मधुमेहाचे दुष्परिणाम

By Admin | Published: February 28, 2016 02:53 AM2016-02-28T02:53:20+5:302016-02-28T02:53:20+5:30

मधुमेहामुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. ज्या रुग्णांची रक्तातील साखरेची पातळी सदैव अनियंत्रित असते, अशा रुग्णांना मधुमेहामुळे

Side effects of diabetes | मधुमेहाचे दुष्परिणाम

मधुमेहाचे दुष्परिणाम

googlenewsNext

(आरोग्याच्या कानामात्रा)
- डॉ. व्यंकटेश शिवणे

मधुमेहामुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. ज्या रुग्णांची रक्तातील साखरेची पातळी सदैव अनियंत्रित असते, अशा रुग्णांना मधुमेहामुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा धोका अधिक असतो. कित्येक वर्षांच्या संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, ज्या लोकांचा मधुमेह सदैव नियंत्रणात असतो, त्यांना हे दुष्परिणाम कमी प्रमाणात होतात. सर्वसाधारण मधुमेहामुळे हृदयविकार, पक्षाघात, डोळ्यांना अंधत्व येणे. पायाच्या संवेदना बधिर होणे, मूत्रपिंड निकामी होणे, पायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या निर्माण होऊन पायाला जंतुसंसर्ग होणे, यांसारखे दुष्परिणाम होतात.

हृदयविकार
मधुमेहामध्ये हृदयविकाराची शक्यता ५ ते ७ पटीने अधिक असते. जर मधुमेही धूम्रपान करणारा असेल तर ही शक्यता आणखीनच वाढते. मधुमेहींतील हृदयविकार हा इतर हृदयविकारांपेक्षा वेगळा असतो. हृदयाच्या एकापेक्षा जास्त रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होतात. शक्यतो यात दुखणे जाणवत नाही. म्हणूनच अनेकदा ते लक्षात येत नाही. हृदयविकार टाळण्याकरिता जेवणात मेदाचे प्रमाण कमी असावे. मद्यपान, धूम्रपान वर्ज्य करावे व डॉक्टरांच्या सल्ल्याने अ‍ॅस्परीन व कोलेस्ट्रॉल नियंत्रणात असणाऱ्या गोळ्या नियमित चालू ठेवाव्यात. वर्षातून किमान एकदातरी हृदयाची तपासणी करणे आवश्यक आहे; तसेच रक्तातील चरबीचे प्रमाणही नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.

डोळ्यांना अंधत्व येणे
मधुमेही रुग्णांमध्ये डोळ्यांच्या मागच्या पडद्यावर परिणाम होतो. ज्यामुळे या पडद्यावर रक्तस्राव होऊन तो दुभंगला जाऊ शकतो; परिणामी आयुष्यभर अंधत्व येऊ शकते. कमी वयामध्ये मोतीबिंंदूची शक्यताही अधिक असते. म्हणूनच वर्षातून किमान एक वेळा डोळ्यांची पूर्ण तपासणी करणे आवश्यक असते. भारतामध्ये अंधत्वाच्या कारणांमध्ये मधुमेहामुळे येणाऱ्या अंधत्वाचे प्रमाण खूप जास्त आहे.

मधुमेह आणि मूत्रपिंड
मूत्रपिंडाचे मुख्य काम रक्त शुद्ध करणे आहे. मधुमेहाचे प्रमाण खूप जास्त वाढले किंवा तो अनियंत्रित असेल तर मूत्रपिंंडातून शरीरातील प्रथिने लघवीवाटे बाहेर फेकली जातात. ज्यामुळे मूत्रपिंड हळूहळू निकामी होत जाते. रक्तदाब असणाऱ्या मधुमेही रुग्णांमध्ये याचे प्रमाण खूप आहे. याचा प्रतिबंध करण्यासाठी मिठाचा वापर कमी करावा. मूत्रपिंड पूर्णत: निकामी झाले तर डायलेसिसवर जावे लागते. भारतात डायलेसिस घेणाऱ्या रुग्णांमध्ये मधुमेही रुग्णांची संख्या सर्वांत जास्त आहे. वर्षातून एकदा तरी मूत्रपिंडाची तपासणी करणे आवश्यक आहे.

मधुमेह आणि पाय
मधुमेही रुग्णांमध्ये रक्तातील साखर वाढल्यामुळे पायांच्या संवेदना बधिर होतात. पायांना सुन्नपणा येणे, पायांची जळजळ होणे किंवा पायात गोळे येणे यांसारखी लक्षणे उद्भवतात. ही संवेदना कमी झाल्यामुळे पायाला एखादी जखम झाली तरी आपल्याला दुखत नाही. त्यामुळे झालेली जखम चटकन लक्षात येत नाही. परिणामी, जंतुसंसर्ग होतो व पायाची बोटे किंवा कित्येक वेळा पायही कापावा लागतो. मधुमेहामुळे पायाला होणाऱ्या अंपगत्वाचे प्रमाण भारतात अधिक आहे. म्हणूनच वर्षातून किमान एक वेळा तरी पायाची तपासणी करणे आवश्यक आहे.

पक्षाघात : मधुमेही रुग्णांमध्ये मेंदूमध्ये रक्तस्राव होणे किंवा हृदयाच्या गुठळ्या तयार होण्याची शक्यता जास्त असते. अशा रुग्णांना शरीराच्या एका भागामध्ये लकवा मारला जातो व शरीर अधू होते. याचा प्रतिबंध करण्यासाठी मधुमेह, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते.

इतर दुष्परिणाम : मधुमेहामुळे वारंवार जंतुसंसर्ग होणे, क्षयरोगाचे प्रमाण वाढणे, लघवीच्या जागी होणारा जंतुसंसर्ग, पुरुषांमध्ये जननेंद्रियात येणारी शिथिलता, नैराश्य, चिडचिडेपणा, स्थूल मधुमेही स्त्रियांमध्ये पाळीमध्ये होणारा त्रास किंवा गर्भाशयाच्या तक्रारी, स्थूल मधुमेही रुग्णामध्ये होणारे यकृताचे आजार हेही गंभीर दुष्परिणाम दिसून येतात.

 

Web Title: Side effects of diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.