लोकमत संपादकीय - व्हॉट्सॲपच्या स्पर्धेत ‘सिग्नल’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 01:48 AM2021-01-16T01:48:00+5:302021-01-16T01:48:42+5:30

मॉक्सीसोबत त्याने स्पर्धक प्लॅटफॉर्म, कमाईचा हेतू न ठेवता, देणग्यांच्या बळावर, सिग्नल फाउंडेशनच्या नावाने चालविल्या जाणाऱ्या सिग्नलचा पाया घातला

'Signal' in WhatsApp competition | लोकमत संपादकीय - व्हॉट्सॲपच्या स्पर्धेत ‘सिग्नल’

लोकमत संपादकीय - व्हॉट्सॲपच्या स्पर्धेत ‘सिग्नल’

googlenewsNext

सगळ्यांच्या डिजिटल जगण्याचा एक अपरिहार्य भाग असलेल्या व्हॉट्सॲपला स्पर्धक आला आहे. तोदेखील अवघ्या आठवडाभरात छप्परफाड यश गाठीला बांधून. त्याचे नाव आहे, सिग्नल! आठवडाभरात चाळीस देशांमध्ये गुगलच्या ॲप स्टोअरवर टॉपला, अठरा देशांमध्ये गुगल प्ले स्टोअरवर पहिला क्रमांक, गेल्या सोमवारपासून अमेरिकेत या दोन्ही स्टोअरवर डाउनलोडबाबत पहिले स्थान आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत तब्बल बेचाळीसशे टक्क्यांची वाढ, ही सिग्नलची हनुमान उडी! या नव्या ॲपने खऱ्या अर्थाने न्यू ईअर धमाका उडवून दिला आहे. प्रायव्हसीचा मुद्दा सोडला तर व्हॉट्सॲपच्या हिरव्या रंगाऐवजी निळ्या रंगातला तसाच लाेगो व इतरही एकसारखेपणा असलेले सिग्नल हे काही नवेकोरे मेसेेजिंग ॲप नाही. व्हॉट्सॲप विकसित करणाऱ्या ब्रायन ॲक्टनने मॉक्सी मार्लिनस्पाइकच्या मदतीने ते २०१४ मध्येच विकसित केले होते. सहा वर्षे हे मेसेेजिंग ॲप कासवाच्या गतीने पुढे सरकत होते. सगळ्यांना माहिती आहे, की ॲक्टन हा जॅन कोमसोबत व्हॉट्सॲपचा जन्मदाता. २००९ मध्ये दोघांनी साधे, सोपे, सुटसुटीत व्हॉट्सॲप बाजारात आणले. साध्या मोबाइल नंबरच्या आधारे एकमेकांना संदेश पाठविण्याची सुविधा उपलब्ध झाली. सुरुवातीला कमाई हा दोघांचाही उद्देश नव्हता. पण, फेसबुकच्या मार्क झुकेरबर्गने व्हॉट्सॲप विकत घेतले व त्याचा व्यावसायिक विकास केला. नंतरची कथा सगळ्यांनाच माहिती आहे. त्यातूनच ॲक्टनचे मतभेद झाले व तो बाहेर पडला.

