श्याम बेनेगल : कधीही न थांबलेला दिग्दर्शक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 07:23 IST2024-12-25T07:22:51+5:302024-12-25T07:23:05+5:30
न थांबता-थकता, आपल्या वैचारिक भूमिकेशी प्रामाणिक राहून कार्यरत राहिलेले श्यामबाबू अनेक तरुण दिग्दर्शकांसाठी, या क्षेत्रातल्या प्रत्येकासाठी प्रेरणास्थान होते, आहेत, राहतील!

श्याम बेनेगल : कधीही न थांबलेला दिग्दर्शक
श्याम बेनेगल हे आपल्या समांतर चित्रपट चळवळीचा चेहरा होते. समांतर सिनेमा चळवळ वर्ष १९६९ मध्ये मृणाल सेन यांच्या 'भुवन शोम' या चित्रपटापासून सुरू झाली असं मानलं जातं, तर बेनेगलांचा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट 'अंकुर' हा वर्ष १९७३ मध्ये आला; पण 'अंकुर'ने या चळवळीला एक नवं बळ मिळाल्यासारखं झालं. हैदराबादमधे घडलेल्या सत्य कथेचा आधार असलेल्या 'अंकुर'मध्ये जमीनदारी अत्याचाराची कथा वास्तववादी पद्धतीने मांडली होती, तिही प्रत्यक्ष हैदराबादमधे चित्रीकरण करत, तिथला प्रांतीय तपशील दृश्य मांडणीत आणि संवादात उतरवून.
'अंकुर', 'निशांत' (१९७५) आणि 'मंथन' (१९७६) या पहिल्या तीन चित्रपटांमधून श्याम बेनेगल हे आपल्या चित्रपटसृष्टीतलं महत्त्वाचं नाव म्हणून पुढे आलं. ग्रामीण जीवनाचं एक अस्सल, काहीसं भेदक चित्र या चित्रपटांनी उभं केलं. छायालेखक आणि पुढे दिग्दर्शक झालेले गोविंद निहलानी, 'निशांत/मंथन' लिहिणारे तेंडुलकर, शबाना आझमी, अनंत नाग, नसीरुद्दीन शाह, स्मिता पाटील अशी कर्तबगार कलावंतांची एक फळीच बेनेगलांच्या या ग्रामीण त्रयीने उभी केली आणि गंभीर प्रकृतीचा, व्यावसायिक चित्रपटापेक्षा सर्वार्थाने भिन्न असूनही स्वतःचा वेगळा प्रेक्षकवर्ग उभा करणारा हा नवा सिनेमा अस्तित्वात आला.
आजही बेनेगल म्हटलं की, त्यांचं समांतर सिनेमाच्या काळातलं काम आणि प्रामुख्याने हे तीन चित्रपट आठवतात. हंसा वाडकरांच्या चरित्रावर आधारलेला 'भूमिका' (१९७७) किंवा विनोदाचा उपहासात्मक वापर करणारा 'मंडी' (१९८३) अशा स्त्रीवादी म्हणता येणाऱ्या चित्रपटांमधूनही बेनेगलांनी आपली एक वेगळी बाजू दाखवली.
समांतर चित्रपट म्हणजे छोटी, आटोपशीर, कमी खर्चात भागणारी निर्मिती असल्याचा एक समज असतो. हा समज खोटा ठरवतील असे आणि तत्कालीन समांतर सिनेमाच्या व्याख्या रुंदावणारे दोन चित्रपट बेनेगलांनी या काळात दिले. ते म्हणजे १८५७ च्या बंडाची पार्श्वभूमी असलेला 'जुनून' (१९७९) आणि महाभारताचं आधुनिक रूप असलेला 'कलयुग' (१९८१).
