डोळे दिपवून टाकणारे श्रीश्रींचे जनसंपर्क प्रदर्शन!
By admin | Published: March 18, 2016 03:55 AM2016-03-18T03:55:32+5:302016-03-18T03:55:32+5:30
केन्द्रीय मंत्रिमंडळातील अर्धा डझन मंत्री श्रीश्री रविशंकर यांच्यासमवेत उभे. त्यात अर्थमंत्री, भाजपा अध्यक्ष, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष यांचा समावेश असल्याने दिल्लीच्या
- राजदीप सरदेसाई
(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)
केन्द्रीय मंत्रिमंडळातील अर्धा डझन मंत्री श्रीश्री रविशंकर यांच्यासमवेत उभे. त्यात अर्थमंत्री, भाजपा अध्यक्ष, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष यांचा समावेश असल्याने दिल्लीच्या सत्ता वर्तुळाचे ते ऐतिहासिक चित्र होते. अरुण जेटली यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला असला आणि भाजपा व आपचे नेते परस्परांवर शाब्दिक हल्ले करीत असले तरी यमुनातीरावर भरवण्यात आलेल्या श्रीश्रींच्या राजकीय-सांस्कृतिक उत्सवाला हे लोक विरोध विसरून एकत्र आले होते. या विश्व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले तर समारोप काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत झाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दांडगा जनसंपर्क बाळगणारे मोठे स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु असल्याचे आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक श्रीश्री रविशंकर यांनी अधोरेखित केले आहे.
डोळे दिपवून टाकणारे आयोजन असले की त्याच्या भोवतीचे वाद आपोआपच शमले जातात. कार्यक्रमाच्या एक दिवस आधीच राष्ट्रीय हरित लवादाने पर्यावरणाची हानी केली म्हणून पाच कोटींचा दंड ठोठावला होता. पण त्यावर बोलताना आपण दंड भरण्यापेक्षा कारागृहात जाणे पसंत करु असे उत्तर अत्यंत कोडगेपणाने श्रीश्रींनी दिले होते. पण इतके होऊनही पंतप्रधान दोन तास या कार्यक्रमात उपस्थित होते. एखाद्या सामान्य माणसाने सिग्नल तोडला, दंड भरण्यास नकार दिला आणि पोलिसांना अटक करण्याचे आव्हान दिले तर पोलीस आयुक्त त्याचा आदर्श नागरिक म्हणून सत्कार करतील? पण हल्ली असेच काहीसे होते आहे. गरीब माणसाची बेकायदेशीर झोपडी झोंबणाऱ्या थंडीत पाडली जाते पण आर्थिकदृष्ट्या संपन्न अध्यात्मिक गुरूच्या बेकायदेशीर कृतीला मात्र पंतप्रधानांचे अभय प्राप्त होते.
पण एकट्या नरेंद्र मोदींना तरी का जबाबदार धरावे? श्रीश्रींच्या कार्यक्रमातील आयोजनाचे यश त्यांच्या सर्वसमावेशकतेत व भेदभावरहित पद्धतीत आहे. म्हणूनच
लष्कराच्या एका तुकडीला तात्पुरता पूल बांधण्यासाठी बोलावण्यात आले होते. नागरी विकास मंत्रालयाला तात्पुरती शौचालये पुरवण्यास सांगितले गेले होते. कार्यक्रमाच्या आयोजनात दिल्ली सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील नवरत्न कंपन्या होत्या आणि म्हणूनच हा कार्यक्रम खासगी होता. केजरीवाल जरी आम आदमीसाठी झगडण्याचा आणि व्हिआयपी संस्कृतीस विरोध करण्याचा दावा करीत असले तरी ते या कार्यक्रमात खास आदमींसोबत व्यासपीठावर अगदी आनंदात होते.
