एकल महिला, पुरुषांसाठी ‘सरोगसी’ वरदान..!

By admin | Published: July 3, 2016 02:56 AM2016-07-03T02:56:59+5:302016-07-03T02:56:59+5:30

लग्न झाल्यावर एका वर्षाच्या आतच कुटुंबीयांकडून नव दाम्पत्याला ‘आता पाळणा हलू दे’ असे सल्ले मिळायला सुरुवात होते. अनेकदा पुरुष अथवा स्त्रीमध्ये वंध्यत्व असेल तर काय

Single woman, 'Sarogasi' boon for men ..! | एकल महिला, पुरुषांसाठी ‘सरोगसी’ वरदान..!

एकल महिला, पुरुषांसाठी ‘सरोगसी’ वरदान..!

Next

लग्न झाल्यावर एका वर्षाच्या आतच कुटुंबीयांकडून नव दाम्पत्याला ‘आता पाळणा हलू दे’ असे सल्ले मिळायला सुरुवात होते. अनेकदा पुरुष अथवा स्त्रीमध्ये वंध्यत्व असेल तर काय करायचे, असा यक्षप्रश्न समोर असतो. ‘इन विट्रो फर्टिलायझेशन’ (आयव्हीएफ) पद्धतीचा उपयोग करून संततीप्राप्ती होणे शक्य आहे. मात्र, एकट्या महिला अथवा पुरुषांचा विचार करता सरोगसीद्वारे मातृत्व आणि पितृत्व हे आधुनिक युगात वरदान आहे. तुषार कपूरला सरोगसीच्या माध्यमातून पुत्ररत्न झाल्यानंतर हा विषय पुन्हा चर्चेत आला. त्यानिमित्ताने ‘लोकमत कॉफीटेबल’अंतर्गत जसलोक रुग्णालयाच्या आयव्हीएफ सेंटर प्रमुख वंध्यत्वतज्ज्ञ डॉ. फिरूझा पारिख यांच्याशी साधलेला हा खास संवाद...

सरोगसी आणि ‘टेस्टट्यूब
बेबी’मधील फरक काय?
‘इन विट्रो फर्टिलायझेशन’ (आयव्हीएफ) ही एक उपचार पद्धती आहे. त्यात सरोगसी आणि टेस्टट्यूब बेबी हे दोन वेगळे प्रकार आहेत. काही महिलांचे गर्भाशय नाजूक असते अथवा अन्य काही शारीरिक व्याधींमुळे त्यांच्या गर्भाशयात गर्भधारणा होत नाही. अथवा अधिक काळ गर्भ टिकत नाही. अशा महिलांसाठी आयव्हीएफ उपचार पद्धतीचा उपयोग होतो. ज्या महिलांना काही शारीरिक कारणांमुळे गर्भधारणा होत नसते अशा महिलांसाठी असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नोलॉजी (एआरटी) अथवा सरोगसीचा पर्याय उपलब्ध असतो. एआरटी हे वैज्ञानिक नाव असून सामान्य भाषेत यालाच ‘टेस्टट्यूब बेबी’ असे म्हणतात. टेस्टट्यूबमध्ये शुक्राणू आणि बीजांड ट्यूबमध्ये सायंटिफिक प्रक्रियेने एकत्र केली जातात. त्यातून तयार होणारे भ्रूण हे टेस्टट्यूब बेबीवेळी त्या महिलेच्या गर्भाशयात सोडले जाते. पण सरोगसी प्रकारात भ्रूणाची वाढ संबंधित महिलेच्या गर्भाशयात होते.

कोणत्या परिस्थितीत
सरोगसी पर्यायाची निवड केली जाते?
शारीरिक व्याधी असलेल्या आणि त्यामुळे गर्भधारणा होण्यास अडचणी असलेली दाम्पत्ये मूल होण्यासाठी सरोगसीचा पर्याय निवडतात. काही महिलांचे गर्भाशय नाजूक आणि पातळ असते. अशा महिलांच्या गर्भाशयात भू्रणाची वाढ होऊ शकत नाही. गर्भाशय पातळ असल्याने अनेकदा गर्भपात होतो. त्या वेळी महिलांच्या आरोग्याचा विचार करता गर्भधारणा होणे, त्यांच्या जिवाला धोकादायक ठरू शकते. काही महिलांना उच्च रक्तदाब असतो, मधुमेह असतो तर काहींना गर्भाशयाचा क्षयरोग होतो. अशा वेळी त्या महिलेच्या गर्भाशयात गर्भाची वाढ धोकादायक ठरते. अशा महिलांना सरोगसीचा पर्याय सुचवला जातो. एकट्या राहणाऱ्या पुरुषांना मूल हवे असल्यास त्यांना सरोगसीचा पर्याय उपलब्ध असतो. कारण, पुरुष मूल स्वत:च्या उदरात वाढवणे नैसर्गिकरीत्या शक्य नसते. त्यामुळे एकट्या पुरुषांसाठीही हा पर्याय उपलब्ध आहे.