मॉक्सीसोबत त्याने स्पर्धक प्लॅटफॉर्म, कमाईचा हेतू न ठेवता, देणग्यांच्या बळावर, सिग्नल फाउंडेशनच्या नावाने चालविल्या जाणाऱ्या सिग्नलचा पाया घातला. गेल्या बुधवारी, ६ जानेवारीला  या जुन्याच मेसेजिंग ॲपचा जणू पुनर्जन्म झाला. का? कारण त्या दिवशी व्हॉट्सॲपने नवी प्रायव्हसी पॉलिसी जाहीर केली. व्हॉट्सॲपचा सगळा डाटा फेसबुक व झुकेरबर्गच्या अन्य सगळ्या प्लॅटफॉर्मवर जाईल, हे जाहीर केले. ॲप वापरणाऱ्यांना ते मान्य आहे की नाही, हे ८ फेब्रुवारीपर्यंत सांगायचे आहे. मान्य नसेल तर व्हॉट्सॲप वापरता येणार नाही. हा लोकांच्या खासगी आयुष्यावर हल्ला असल्याचा गदारोळ जगभर उडाला. लोकांनी व्हॉट्सॲप अनइन्स्टाॅल करण्याचा सपाटा चालवलाय. झुकेरबर्गच्या कंपन्यांचे शेअरही कोसळले. विशेषत: अमेरिकेत लोकांना सिग्नल ॲप आठवले. भारत हा व्हॉट्सॲपचा सर्वांत मोठा वापरकर्ता देश आहे. अमेरिकेची जितकी लोकसंख्या त्यापेक्षा अधिक म्हणजे ४० कोटींहून अधिक भारतीय व्हॉट्सॲप वापरतात. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा, उद्योजक आनंद महिंद्रा आदींनी व्हॉट्सॲपऐवजी सिग्नल किंवा टेलिग्रामला जाहीर पसंती दर्शविताच लाखो भारतीयांच्या स्मार्टफोनवर हे दोन्ही ॲप्स दिसायला लागले आहेत. कहाणी अवघ्या आठवडाभराची आहे.

सिग्नलचे स्टेबल व्हर्जन ८ जानेवारीला ॲण्ड्रॉइडवर तर १० जानेवारीला आयओएसवर आले. डेस्कटॉपवर ते जेमतेम महिनाभरापूर्वी, १७ डिसेंबरला आले होते. व्हॉट्सॲप खासगी आयुष्यात करीत असलेली घुसखोरी आणि सिग्नलचे हे नवे व्हर्जन यांची बोलाफुलाची गाठ पडली. ६ ते १० जानेवारी या पाच दिवसांत सिग्नलला तब्बल ७५ लाख डाउनलोड मिळाले तर टेलिग्रामला ९० लाख. मागच्या आठवड्याच्या तुलनेत सिग्नलची वाढ होती तब्बल ४२०० टक्के तर टेलिग्रामची ९१ टक्के. सोमवारपासून तर ही गती कैकपटींनी वाढली आहे. सिग्नलकडे अवघे ५० कर्मचारी आहेत व त्यांना गेले तीन-चार दिवस झोप घ्यायलाही उसंत मिळालेली नाही. तुमचे खासगी चॅट, व्यावसायिक गुपिते व्हॉट्सॲप पळविण्याच्या प्रयत्नात असताना सिग्नलकडे मात्र ग्राहकाचे अकाउंट, ते उघडल्याची तारीख व शेवटचे लॉगिन एवढीच माहिती राहील, असा ब्रायन ॲक्टनचा दावा आहे. हे ॲप एंड टू एंड पूर्णपणे इनक्रिप्टेड आहे. हा दावा खरा निघाला तर तर ८ फेब्रुवारीपर्यंत आणखी बरीच उलथापालथ पाहायला मिळेल. नाही म्हणायला सिग्नलच्या या घोडदौडीला बड्या कंपन्यांमधील स्पर्धेचाही पैलू आहे. एकतर ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांनी खूप आधी “सिग्नल वापरा,” असं आवाहन केलं होतं. व्हॉट्सॲपच्या वादानंतर टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनीही सिग्नलचा पुरस्कार केला. अनपेक्षितरीत्या अमेरिकन व्हीसलब्लोअर एडवर्ड स्नोडेन यानेही तीच री ओढली. थोडक्यात हे बडे टेक्नोक्रॅट मार्क झुकेरबर्गच्या स्पर्धकांना बळ तर देत नाहीत ना किंवा मार्लिनस्पाइकच्या व्हिस्पर कंपनीत ट्विटरची गुंतवणूक तर नाही ना, अशी शंका आता अनेकांना येते आहे.

Web Title: 'Signal' in WhatsApp competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.