अर्थात यात आश्चर्यकारक असे काही नाही. इतकी वर्षे निर्माण करुन ठेवलेल्या राजकीय संबंधांचा श्रीश्री फायदा करून घेताना दिसत आहेत. त्यांनी जरी म्हटले असले की या सांस्कृतिक कार्यक्रमाचे राजकियीकरण करू नका तरी प्रत्यक्षात त्यांनी राजकारण्यांशी लगट करताना कोणतीच भीड बाळगलेली नाही. २००१च्या महाकुंभात ते साधू-संत समाजाचे सदस्य होते आणि विश्व हिंदू परिषदेच्या धर्म संसदेत अयोध्येतल्या राम मंदिराची पुन्हा घोषणा करण्यात आली तेव्हांही ते तिथे हजर होते. केजरीवाल स्वत:च्या पायावर उभे राहण्यापूर्वीपर्यन्त श्रीश्री अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी लढ्यात सामील होते आणि २०१४च्या निवडणूक प्रचारात त्यांच्या स्वयंसेवकांनी उघडपणे मोदींची पाठराखण केली होती.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे थेट प्रसारण एकूण १५० देशांमध्ये झाल्याचा दावा श्रीश्रींच्या समर्थकांनी केला असून त्याचा त्यांनी काढलेला अर्थ म्हणजे भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध वाढत आहेत. पण प्रत्यक्षात ही बाब म्हणजे सौम्य हिंदू शक्तीचा उदय आहे. कार्यक्रमाला काही मौलवी, आखातातले शेख आणि आर्ट आॅफ लिव्हिंगचे आंतरराष्ट्रीय सदस्य उपस्थित होते, पण श्रीश्री यांच्या अनुयायांचा मोठा वर्ग म्हणजे शहरी भागातले मध्यमवर्गीय हिंदू आहेत. राजकारणी वर्ग त्यांच्या जवळ राहून याच शहरी हिंदू मतांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
श्रीश्रींकडे लोकाना मोठ्या प्रमाणात आकर्षित करुन घेण्याचे कौशल्य आहे, ते त्यांच्या अध्यात्मिक व सौम्य चतुराईच्या बळावर. श्रीश्री म्हणजे आपल्या गरजा मर्यादित ठेवणारे नव्हे तर पहिल्या वर्गाने प्रवास करणारे गुरु आहेत. ते ‘बेन्टले’मध्ये बसून मुलाखती देतात, बंगळुरूतील आलिशान आश्रमात तर राजधानीत आलिशान भागात राहतात आणि नेहमीच उच्चभ्रू लोकांच्या वर्तुळात वावरतात. त्यांच्या वकिलांनी न्यायालयात जरी सांगितले असले की आर्ट आॅफ लिव्हिंगकडे पाच कोटी नाहीत, तरी श्रीश्रींनी ज्या पद्धतीने भव्य दिव्य समारोहाचे आयोजन केले ते बघता त्यांच्यापाशी मोठा आर्थिक स्त्रोत असल्याचे लपून राहत नाही.
याचा अर्थ असा नव्हे की श्रीश्री रविशंकर यांना झोतात राहण्याचा अधिकार नाही. सध्याचे दिवसही तसे गाजावाजा करण्याचेच आहेत. त्या शिवाय एखादा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मोठ्या बुद्धिमत्तेचीही गरज भासत नाही. आनंदी राहाण्याचे अध्यात्म विकणाऱ्यांच्या क्षेत्रातील श्रीश्रींप्रमाणेच बाबा रामदेव हेदेखील सरकारच्या मर्जीतले आहेत. त्यांनी आता मोठा यशस्वी आंतरराष्ट्रीय व्यवसायही उभारला आहे. प्रश्न इतकाच की सरकारने या अध्यात्मिक मित्रांवर कृपा का करावी आणि या मोठा संपर्क असणाऱ्या गुरु, बाबांना (आणि हो इमाम आणि मुल्लांना) विशेष सोयी-सुविधा का पुरवाव्यात? रामदेव बाबांचे योग शिबीर वा खाद्य उत्पादने असोत किंवा पर्यावरणाशी निगडीत मुद्यांकडे डोळेझाक करून केलेला श्रीश्री रविशंकर यांचा कार्यक्रम असो, यातून ‘सब का साथ सब का विकास’ हे ध्येय साध्य होते का? का श्रीश्री आणि रामदेव यांच्यासारखे लोक व बदमाश, हितसंबंधी भांडवलदार सारे सारखेच आहेत?
आणखी एक विशेष बाब म्हणजे नव्या युगाचे गुरु श्रीश्री रविशंकर हे काही बाबतीत राजकारण्यांच्याही पुढे गेले आहेत. गेल्या महिन्यात त्यांनी समलिंगी संबंधांचे जोरदार समर्थन केले आणि ३७७वे कलम रद्द करण्याची मागणी केली. पण त्यांच्यासोबत व्यासपीठावर मिरवणाऱ्या एकाही राजकारण्याची अशी प्रागतिक भूमिका घेण्याची इच्छा दिसत नाही.
ताजा कलम- विश्व सांस्कृतिक महोत्सवातला महत्वाचा प्रसंग म्हणजे पाकिस्तानातल्या मौलवींनी दिलेली ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणा. श्रीश्रींनी त्यावर मंद हास्य करत त्यांना ‘जय हिंद’ म्हणण्याचेही सुचवले होते. एका मित्राने मला विचारले की अशा एकत्रित घोषणा देण्याने राष्ट्रद्रोह होऊ शकेल का? मी त्यावर स्मित करीत उत्तर दिले, ‘तुमचे ध्येय शांततेचा नोबेल पुरस्कार असेल, तर नाही होऊ शकत’!