देशात वंध्यत्वाचे प्रमाण किती आहे?
महिला आणि पुरुषांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण सुमारे ३० ते ४० टक्के इतके आहे. तर दोघांमध्येही वंध्यत्व असण्याचे प्रमाण सुमारे २० टक्के आहे. त्यामुळे एकामध्ये वंध्यत्व असण्याचे प्रमाण थोडे जास्त आहे, तर दोघांमध्ये वंध्यत्व असण्याचे प्रमाण कमी आहे.

एकल पालकत्व स्वीकारणाऱ्यांसाठी
सरोगसीचा पर्याय योग्य का?
समाजात एकल पालकत्व स्वीकारून सक्षमपणे आपल्या पाल्याला वाढविणारी अनेक उदाहरणे आहेत. काही वेळा पतीच्या मृत्यूनंतर आई मुलांना वाढवते किंवा त्याउलट झाल्यास बाबा मुलांना सांभाळतात. घटस्फोट झाल्यावरही एकल पालकत्व सक्षमपणे स्वीकारता दिसते. त्यामुळे एकल पालकत्व स्वीकारणाऱ्यांसाठी सरोगसी हा चुकीचा पर्याय आहे, या म्हणण्यात काहीही तथ्य नाही. एकट्या महिला अथवा पुरुषाने सरोगसीचा पर्याय निवडू नये, असे कायद्यात कुठेही स्पष्ट केलेले नाही. प्रत्येकाला मूल असण्याचा अधिकार आहे. एकटे असणाऱ्यांना मूल दत्तक घेण्याचाही पर्याय आहे. त्यामुळे एकट्या महिला अथवा पुरुषांसाठी सरोगसीचा योग्य पर्याय ठरतो. एकट्या राहणाऱ्या महिलांना मूल हवे असते. त्या वेळी सामाजिक बंधनांचा विचार करून या महिला सरोगसीचा पर्याय निवडतात. पण आता काही एकट्या महिला स्वत:च्या उदरात गर्भ वाढविण्यास पसंती देत आहेत. कायद्यानुसार एकट्या महिला -पुरुषांना सरोगसी मान्य आहे. त्यामुळे यात बेकायदेशीर काहीही नाही.

सरोगसीविषयीच्या
गैरसमजांबाबत काय सांगाल?
आपल्याकडे सरोगसीवर बंदी आहे, हा एक मोठा गैरसमज आहे. कायद्यानुसार सरोगसीला आपल्याकडे परवानगी आहे. परदेशी नागरिकांसाठी भारतात येऊन सरोगसीचा पर्याय निवडणे आपल्याकडे बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे. परदेशी नागरिकांसाठी सरोगसी केल्यास ते बेकायदा ठरते. पण आपल्या देशातील व्यक्तींसाठी सरोगसीचा पर्याय उपलब्ध आहे.

गुजरातमधील काही गावे
सरोगसीसाठी ओळखली जातात,
त्याविषयी आपल्याला काय वाटते?
गुजरातमधील एका गावाविषयी खूप उलटसुलट चर्चा झाल्या. पण वास्तव तिथे कोणी जाऊन पाहिले का? अनेकांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारांमुळे ‘सरोगेट मदर’ची छळवणूक होते. प्रत्यक्षात असे काहीही होत नाही, असा माझा अनुभव आहे. तिथे डॉक्टरांनी एक उत्तम व्यवस्था निर्माण केली आहे. ते गाव सरोगसीसाठी प्रसिद्ध झाल्यामुळे तिथे पैसा आला. तिथल्या प्रत्येकाच्या धंद्यात वाढ झाली आहे. सरोगसीमध्ये सर्वांत महत्त्वाचा दुवा असतो, तो म्हणजे डॉक्टर. गुजरातमधील त्या गावांमध्ये डॉक्टर्सचा दर्जा चांगला असल्याने कोणतीही अडचण तेथे नाही.

देशातील आयव्हीएफ
सेंटरविषयी काय सांगाल?
देशात सुमारे हजाराहून अधिक आयव्हीएफ सेंटर आहेत. इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) सर्व आयव्हीएफ सेंटर समान नियमांनुसार चालावीत, समान सेवा मिळावी यासाठी सर्वांकडे फॉर्म पाठविले होते. ज्या सेंटरनी फॉर्ममध्ये असलेली माहिती पुरविली त्यांना ‘आयसीएमआर’कडून नोंदणी क्रमांक देण्यात आला आहे. पण अशा केंद्रांची संख्या आजच्या घडीला फक्त २३० ते २५० इतकीच आहे. अन्य केंद्रांनी ही माहिती का पुरवली नाही, याची काहीच कल्पना नाही. सर्व ठिकाणी समानता येणे अत्यंत आवश्यक आहे. सुसूत्रता येण्यासाठी सर्वांनी माहिती देणे गरजेचे ठरते.

पीसीपीएनडीटी कायदा
किती उपयोगी ठरतो?
प्री-कन्सेप्शन अ‍ॅण्ड प्री-नॅटल डायग्नोस्टिक टेक्निक्स कायदा (पीसीपीएनडीटी) चांगला आहे. पण त्याचा अर्थ आपापल्या सोयीने लावला जातो. समाजात मुलींची कमी होणारी संख्या टाळण्यासाठी हा कायदा प्रभावी ठरू शकतो. सध्या पंजाब, राजस्थानमध्ये मुलींचा जन्मदर अत्यंत कमी आहे. तेथे मुलींची संख्या खूपच कमी झाली आहे. तशी परिस्थिती आपल्या राज्यात निर्माण होता कामा नये. त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी योग्य व्हावी.

