गणपतरावांचा साधेपणा अन् एसटीची प्रतिष्ठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 11:47 PM2017-12-28T23:47:07+5:302017-12-28T23:47:14+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये अपंग, महिला, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, आमदार-खासदार अशी राखीव आसने असतात.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये अपंग, महिला, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, आमदार-खासदार अशी राखीव आसने असतात. आमदार, खासदार अन् एसटीने प्रवास ही बाब शक्यच नसल्याचे गृहीत धरले जाते. आरक्षित जागेवर अगोदरच ताबा मिळवून बसणाºयांना कधीतरी आमदारही एसटीने प्रवास करतात, हे सांगोल्याचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी दाखवून दिले आहे. प्रवाशांनी आरक्षित जागा त्या त्या व्यक्तीसाठी उपलब्ध करून द्याव्यात एवढे सौजन्य दाखवले तरी बस्स झाले.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवास करताना गरीब-श्रीमंत, जात-धर्म, स्त्री-पुरुष किंवा लहान-थोर असा कसलाही भेदभाव न करता सर्वांना सन्मानाने वागणूक दिली जाते. तरीही काही जागा राखीव ठेवलेल्या असतात. त्यामध्ये अपंग, महिला, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक अशांसाठी महामंडळाची विशेष सहानुभूती आहे. त्यांच्यासाठी आसन आरक्षित ठेवले आहेत. याचबरोबर एक जागा खासदार आणि एक जागा आमदार यांच्यासाठी राखीव ठेवलेली असते.
पण विशेष आरक्षणाचा नियम पाळला जात नाही किंवा प्रवाशांकडूनही त्या नियमाचा सन्मान केला जात नाही. कित्येकदा अपंग किंवा महिला उभे राहून प्रवास करतात, पण त्यांच्यासाठी राखीव जागा असलेल्या आसनावर बसलेली व्यक्ती उठून जागा देण्याचे सौजन्य दाखवत नाही. खासदार, आमदार तर कधी एसटीकडे फिरकतच नसल्याने ती जागा रिकामी ठेवण्याची गरजच नाही, हीच सवय अंगवळणी पडली आहे. याला अपवाद फक्त सांगोल्याचे ज्येष्ठ आमदार भाई गणपतराव देशमुख यांचा असेल. नागपूर अधिवेशनासाठी गेलेले गणपतराव देशमुख यांनी विधिमंडळात जाण्यासाठी चक्क एसटीचा वापर केला. ११ वेळा आमदार झालेले अन् ९१ वर्षे वय झालेले गणपतराव साधेपणासाठी अािण तळागाळातल्या लोकांबरोबर रमणारे जमिनीवरचे नेते म्हणून ख्यात आहेत. गल्लीतला कोणत्याही पक्षाचा गटनेता असला तरी तो कुठूनही चारचाकी मिळवून मोठ्या थाटात वावरतो. पण गणपतरावांनी आपल्या साधेपणामध्ये कधी बदल केला नाही. नागपूरच नव्हे तर यापूर्वीही गणपतरावांनी कित्येकवेळा एसटीने प्रवास केला आहे.
विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी येणारे सगळे आमदार हे आलिशान गाड्यांमधून येतात. त्यांना राहण्यासाठी आमदार निवास असताना आलिशान हॉटेलमध्ये राहतात.
एसटीने जाणे किंवा आमदार निवासात राहणे यांना कमीपणाचे वाटते. आता राज्य परिवहन महामंडळाने शिवशाही या आलिशान बस आणल्या आहेत. त्यातही आमदारासाठी राखीव जागा ठेवली तरी त्यात बसतील की नाही शंकाच आहे. गणपतरावांनी आपल्या वर्तणुकीतून आपला साधेपणा तर दाखवलाच आहे, पण आपण यंत्रणा आणि इथल्या मातीचा एसटीचा कसा सन्मान करतो हेच दाखवले आहे.
कदाचित एसटीने जाणारे हे शेवटचे आमदार असतील, असेच वाटते. आमदार देशमुख यांच्या एसटी प्रवासाने एसटीची प्रतिष्ठा वाढली आहे. एसटीमध्ये राखीव असलेल्या जागांचाही सन्मान केलाच पाहिजे. राखीव असलेल्या जागेवर त्या त्या प्रवाशाला बसण्यासाठी सौजन्य दाखवणे, महिलांचा आदर करणे हे शिकले पाहिजे, हाच संदेश गणपतराव देशमुख यांनी दिला आहे.