत गडकरी यांनी महाराष्टÑाच्या जलसंपदा, जहाजबांधणी या विषयांशी संबंधित प्रश्नांसाठी बैठक बोलावली. मुख्यमंत्र्यांसह काही मंत्री, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्याचवेळी भामरे हे संरक्षणविषयक परिषदेसाठी कॅनडाला गेले होते. त्यामुळे ते बैठकीला उपस्थित नव्हते. आमदार अनिल गोटे मात्र हजर होते. त्यामुळे भामरे नव्हे, तर आमच्यामुळे हा मार्ग मंजूर झाला, असा दावा गोटे आणि त्यांचे समर्थक आता करीत आहेत. तर भामरे समर्थकांकडून गोटेंचा या मार्गाला असलेला विरोध, त्यांनी या रेल्वेमार्गाविषयी केलेला अपप्रचार याविषयी दाखल्यांसह माहिती प्रसारित होत आहे. एका महत्त्वपूर्ण विषयावर दोन्ही सुजाण लोकप्रतिनिधींच्या समर्थकांकडून होणारी ही श्रेयवादाची लढाई धुळेकरांना रुचणारी नाही. आता कुठे रेल्वे मार्ग मंजूर झाला आहे. भूसंपादन, उभारणी हे सगळे बाकी असताना त्यासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा करण्याऐवजी एकाच पक्षातील दोन लोकप्रतिनिधींमध्ये अशा प्रकारे श्रेयवाद रंगणे हे भाजपाच्या प्रतिमेच्यादृष्टीने योग्य नाही. भामरे सेनेतून तर गोटे लोकसंग्राममधून या निवडणुकीत भाजपामध्ये आले आहेत, त्यामुळे निष्ठावंत मंडळी कुंपणावर बसून या वादाकडे बघ्याची भूमिका घेत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेचे कार्यकर्ते मात्र या लढाईतून करमणूक करून घेत आहेत.
- मिलिंद कुलकर्णी

Web Title:  Shreywada Express Express than the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.