राष्ट्रीय लोकशाही आघाडीची प्रकृती बिघडल्याचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 05:53 AM2018-12-26T05:53:53+5:302018-12-26T05:55:36+5:30
उद्धव ठाकरे यांचा पक्ष सत्तेत भाजपासोबत आहे. तरीही ठाकरे यांनी मोदींना उद्देशून ‘पहारेकरीच चोर आहेत’ असे म्हटले असेल, तर ती बाब राष्ट्रीय लोकशाही आघाडीची प्रकृती बिघडली असल्याचे सांगणारी आहे.
‘चौकीदार चोर आहे’ हे राहुल गांधींचे आरोपवजा विधान आता शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पंढरपुरात पुन्हा उच्चारले आहे. ते करताना त्यांनी राहुल गांधींचा उल्लेख केला नसला, तरी त्यांचा रोख आणि उद्देश स्पष्ट आहे. राहुल गांधींनी ते विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केले होते. ‘मी देशाचा चौकीदार आहे’ अशा शब्दांत मोदी स्वत:चा नम्रपणा देशाला सांगत. चौकीदार हा कोणत्याही संघटनेतला वा आस्थापनेतला अखेरचा माणूस असतो. त्यामुळे स्वत:ला चौकीदार म्हणवून घेणे ही मोदींची खरी वा खोटी विनम्रता होती. प्रत्यक्षात मोदी नम्र नाहीत आणि सौम्यही नाहीत. ते कमालीचे आक्रमक व लढाऊ वृत्तीचे पुढारी आहेत. शिवाय त्यांच्या आक्रमकपणाला हिंदुत्वाची धारही आहे. ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ हे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या आरंभी देशाला दिलेले आश्वासन आहे. प्रत्यक्षात त्यांच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात हे आश्वासन खोटे आणि मोदीही खोटे ठरले आहेत. एके काळी ज्यांच्यावर टीका करायला माध्यमे सोडा, पण विरोधी पक्षही भीत असत, तेच नंतर त्यांच्यावर जाहीरपणे व सडकून टीका करताना दिसले. विशेषत: मोदींनी देशाच्या अर्थकारणाचा आणि त्यातील बँक व्यवस्थेचा जो घोळ केला, त्यामुळे तर त्यांची प्रतिमा जनमानसातही खालावलेली साऱ्यांना दिसली. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही तीन राज्ये त्यांच्या पक्षाने ज्या लाजिरवाणीपणे गमावली, तो या खालावलेल्या प्रतिमेचा पुरावाही आहे.
बँकांना हजारो कोटी रुपयांना फसवून व सरकारातील वरिष्ठांशी संधान जुळवून किमान एक डझन बडे उद्योगपती देश सोडून पळाले. त्यात विजय मल्ल्या आहे, नीरव आणि ललित मोदी आहे, चोक्सी आहे आणि इतरही अनेक आहेत. यापैकी प्रत्येकाने देश सोडून पळण्याआधी मोदींच्या मंत्रिमंडळातील कोणत्या ना कोणत्या मंत्र्याची परवानगी घेतल्याचे आढळले आहे. मंत्र्यांशी त्यांची होत असलेली बातचीत सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात आता बंदही आहे. त्याचमुळे राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना ‘चौकीदार चोर आहे’ अशा भाषेत धारेवर धरले. मात्र, राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष आणि मोदींचे समोरासमोरचे प्रतिस्पर्धी आहेत. २०१९ची निवडणूक ही मोदी विरुद्ध राहुल अशीच होईल, असे आता सारेच समजू लागले आहेत. त्यामुळे राहुल गांधींनी मोदींना ‘चोर’ म्हणणे एक वेळ समजणारे आहे. न समजण्याजोगी गोष्ट त्यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या याच आरोपाची आहे.
ठाकरे यांची शिवसेना सरकारमध्ये भाजपासोबत आहे. मोदी हे त्यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सर्वोच्च नेतेही आहेत. अशा स्थितीत ठाकरे यांनी मोदींना उद्देशून ‘पहारेकरीच चोर आहेत’ असे म्हटले असेल, तर ती बाब राष्ट्रीय लोकशाही आघाडीची प्रकृती बिघडल्याचे सांगणारी आहे. शिवसेनेशी युतीसाठी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलेली विनंती मान्य केली वा नाही, हे अद्याप ठाकरे यांनी स्पष्ट केले नाही. दरम्यान, ते आणि त्यांच्या पक्षाचे इतर प्रवक्ते मोदी आणि भाजपा यांच्यावर टीकेची कोणतीही संधी सोडत नाहीत. त्यांचा पक्ष लहान असून आवाज मोठा, तर भाजपा हा पक्ष मोठा असूनही त्याचा आवाज छोटा व पडका असल्याचे या हाणामारीत दिसते. आता तर मोदींना ‘चोर’ म्हणून ठाकरे यांनी त्यांच्या रोषाचा कळसच देशाला दाखवून दिला. मोदी किंवा त्यांचे बोलघेवडे प्रवक्ते अद्याप त्यावर प्रतिक्रिया देताना दिसले नाहीत. कारण त्यांना येत्या निवडणुकीत सेनेला सोबत ठेवायचे आहे आणि सेनेला त्यांची ही गरज ठाऊक आहे. त्यामुळे ही बोलाचाली रस्सीखेचाच्या खेळासारखी आहे की युद्धासारखी, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, दिवसेंदिवस त्याची वाटचाल रणभूमीच्या दिशेने होत असल्याचे दिसू लागले आहे. त्यात कोण माघार घेतो आणि मैत्रीला आवश्यक नम्रता धारण करतो, हे पाहायचे आहे.
भाजपाच्या अनेक नेत्यांनी ‘आम्हाला सेनेच्या मदतीची गरज नाही, आम्ही स्वबळावर सत्ता मिळवू,’ असे खासगीत बोलून दाखविले आहे. मात्र, सत्ता आणि मुख्यमंत्रीपद ताब्यात असूनही एकटे देवेंद्र फडणवीसच मैत्रीवाचून जमणार नाही, असे बोलताना दिसतात. ते ज्या नम्रपणे बोलतात, तसे सत्तेवर नाराज असलेले ठाकरे बोलत नाहीत आणि त्यांचे प्रवक्तेही नम्रपणा धारण करीत नाहीत. त्यामुळे ही हाणामारी राजकीय लाभासाठी आहे, हे लक्षात येणारे आहे.