सरोगसीसाठीचा खर्च कमी
होण्याची किती शक्यता आहे?
सध्याच्या खर्चापेक्षा ५० टक्क्यांनी खर्च कमी होऊ शकतो. सध्या सरोगसीसाठी वापरण्यात येणारी इंजेक्शन, हार्मोन्स हे परदेशातून आणली जातात. त्यामुळे त्यावर एक्सपोर्ट ड्यूटी लागते. यातील अनेक साधने एकदाच वापरून टाकून द्यावी लागतात. भारतात कॅथॅडर, ट्यूब, पेट्रीडिशेस चांगल्या प्रतीच्या बनण्यास सुरुवात झाल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल. भविष्यात भारतीय कंपन्यांनी या साधनांची निर्मिती केल्यास येणारा खर्च कमी होऊ शकतो.

आयव्हीएफमध्ये अ‍ॅडव्हान्स
टेक्नोलॉजीचा वापर आपल्याकडे
किती प्रभावीपणे होतो?
होय, नक्कीच. परदेशात वापरण्यात येणारी टेक्नोलॉजी आपल्याकडेही वापरण्यात येते. सध्या आयव्हीएफ ट्यूब, फेलोपियन, पेट्रीडिश या सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरल्या जातात. त्यामुळे आता यशस्वी होण्याचा टक्का वाढलेला आहे. सुरुवातीच्या काळात सरोगसी यशस्वी होण्याचा टक्का २ ते ५ टक्के इतका होता. पण आता यशाचा टक्का वाढलेला आहे.

कोणत्या महिला ‘सरोगेट
मदर’ होऊ शकतात?
सरोगेट मदर म्हणून निवड
करताना ती महिला विवाहित असावी आणि तिला स्वत:चे एक मूल असावे हे प्राथमिक निकष पाहिले जातात. सरोगेट मदरची आरोग्य तपासणी केली जाते. त्यानंतरच त्या महिलेची सरोगेट मदर म्हणून निवड केली जाते.
सरोगेट मदरच्या गर्भाशयात भ्रूण प्रत्यारोपित करण्याआधी तीन महिने तिला आहार, व्यायाम दिला जातो. तीन महिन्यांत तिला गर्भधारणेसाठी सक्षम करण्यात येते. त्यानंतर गर्भधारणा झाल्यावरही तिची संपूर्ण काळजी घेतली जाते. हा खर्च ज्या दाम्पत्याला मूल हवे असते ते दाम्पत्य करते.
स्वत:चे मूल असलेल्या महिलेचीच सरोगेट मदर म्हणून निवड करण्यास प्राधान्य दिले जाते. महिलेच्या शारीरिक क्षमता लक्षात घेता तीनपेक्षा अधिक गर्भधारणा होणे तिच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले नसते. त्यामुळे एक मूल असलेली महिला दोन वेळा तर दोन मुले असणारी महिला एकदाच सरोगेट मदर होऊ शकते.

सरोगसी स्वीकारणाऱ्या दाम्पत्याने
कोणत्या प्रमुख बाबी पाहाव्यात?
आयव्हीएफ सेंटर लिहिलेले असणे फक्त पुरेसे नाही. लोकांमध्ये जागृतीची आवश्यकता आहे. हे केंद्र नोंदणीकृत आहे की नाही? हे पहिल्यांदा पाहावे. त्याचबरोबर आयव्हीएफ करणाऱ्या डॉक्टरांचा अनुभव तपासणे आवश्यक आहे. कारण आयव्हीएफसाठी ज्ञान आणि अनुभव दोन्हींची आवश्यकता आहे. आयव्हीएफ करण्यासाठी विशेष अभ्यास अथवा फेलोशिप डॉक्टरांनी केली असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या केंद्राच्या यशाची टक्केवारी, कोणत्या प्रकारच्या केसेस हाताळल्या आहेत, तेथे कोणत्या प्रकारचे इनक्युबेटर, मायक्रोस्कोप वापरले जातात. सेट कसा आहे, या सर्व गोष्टी पडताळून पाहणे अत्यंत आवश्यक आहे.

सरोगसीत समान
गुणवत्ता कशी आणता येईल?
देशभरात सरोगसीची समान गुणवत्ता साधण्यासाठी कायदा होणे गरजेचे ठरते. ‘नॅशनल एआरटी बिल’वर सध्या काम सुरू आहे. हा कायदा अस्तित्वात आल्यास सरोगसीतील गुणवत्ता साधणे सोपे होणार आहे. यातील कायदेशीर बाबींचे पालन केल्यावर कोणत्याही गोष्टींचा नाहक त्रास सहन करावा लागणार नाही.

(मुलाखत - पूजा दामले)

Web Title: Single woman, 'Sarogasi' boon for men ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.