पक्षहित धाब्यावर
By admin | Published: December 27, 2016 04:24 AM2016-12-27T04:24:14+5:302016-12-27T04:24:14+5:30
प्रश्न जेव्हां व्यक्तिगत स्वार्थाचा किंवा स्वत:स अनुकूल असलेल्या राजकारणाचा असतो, तेव्हां पक्षाचे व्यापक हित कसे सरळ सरळ धाब्यावर बसविले जाते याचे एकाच वेळी दोन
प्रश्न जेव्हां व्यक्तिगत स्वार्थाचा किंवा स्वत:स अनुकूल असलेल्या राजकारणाचा असतो, तेव्हां पक्षाचे व्यापक हित कसे सरळ सरळ धाब्यावर बसविले जाते याचे एकाच वेळी दोन अनुभव काँग्रेस पक्षाला सध्या घ्यावे लागत आहेत. दोन्ही अनुभव देणारे पुन्हा त्याच पक्षाचे माजी मुख्यमंत्री आहेत. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना तब्बल ५२ कोटी रुपये लाचेच्या स्वरुपात मिळाले असा अत्यंत गंभीर आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकताच केला असून या आरोपांची शहानिशा केली जावी आणि खुद्द मोदींनी आरोपांची चौकशी करण्याचे धार्ष्ट दाखवावे, अशी मागणी काँग्रेस पक्ष करीत आहे. तथापि ज्या कागदपत्रांच्या आधारे राहुल यांनी आरोप केले आहेत, त्या कागदपत्रांच्या सत्यतेबाबत काँग्रेस पक्षाच्या दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीतील त्याच पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या संभाव्य उमेदवार शीला दीक्षित यांनीच शंका उपस्थित केली आहे. याचे महत्वाचे कारण ज्या रोजनिशीत ‘सहारा’ समूहाने मोदी यांना ४० कोटी रुपये दिल्याची नोंद आढळून येते त्याच रोजनिशीत शीला दीक्षित यांनादेखील एक कोटी रुपये दिल्याची नोंद आहे. आपल्यावरील हे किटाळ टळावे म्हणून शीला दीक्षित यांनी संबंधित नोंदीच विश्वासार्ह नसल्याचे म्हटल्याने एकप्रकारे पक्षाने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जी भूमिका घेतली आहे तिलाच छेद दिला गेला आहे. अर्थात ज्या नोंदींच्या आधारे राहुल यांनी मोदींच्या विरोधात आरोप केला आहे, त्या नोंदी सर्वोच्च न्यायालयानेही अग्राह्य ठरविल्या आहेत, हे आणखीनच वेगळे. पक्षहित नजरेआड केला जाणारा दुसरा प्रकार आहे पंजाब विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या संदर्भात. पंजाब, हरयाणा आणि आणखी काही राज्यांचा ज्याच्याशी संबंध आहे त्या सतलज-यमुना पाणी करारास पंजाबचा कडाडून विरोध आहे. या करारान्वये हरयाणाला पंजाबने जे पाणी द्यावयाचे आहे ते देण्यास पंजाबची तयारी नाही. त्याबाबत त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे भावी उमेदवार कॅप्टन अमरिंदरसिंग यांची भूमिका अत्यंत टोकाची आहे. ती तशी असल्यानेच हरयाणाचे काँग्रेस पक्षाचेच माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांनी पंजाबात जाऊन काँग्रेस पक्षाचा प्रचार करण्याचे स्वच्छ शब्दात नाकारले आहे. पण त्यांची मनधरणी करण्यासाठी पंजाबचे पाणी वाटून घेण्याबाबत घेतलेली टोकाची भूमिका पातळ करण्यास कॅप्टन अमरिंदरसिंग हेदेखील अजिबात तयार नाहीत. सबब व्यक्तिगत इभ्रतीसाठी शीला दीक्षित यांनी तर प्रादेशिक राजकारणासाठी कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी पक्षाचे व्यापक हित नजरेआड केले आहे.