कृत्रिम रेतन पद्धतीने तयार केलेल्या दोन मानवी भ्रूणांच्या जनुकीय संरचनेत फेरबदल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 05:08 AM2018-12-06T05:08:07+5:302018-12-06T05:08:15+5:30
‘जेन एडिटिंग’चे हे तंत्रज्ञान मानवी प्रजननात वापरावे की नाही यावर वैज्ञानिक विश्वात अद्याप ठाम एकवाक्यता नाही.
‘जेन एडिटिंग’चे हे तंत्रज्ञान मानवी प्रजननात वापरावे की नाही यावर वैज्ञानिक विश्वात अद्याप ठाम एकवाक्यता नाही. एक तर हे तंत्रज्ञान नवे असल्याने ते फसल्यास काय दुष्परिणाम होऊ शकतात याचा शास्त्रशुद्ध अभ्यास अद्याप झालेला नाही. चीनमधून आलेल्या एका ताज्या बातमीने भयसूचक संकटाची चाहुल लागल्याने वैज्ञानिक विश्वात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ही बातमी आहे जनुकीय फेरबदलाची. शेनझेन शहरातील ‘सदर्न युनिव्हर्सिटी आॅफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी’मधील हे जिआनकुई या वैज्ञानिकाने प्रयोगशाळेत कृत्रिम रेतन पद्धतीने तयार केलेल्या दोन मानवी भ्रूणांच्या जनुकीय संरचनेत फेरबदल केल्याचा दावा हाँगकाँग येथे भरलेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत केला. या दोन भ्रूणांचे एका महिलेच्या गर्भाशयात रोपण करण्यात आले व त्यातून दोन जुळ्या मुली जन्माला आल्या. या भ्रूणांच्या फलनासाठी ज्या वडिलांचे शुक्राणू वापरले गेले ते ‘एचआयव्ही’ग्रस्त आहेत. हे यांनी केलेल्या दाव्यानुसार ‘एचआयव्ही’चे संक्रमण पित्याकडून अपत्याकडे होऊ नये यासाठी त्यांनी दोनपैकी एका भ्रूणाच्या जनुकीय संरचनेत फेरबदल करून ज्यामुळे ‘एचआयव्ही’ची लागण होणे सुलभ होते असे जनुक त्यांनी काढून टाकले. या प्रक्रियेस जनुकीय संपादन (जिन एडिटिंग) असे म्हटले जाते. ‘एडिटिंग’ म्हणजे मुळात जे असेल त्यात आपल्याला हवे त्यानुसार फेरबदल करून घेणे. यासाठी हे यांनी ‘जिन एडिटिंग’च्या ‘क्रिस्पर-कॅस९’ या तंत्रज्ञानाचा वापर केला. ‘डीएनए’मध्ये सहजगत्या फेरबदल करण्याचे हे तंत्रज्ञान अगदी अलीकडे म्हणजे सन २०१२ मध्ये विकसित झाले आहे. जनुकीय फेरबदल ही काही नवी गोष्ट नाही. कृषिविज्ञानाच्या क्षेत्रात या तंत्राचा वापर करून विविध प्रकारच्या पिकांचे ‘जेनेटिकली मॉडिफाईड’ (जीएम) वाण यापूर्वीच तयार करण्यात आले आहेत. अशा ‘जीएम’ पिकांचे अनेक देशांत मोठ्या प्रमाणावर व्यापारी उत्पादनही घेतले जाते. अर्थात भारतासह अन्य काही विकसनशील देशांमध्ये हा विषयही वादाचा ठरला आहे. पण चीनमधील या नव्या प्रयोगाने जी जोरदार चर्चा सुरू झाली आहे ती वेगळ्या कारणाने आहे. मानवाच्या संदर्भात हे तंत्रज्ञान वापरताना नैतिक बाबींचाही गांभीर्याने विचार करावा लागेल. या तंत्रज्ञानाचा वापर करून फलदायी अशा गुणवैशिष्ट्यांची पिके घेणे आणि हव्या त्या गुणवैशिष्ट्यांचा माणूस जन्माला घालणे यांची तुलना होऊ शकत नाही. मुख्य म्हणजे या तंत्रज्ञानाचा वापर फक्त व्याधीमुक्तीपुरता मर्यादित ठेवावा की त्या पलीकडे जाऊनही करू दिला जावा हा तिढा सोडविणे वाटते तेवढे सोपे नाही. हे तंत्रज्ञान वापरून ठरावीक वर्णाच्या, ठरावीक उंचीच्या एवढेच नव्हेतर, फक्त उच्च बुद्धिमत्तेच्या भावी मानवी पिढ्या जन्माला घालणेही अशक्य नाही. कोणतेही तंत्रज्ञान चांगल्याप्रमाणे वाईटासाठीही वापरले जाऊ शकते. जो भविष्यात संपूर्ण जगाच्या विनाशास कारणीभूत ठरू शकेल असा शतप्रतिशत दुष्प्रवृत्त माणूसही याच तंत्रज्ञानाने जन्माला घातला जाऊ शकेल. हा ब्रह्मराक्षस बाटलीत बंद आहे, तोपर्यंतच ठीक आहे. बाटलीतून बाहेर काढण्यापूर्वी त्याला पूर्ण नियंत्रणात ठेवण्याची तयारी आधीच करून ठेवावी लागेल. तीन दशकांपूर्वी जगात पहिली टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आली तेव्हा मोठा अजुबा वाटला होता. पण आता ते तंत्रज्ञान एवढे सर्वसामान्य झाले आहे की, त्याचा वापर करणारी वंध्यत्व निवारण केंद्रे अगदी जिल्हा शहरांमध्येही सुरू झाली आहेत. ‘जिन एडिटिंग’चे तंत्रही पुढील काही वर्षांत अशा केंद्रांपर्यंत झिरपेल. मग निपुत्रिक दाम्पत्यांना केवळ मूलच नाही, तर हवे तसे मूल देण्याचा धंदा सुरू होण्यास वेळ लागणार नाही. सोनोग्राफीसारखे तंत्रज्ञान आल्यावर त्याचा स्त्रीभ्रूणहत्येसाठी सर्रास वापर करण्याची विकृती लगोलग फोफावली. तिला आळा घालण्यासाठी केलेला कायदाही कसा तोकडा पडला याचा अनुभव ताजा आहे. हे तंत्रज्ञान ‘डिझायनर बेबी’ जन्माला घालण्यासाठी नाही, याचे ठाम भान ठेवावे लागेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर सरकारे, वैज्ञानिक, धार्मिक पुढारी अशा सर्वांनी एकत्र बसून निश्चित मर्यादांची चौकट ठरवून घ्यावी लागेल. ज्याने समाजात आधीच असलेले भेदाभेद, पक्षपात व दुही वाढीस लागणार नाही असे काहीही करण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरण्यावर संपूर्ण बंदी घालावी लागेल. जोपर्यंत ही तयारी
होत नाही तोपर्यंत हे तंत्रज्ञान मानवी जीवनापासून दूरच ठेवणे इष्ट
ठरेल.