गुरूंना अभिमान वाटावा असा गायक - पं. प्रभाकर कारेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 05:13 AM2019-07-13T05:13:59+5:302019-07-13T05:14:28+5:30
ख्यातनाम शास्त्रीय संगीत कलाकार पंडित प्रभाकर कारेकर यांनी ४ जुलै २0१९ रोजी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली.
ख्यातनाम शास्त्रीय संगीत कलाकार पंडित प्रभाकर कारेकर यांनी ४ जुलै २0१९ रोजी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. आज त्यांचा अमृत महोत्सव सोहळा मुंबईत पार पडत आहे. पं. प्रभाकर कारेकर हे एक कलासक्त व्यक्तिमत्त्व. आपल्या कलेसाठी मेहनत घेत त्यांनी रसिकांना खूप आनंद दिला आहे. त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या आवाजाची ताशीर. जी ताशीर पंडित सुरेश हळदणकर बुवांची होती तीच ताशीर प्रभाकर कारेकरांची आहे. पंडित कारेकरांची ठुमरीवर चांगलीच पकड होती. त्यामुळे प्रेक्षक मोहित होत. रसिकांना त्यांची सर्वच गाणी हवीहवीशी वाटायची. त्यांचे गायन अत्यंत सुरेल आणि मोहित करणारे होते.
मी त्यांच्यासोबत अनेक वर्षे वाद्ये वाजवली आहेत. ते माझे अत्यंत जवळचे मित्र. आमची पहिली भेट ही मुंबईत झाली आणि पुढे हा स्नेह कित्येक वर्षे वृद्धिंगत होत गेला. त्यांना मी फार काळ जवळून पाहिले आहे. अत्यंत प्रेमळ स्वभावाचे कलाकार म्हणून सहकलाकारांमध्ये त्यांची प्रतिमा आहे आणि त्याचमुळे प्रत्येकाला ते हवेहवेसे वाटतात.
पंडित प्रभाकर कारेकर हे कष्टातून घडलेले कलाकार आहेत, असे त्यांच्या बाबतीत आवर्जून म्हणता येईल. कलेवर आणि गुरूंवर त्यांनी मनापासून श्रद्धा ठेवली, प्रेम केलं. खूप मेहनत करून विद्या संपादन केली आणि त्याचा आनंद प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. शास्त्रीय, नाट्य, अभंग या तिन्ही प्रकारांत ते पारंगत आहेत. ते सुरेश हळदणकरांकडे शिकले. त्यानंतर ते अभिषेकी बुवांकडे शिकत असताना त्यांचे आणि माझे जवळून संबंध आले. मग व्यास बुवांकडेदेखील ते शिकायला जात असत. तेव्हाही आमचे संबंध आले. गुरूंनादेखील अभिमान वाटावा असा हा कलाकार आहे. पण त्याचवेळी पंडित हळदणकर, पंडित अभिषेकी, पंडित व्यास असे गुरू त्यांना लाभले हे त्यांचेही मोठेच भाग्य आहे. हळदणकर बुवांकडून त्यांनी आवाजाची शैली घेतली, तर व्यास बुवांकडून विद्या घेतली आणि मग ती विद्या कशाप्रकारे वापरली पाहिजे याचे विचारतंत्र त्यांनी जितेंद्र अभिषेकी बुवांकडून आत्मसात केले, असे मला ठामपणे वाटते.
पंडित प्रभाकर कारेकरांबरोबर अनेक मैफिलीत सामील झालो आहे. त्यांना साथ केली आहे. पण मला अशी एकही मैफील आठवत नाही जी फसली असेल. ते प्रत्येक मैफिलीत जमवून गायचे. आपले गाणे उत्तमरीतीने सादर व्हावे यासाठी ते खूप मनापासून मेहनत घ्यायचे. ते आपले संपूर्ण लक्ष केंद्रित करून गायचे. त्यांच्यातील हे गुण मी अगदी जवळून पाहिले आहेत. मी त्यांच्यात नेहमी कामाच्या बाबतीत प्रामाणिकपणा पाहिला आहे आणि कलाकार म्हणून कलेप्रति असलेली ही आत्मीयता मी कधीच विसरू शकणार नाही.
पंडित प्रभाकर कारेकर यांची अनेक नाट्यपदे गाजली. त्यांचे प्रिये पाहा हे नाट्यगीत प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. ते ऐकल्याशिवाय प्रेक्षक त्यांना मैफील संपवूच देत नसत. हे गाणे त्यांनी सवाई गंधर्वमध्ये गायले होते. तेथून त्यांची ख्याती सर्वदूर पसरली. या गाण्याने त्यांना खूप प्रसिद्धी आणि नावलौकिक मिळवून दिला. प्रत्येक कलाकाराच्या नशिबी अशी प्रसिद्धी, नावलौकिक असतो, पण त्यामागे त्या कलाकाराने घेतलेले कष्ट असतात आणि तेच बोलत असतात. त्यातूनच खरी प्रसिद्धी, नाव त्याला मिळत असते. एखाद्या गाण्यामुळे कलाकार प्रसिद्ध पावला किंवा मोठा झाला, हे एक निमित्त असते. खरे तर त्यामागे त्याची फार मोठी तपश्चर्या असते. पंडित प्रभाकर कारेकर यांचीही तपश्चर्या फार मोठी होती.
पंडित प्रभाकर कारेकर हे गोव्यातील कवळे येथे शांतादुर्गाच्या मंदिराजवळ एका शास्त्रीय संगीत कार्यक्रमाचे आयोजन करायचे. तिथे अनेक बाहेरच्या आणि गाजलेल्या कलाकारांनाही ते बोलावत असत. मी अनेकदा या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. त्या माध्यमातून त्यांनी खूप लोकांना आपलेसे करून घेतले. ते आपल्या सर्व गुरूंना आदरांजली म्हणून स्वरांजली नावाचा कार्यक्रम करतात. त्यात अनेक नवीन कलाकारांना कला दाखवण्याची संधी देतात. ते स्वत: एक मोठे कलाकार असूनही प्रत्येक कलाकाराला ते योग्य तो मान देतात. त्यामुळे त्यांचे इतर कलाकारांबरोबर नेहमीच स्नेहाचे आणि प्रेमाचे संबंध राहिले आहेत. त्यांनी अनेक कलाकारांना ‘स्वरांजली’ कार्यक्रमाला बोलावले आहे. उल्हास कशाळकर हे त्यांच्यापेक्षा खूप लहान आहेत. त्यांना खूप वेळा पंडित कारेकरांनी गाण्याची संधी दिली. अशा अनेक गोष्टी त्यांच्याशी जोडल्या गेल्या आहेत आणि त्याचमुळे पंडित प्रभाकर कारेकरांकडे बघण्याचा दृष्टिकोन नेहमीच आदराचा राहिला आहे.
-पं. सुरेश तळवलकर। ज्येष्ठ संगीतकार