सोपी गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2017 11:57 PM2017-03-02T23:57:48+5:302017-03-02T23:57:48+5:30

जीवना तू एवढा कठीण का, असा प्रश्न कुणीतरी एकदा सरळ जीवनालाच विचारला.

Simple thing | सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

Next


जीवना तू एवढा कठीण का, असा प्रश्न कुणीतरी एकदा सरळ जीवनालाच विचारला. तेव्हा जीवनाने उत्तर दिले की, मी कठीण नाही, उलट तुम्हीच सोप्या गोष्टींचे महत्त्व ओळखत नाही म्हणून तुम्हाला जगणे कठीण वाटते. किती सुंदर उत्तर आहे ! खुद्द जीवन म्हणत आहे की ते सोपे आहे आणि आपण मात्र त्याला कठीण म्हणत आहोत. कन्फ्युशिअस हा ताओवादाचा समर्थक. त्याचे एक वचन वेदवाक्याच्या तोडीचे आहे. त्याने म्हटले आहे की, लाईफ इज व्हेरी सिम्पल, वुई मेक इट कॉम्प्लिकेटेड. जीवन ही एक सोपी गोष्ट आहे; पण आपणच ती गुंतागुंतीची करून टाकतो. माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रांत आश्चर्यकारक असे शोध लावून त्याने जगणे सुखमय आणि गतिमान करून टाकले आहे. पण सुखाच्या या शोधप्रक्रि येत त्याने बराच गोंधळही घालून ठेवला आहे. मतिव्यय आणि चंगळ, गरज आणि हाव, पैसा आणि प्रसन्नता, ज्ञान आणि जाण, धर्म आणि राजकारण, प्रगती आणि प्रज्ञा यातील फरक समजून घेताना त्याने बरीच गल्लत करून ठेवली. या शोधात त्याने जगणे अधिक गुंतागुंतीचे आणि अवघड करून टाकले आहे. अणूचा शोध आइनस्टाइनने शांततेसाठी लावला; पण हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब पडून लाखो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, तेव्हा डोक्याला हात लावून बसण्याची वेळ त्याच्यावर आली. त्याला जायचे होते देवाच्या आळंदीला; पण अनुयायांनी त्याला पोहोचवले चोराच्या आळंदीला. आज सर्वसामान्य माणसाची अशीच परवड सुरू आहे, त्याला जायचे असते देवाच्या आळंदीला; पण कावेबाज लोकांनी परिस्थिती इतकी गोंधळाची करून ठेवली आहे की त्याला पोहोचावे लागते चोराच्या आळंदीला ! निसर्गात गुंतागुंत नावाची गोष्ट अस्तित्वात नाही. सूर्य सहज उगवतो आणि प्रकाश देतो, फुलं सहज फुलतात आणि सुगंध देतात, चांदणे सहज पडते आणि आनंद देते. विविध ऋतूंचे सोहळे वर्षभर सहजपणे आणि ठरलेल्या वेळी होत असतात. देव पुन्हा पुन्हा जन्म घेतो असे गीतेत म्हटले आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, हे तुकारामाचे वचनही प्रसिद्ध आहे. प्रभु येशूने तर मृत्यूनंतर लगेच पुनर्जन्मच घेतला. जगणे जर अवघड असते, गुंतागुंतीचे असते तर एवढ्या मोठ्या धर्मसंस्थापकांनी आणि साधुसंतांनी जगण्याची संधी पुन्हा पुन्हा मिळावी असे का म्हटले असते? तात्पर्य हे की, जगणे अवघड करून ठेवण्यात माणसाचा कोणी हात धरू शकत नाही. यावर काही उपाय नाही काय? तर नक्कीच आहे. जो माणूस सोप्या गोष्टी अवघड करून ठेवतो तोच माणूस अवघड गोष्टी सोप्याही करू शकतो.
-प्रल्हाद जाधव

Web Title: Simple thing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.