पक्ष गारठला

By Admin | Published: January 19, 2015 10:47 PM2015-01-19T22:47:32+5:302015-01-19T22:47:32+5:30

काँग्रेसच्या पराभवाचे प्रामाणिक कार्यकर्त्याला शल्य आहे़ या पक्षाला पुन्हा उभे करण्यासाठी परिश्रमाची त्याची तयारी आहे़ पण आपमतलबी नेत्यांमुळे हा कार्यकर्ता संतापलेला आहे.

The side melted | पक्ष गारठला

पक्ष गारठला

googlenewsNext

काँग्रेसच्या पराभवाचे प्रामाणिक कार्यकर्त्याला शल्य आहे़ या पक्षाला पुन्हा उभे करण्यासाठी परिश्रमाची त्याची तयारी आहे़
पण आपमतलबी नेत्यांमुळे हा कार्यकर्ता संतापलेला आहे.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतदारांनी सपशेल नाकारल्यानंतरही काँग्रेस पक्ष यातून कुठलाही धडा घ्यायला तयार नाही़ काँग्रेससाठी पराभव नवीन नाही़ सव्वाशे वर्षांचा इतिहास लाभलेल्या या पक्षाने यापूर्वीही अनेक पराभव बघितले आणि पचवलेही आहेत़ अशा संकटांमधून पुन्हा उभ्या राहिलेल्या काँग्रेसने नंतरच्या काळात देशाला खंबीर नेतृत्वही दिले आहे़ यावेळची परिस्थिती मात्र वेगळी आहे़ काँग्रेसशी एकनिष्ठ असलेला पारंपरिक मतदार या पक्षापासून आता दुरावलेला आहे. दलित-मुस्लीम मतदार नव्या पर्यायाच्या शोधात आहे. राहुल गांधींना खूप तळमळ आहे, पण नेमके काय करावे, याच संभ्रमावस्थेत ते सतत चाचपडत असतात. दिल्लीपासून गल्लीपर्यंत काँग्रेसची ही दयनीय अवस्था या पक्षाचा कार्यकर्ता प्रथमच हताशपणे पाहात आहे.
विदर्भात तर काँग्रेस नामशेष झाली की काय, असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात खदखदत आहे़ प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याबद्दल विदर्भातील सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या असंतोषाची दखल घ्यायला पक्षनेतृत्वाला सवड नाही आणि प्रदेशाध्यक्ष नट्टा-पट्ट्यातून बाहेर पडायला तयार नाहीत़ काँग्रेस कार्यकर्त्यांच्या परवाच्या चंद्रपूरच्या सभेत एका महिला कार्यकर्त्याने माणिकरावांना सुनावलेले खडे बोल हा कार्यकर्त्यांच्या मनातील प्रातिनिधिक संताप आहे़ चंद्रपूरच्या सभेप्रमाणेच कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, या भीतीने माणिकरावांनी नंतरची यवतमाळातील सभा वेळेवर रद्द केली. कार्यकर्त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला लढण्याचे बळ देण्याचा हा काळ आहे आणि अशावेळी प्रदेशाध्यक्ष त्याला पाठ दाखवून पळ काढतात? खरे तर माणिकरावांना पदावर राहण्याचा कवडीचाही नैतिक अधिकार नाही. विधानसभा निवडणुकीत मुलाच्या तिकिटासाठी राजीनाम्याची माणिकरावांनी धमकी दिली त्याच दिवशी त्यांनी तो अधिकार गमावला होता.
देशात, राज्यात सत्ता गेल्यानंतर खचलेल्या कार्यकर्त्यांना विश्वासाने सोबत घेऊन त्यांचे मनोबल वाढविण्याची गरज आहे. पण तसे होत नाही. स्वत:च्या शिक्षण संस्था, सहकारी सोसायट्यांच्या पलीकडे विचार न करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी स्वत:च्या कुटुंबीयांव्यतिरिक्त सामान्यांचे नेतृत्व पुढे येऊ दिले नाही़
सामान्य कार्यकर्त्यांतून नवे नेतृत्व उदयास यावे यासाठी राहुल गांधींनी युवक काँग्रेसच्या निवडणुकांची नवी रचना अमलात आणली. पण शेवटी काय साध्य झाले? युवक काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून कोण निवडून आले. अकोल्याचे महेश गणगणे (माजी मंत्री सुधाकर गणगणे यांचे सुपुत्र), चंद्रपूरचे राहुल पुगलिया (माजी खासदार नरेश पुगलिया यांचे सुपुत्र), नागपूरचे कुणाल राऊत (माजी मंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र) राहुल गांधींना अपेक्षित असलेले नेतृत्व या निवडणुकीतून समोर आलेच नाही.
काँग्रेसच्या पराभवाचे प्रामाणिक कार्यकर्त्याला शल्य आहे़ या पक्षाला पुन्हा उभे करण्यासाठी परिश्रमाची त्याची तयारी आहे़ पण आपमतलबी नेत्यांमुळे हा कार्यकर्ता संतापलेला आहे. विधिमंडळ अधिवेशनात पक्षाने काढलेल्या मोर्चात त्याला जावेसे वाटले नाही, शेवटी भाड्याने माणसे आणावी लागली, त्यातही नेत्यांचा कद्रूपणा एवढा की भाड्याने कार्यकर्ते जमवतानाही त्यांनी कंजुषी केली. कशीबशी पाच हजार माणसे आलीत. वर्धा जिल्ह्यात तर या पक्षाला जिल्हाध्यक्ष नाही़ अकोला, वाशिम जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व दिसत नाही़. नागपुरात विलास मुत्तेमवारांच्या वैयक्तिक अहंकारापोटी काँग्रेसला मोठी किंमत चुकवावी लागली आहे.
संकटात सापडलेल्या काँग्रेसला विदर्भाने नेहमीच बळ दिले आहे. या पक्षाने विदर्भातील काँग्रेस नेत्यांनाही खूप काही दिले आहे. शिक्षण संस्था, पेट्रोलपंप, गॅस एजन्सी, कंत्राटदारी, बायको-मुलांना सरपंचापासून आमदारकी इत्यादी इत्यादी...पण आज पक्षाला काही देण्याची वेळ आली तेव्हा काँग्रेस नेत्यांची अवस्था समुद्रात भरकटलेल्या जहाजावरच्या उंदरांसारखी झाली आहे.
- गजानन जानभोर

Web Title: The side melted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.