साधी राहणी... उसवलेल्या कॉलरचा शर्ट घालणारा संरक्षणमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 09:24 PM2019-01-29T21:24:10+5:302019-01-29T21:24:52+5:30
आम्ही कार्यकर्ते समता आंदोलन संघटनेत काम करत होतो. याच काळात व्ही. पी. सिंग सरकारने मंडल आयोग लागू केला.
मनोहर आहिरे
नाशिक - ज्येष्ठ समाजवादी नेते साथी जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाची बातमी ऐकली आणि नकळत त्यांच्या फोटोकडे नजर गेली. काही आठवणी ताज्या झाल्या. राजकारणात अतिशय वरच्या स्तरावर काम करत असताना साधी राहणी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी जोडलेली नाळ हे जॉर्ज साहेबांच्या काही प्रसंगांनी अधिक घट्ट केली.
आम्ही कार्यकर्ते समता आंदोलन संघटनेत काम करत होतो. याच काळात व्ही. पी. सिंग सरकारने मंडल आयोग लागू केला. मंडलच्या शिफारशी आम जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही एक पथनाट्य बसविले होते. जॉर्ज यांची नेहरू गार्डनसमोर सभा होती. ते येईपर्यंत आम्ही पथनाट्य सादर करत होतो. पथनाट्य अर्धे झाले होते आणि जॉर्ज व्यासपीठावर आले. आम्ही सादरीकरण थांबविले. जॉर्ज यांनी विचारले आणि समोरचे चार-पाच माइक स्टेजवरून खाली दिले आणि पथनाट्य सुरू करायला सांगितले. संपूर्ण पथनाट्य पाहिले.
एकदा स्व. बापू उपाध्ये यांच्या महात्मा गांधी रोडवरील घरी रात्री उशिरा जॉर्ज पोहोचले. सारे झोपलेले होते. हॉलमध्येही काही कार्यकर्ते झोपलेले होते. बापूंच्या घरी दारातच गाद्यांचा ढीग असायचा. जॉर्ज त्यावरच बेडशीट पांघरूण घेऊन झोपले. सकाळी बापू उठले, पाहिले आणि चादर ओढून म्हणाले, ‘ऊठ रे कोण तू?’ पण जॉर्जना पाहून हसतच म्हणाले, ‘अरे जॉर्ज तू? झोप झोप !’
साथी जॉर्ज फर्नांडिस भारताचे संरक्षणमंत्री होते. ओझरला सुखोई विमानाची पाहणी करायला आले होते. माजी आमदार आणि निकटचे स्नेही स्व. बापू उपाध्ये यांच्या निधनानिमित्त त्यांच्या परिवाराची भेट घेण्यासाठी गंगापूररोडला आले होते. कार्यकर्त्यांच्या वतीने मी एक फोटोसाठी जॉर्ज यांना विनंती केली. पटकन हो म्हटले. हा फोटो काढताना मी एकेकाला शेजारी बसून फोटो काढायला सांगितलं आणि मी त्यांच्या खुर्चीच्या मागे उभा राहिलो. एका फोटोच्या वेळी माझं लक्ष जॉर्ज साहेबांच्या कुर्त्याच्या कॉलरकडे गेलं. भारताच्या संरक्षणमंत्र्यांची कॉलर पाच-सहा इंच फाटलेली होती, जी हात शिलाईने शिवलेली होती. याचवेळी जॉर्ज आल्या आल्या स्व. कमलताई उपाध्येंनी घाईघाईने जॉर्जना किचनमध्ये नेले आणि ताट वाढले. जॉर्ज जेवायला सुरुवात करणार तोच सोबतच्या सिक्युरिटी आॅफिसरने ताट बाजूला घेतले.
कमलताई आवंढा गिळीत म्हणाल्या... ‘जॉर्ज काय आहे हे. हे तुझं घर आहे.’ खजिलपणे जॉर्ज म्हणाले ... ‘त्यांना त्यांचे काम करू दे. संरक्षणमंत्री आहे मी.’ एक साधेपणा अंगी भिनलेला हा कार्यकर्ता नेता होता. जॉर्ज यांच्या निधनामुळे आम्ही कार्यकर्त्यांचा प्रेरणास्रोत गेला आहे.