लोकप्रिय अभिनेता शशी कपूरची निर्मिती असल्याने आणि तो स्वतः प्रमुख भूमिकेत असल्याने व्यावसायिक आणि कलात्मक या दोन विचारधारांना वाहिलेल्या चित्रपटांचा एक अनपेक्षित संगम या चित्रपटांमधे दिसून येतो. मोठा अवाका, श्रीमंती निर्मितीमूल्य, नटसंचात व्यावसायिक अभिनेत्यांचा समावेश (विशेषतः 'कलयुग'मध्ये) या सगळ्यात डोकावणारा व्यावसायिक सिनेमा; मात्र दिग्दर्शकीय भूमिका आणि संहितेची रचना यांमधली कलात्मकता, अशी ही वैशिष्ट्यपूर्ण योजना होती. हे चित्रपट काळाच्या थोडे पुढचे होते. तेव्हापेक्षा आज त्यांच्याकडे या दृष्टिकोनातून पाहणं शक्य आहे.
समांतर चित्रपटाचा काळ ऐंशीच्या दशकाच्या मध्यावर संपुष्टात आला; पण श्यामबाबू तिथे थांबले नाहीत. त्यांनाही काही प्रमाणात तडजोडी कराव्या लागल्या; पण त्यांनी आपल्या कामाच्या दर्जावर त्यांचा परिणाम होऊ दिला नाही. रंगीत टेलिव्हिजन आल्याचा समांतर चित्रपटांना एक मोठा धक्का बसला. कारण चित्रपटगृहात जाणाऱ्या प्रेक्षकांची संख्या रोडावली. या काळात बेनेगलांनी 'यात्रा' (१९८६), 'भारत एक खोज' (१९८८) अशा मालिकांकडे आपला मोर्चा वळवला. या प्रकारचं महत्त्वाकांक्षी काम आपल्याला दूरदर्शनवर क्वचितच झालेलं दिसतं. तांत्रिक दर्जा, संकल्पना, कला दिग्दर्शन, निर्मितीमूल्य, आणि अभिनय या सर्वच बाबतींत या मालिकांना बेनेगलांच्या मोठ्या पडद्यावरल्या कामाचं एक्स्टेन्शन म्हणता येईल. छोट्या पडद्यावर ते थांबले मात्र नाहीत. काही काळातच त्यांचा मोठ्या पडद्यावरचा प्रवास पुन्हा सुरू झाला.
जवळजवळ पन्नास वर्षांची कारकीर्द असलेल्या, चोवीस चित्रपट आणि अनेक माहितीपट, तसंच मालिका केलेल्या आणि दादासाहेब फाळके पुरस्कारापासून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेल्या बेनेगलांच्या प्रत्येक चांगल्या चित्रपटाचा उल्लेख करायला ही जागा अपुरी आहे; पण तीन अरेषीय जोडकथांमधून सत्याची एक वेगळी मांडणी करणारा, धर्मवीर भारतींच्या कादंबरीवर आधारित चित्रपट 'सूरज का सातवाँ घोडा' (१९९३) आणि नंतरच्या काळात केलेली मुस्लीम स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवणारी त्रयी उल्लेख टाळता बदलत्या काळाबरोबर, (मम्मो/१९९४, सरदारी बेगम/१९९६ आणि झुबैदा/२००१) यांचा येण्यासारखा नाही. तंत्राबरोबर, विचारांबरोबर श्यामबाबू कसे बदलत राहिले, याची ही महत्त्वाची उदाहरणं आहेत.
आपल्या दिग्दर्शकीय कामाबरोबरच त्यांनी केलेल्या चित्रपट प्रसाराच्या कामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे काम फिल्म सोसायटी चळवळीतून सुरू झालं जिच्याशी ते कायम निगडित राहिले. 'हैदराबाद फिल्म सोसायटी'ची त्यांनी स्थापना केली आणि पुढल्या काळात त्यांनी ही चळवळ नियंत्रित करणाऱ्या 'फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिआ'चे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलेलं आहे. मुंबईत चित्रपट महोत्सव सुरू करणाऱ्या 'द मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेज' या संस्थेचेही ते प्रदीर्घ कालावधीसाठी अध्यक्ष राहिले. इतका मोठा काळ पाहिलेला आणि न थांबता, न थकता, आपल्या वैचारिक भूमिकेशी प्रामाणिक राहून काम करत राहिलेला हा मोठा दिग्दर्शक अनेक तरुण दिग्दर्शकांसाठी आणि या क्षेत्रात भरीव काही करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठीच कायम प्रेरणास्थान होता, आहे, राहील.
ganesh.matkari@gmail.com