शूर्पणखेचे बंड...

By राजा माने | Published: December 11, 2017 12:07 AM2017-12-11T00:07:30+5:302017-12-11T00:57:00+5:30

आज वेगळ्याच विषयामुळे इंद्रदरबार तापला होता. मराठी भूमीतील स्टार रिपोर्टर यमके (म्हणजे आपला एम.के. अर्थात मनकवडे हो!) यालाही दरबारात हजर करण्याचे फर्मान इंद्रदेवांनी जारी केले होते.

 Shurpakha's rebellion ... | शूर्पणखेचे बंड...

शूर्पणखेचे बंड...

Next

आज वेगळ्याच विषयामुळे इंद्रदरबार तापला होता. मराठी भूमीतील स्टार रिपोर्टर यमके (म्हणजे आपला एम.के. अर्थात मनकवडे हो!) यालाही दरबारात हजर करण्याचे फर्मान इंद्रदेवांनी जारी केले होते. ‘स्टार’ असला तरी यमकेची रिपोर्टरपदाची नियुक्ती कन्फर्म नसल्याने त्याला त्याचे महागुरू नारद यांच्याकडून व्हीव्हीआयपी पास घेऊनच इंद्र दरबारात प्रवेश मिळवावा लागला होता. अखेर शूर्पणखा व यमकेला इंद्रदेवांपुढे हजर करण्याचा पुकारा झाला. शूर्पणखा पाय आपटत तर यमके घाम पुसत हजर झाले. इंद्रदेवांच्या इशाºयाने दरबार सुरू झाला.
शूर्पणखा : इंद्रदेवा, त्रिलोकी असलेले माझे विद्रूप नाकाचे ‘पेटंट’ धोक्यात आले आहे. कोकण नरेश नारायण दादांनी उद्धवराजांना नाक नसल्याचा दावा करून माझा अवमान केला आहे.
इंद्रदेव : उद्धवराजांचे नाक, नारायण दादा आणि तुझा काय संबंध?
शूर्पणखा : देवा संबंध कसा नाही, घासून घासून नाक विद्रूप झाल्यास माझ्या विद्रूप नाकाचे ‘पेटंट’ धोक्यात येणार नाही का? पण प्रश्न आता उद्धवराजांच्या विद्रूप नाकापुरता मर्यादित राहिलेला नाही. नारायण दादांच्या त्या घोषणेमुळे आता मराठी भूमीतील जिल्ह्या-जिल्ह्यातील नाक घासणाºयांची नाके धोक्यात आली आहेत...
इंद्रदेव : शूर्पणखे, अगं, नारायण दादांना कधी महाराष्टÑानं सिरियसली घेतले आहे का, तू कशाला सिरियसली घेते.
शूर्पणखा : देवा ‘पेटंट’ धोक्यात आल्यावर आमच्यासारख्या विद्रूपींनी काय करायचे?
इंद्रदेव : यमके, शूर्पणखा म्हणते ते खरे आहे का?
यमके : देवा शूर्पणखाताई म्हणतात ते खरं आहे.
इंद्रदेव : शूर्पणखे तुझ्या ‘पेटंट’ला कोणताही धोका नाही. यमकेने आम्हाला मराठी भूमीतील नाकघासे रोगाची माहिती दिलीच होती. आम्ही विठ्ठलनामक लहाने या सर्जरीदूतास खास विमान देऊन ‘नाक’ सुरक्षेची मोहीम बहाल केली आहे.
शूर्पणखा : बघा देवा, राम-लक्ष्मणांनी माझे नाक कापले अन् रावणामुळे रामायण घडले. आता नारायण दादांच्या कृतीमुळे ‘भाजपायन’ घडू नये. इंद्रदेवांनी घासलेल्या नाकासाठी घेतलेल्या काळजीमुळे दरबार खूश झाला आणि यमकेही नागपूर आॅरेंज सिटी असाईनमेंटच्या तयारीला लागला.
- राजा माने

Web Title:  Shurpakha's rebellion ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.