फडतूस नौटंकी करणाऱ्यांना परग्रहावर पाठवून द्यावे का?

By संदीप प्रधान | Published: May 18, 2022 07:55 AM2022-05-18T07:55:31+5:302022-05-18T07:56:29+5:30

‘मला शिव्या द्या; पण माझ्याबद्दलच बोला’, असा हट्ट धरणाऱ्यांनी वात आणलाय! नसत्या मुद्द्यांभोवती चर्चा फिरत राहिली, की सरकारच्या पथ्यावरच पडते!

situation in maharashtra and should gamblers be sent to the planet | फडतूस नौटंकी करणाऱ्यांना परग्रहावर पाठवून द्यावे का?

फडतूस नौटंकी करणाऱ्यांना परग्रहावर पाठवून द्यावे का?

googlenewsNext

- संदीप प्रधान

महाराष्ट्राच्याराजकारणातील सर्वपक्षीय किमान १७ ते २० नेत्यांची, प्रवक्त्यांची यादी तयार केली आहे... त्यांना समजा, महिनाभर परग्रहावर पाठवून दिले जेथून त्यांना कुठल्याही उपकरणाच्याद्वारे माध्यमांशी संपर्क साधता येणार नाही तर सध्याचा कमअस्सल प्रश्नांवरून सुरू असलेला गलका निश्चित कमी होईल. भोंगे, हनुमान चालिसा, हिजाब, पाथरवट कविता, ताजमहालचे बंद दरवाजे,  या व अशा अनेक फुटकळ मुद्द्यांवरून सध्या वाक्युद्ध खेळले जात आहे. देशासमोर व महाराष्ट्रासमोर वेगवेगळ्या जटिल प्रश्नांची मालिका आहे. अन्नधान्य, भाजीपाल्याची महागाई गगनाला भिडली आहे. इंधनांच्या दराने सर्वसामान्य माणसाला जेरीस आणले आहे. महाराष्ट्रात दीर्घ काळानंतर पुन्हा लोडशेडिंगचे चटके बसू लागले आहेत. कोरोनानंतर निर्माण झालेली बेरोजगारी अजून दूर झालेली नाही. लोडशेडिंगला राज्य सरकार जबाबदार असल्याचा दावा राज्यातील विरोधी पक्षाचे नेते करतात, तर राज्यातील सत्ताधारी हे केंद्र सरकारचे पाप असल्याचे सांगतात. दोघेही आपापल्या परीने अर्धसत्य सांगत असतात. 

आपणही आता हळूहळू संपूर्ण सत्य जाणून घेण्याची सवय सोडली आहे. कोरोनामुळे अनेक उद्योगधंद्यांची गणिते बदलली तशी ती इलेक्ट्रॉनिक माध्यमांचीही बदलली. बातम्या देणाऱ्या वाहिन्यांना जाहिरातीच्या उत्पन्नाकरिता स्पर्धा करावी लागते ती भपकेबाज, सासू-सुनांच्या कुटिल डावांनी भरलेल्या सिरियल्स दाखवणाऱ्या वाहिन्यांशी. यापूर्वी बऱ्याच वाहिन्या बातमीमागची बातमी, बातम्यांचे कंगोरे उलगडून दाखवणाऱ्या चर्चांवर भर देत. कोरोना काळापासून बहुतांश वाहिन्यांनी केवळ घटना दाखवणे (हॅपनिंग) याला प्राधान्य दिले आहे. एखादा नेता आज भाषण देणार आहे तर सकाळपासून त्याच्यामागे कॅमेरे सोडले जातात. घटना नाट्यपूर्ण पद्धतीने दाखवण्यामुळे प्रेक्षक वाहिनीला खिळून राहतो. त्यामुळे घटनेची चिकित्सा संपली. वृत्तपत्रे थोड्याफार प्रमाणात ती करतात. मात्र वाहिन्यांचा प्रभाव वृत्तपत्रांवरही पडतो. दिसतेय तेच सत्य असे अनेकांना वाटू लागते. 

- राज्यातल्या या खेळात वर म्हटलेले १७ ते २० प्रभावी चेहरे आहेत. ही मंडळी रोज घटना घडवण्याच्या खेळात वाहिन्यांना साहाय्यभूत ठरतात किंवा काही वेळा वाहिनीचे प्रतिनिधी अमुक एका नेत्याने काय केले तर अधिक दर्शक आकर्षित होतील, ते करवून घेतात. यामुळे सामान्य बकुबाच्या काही मंडळींनी टीव्हीचा पडदा दिवस दिवसभर व्यापलेला दिसतो. केतकी चितळे किंवा कंगना रनाैत ही त्याची ताजी उदाहरणे आहेत.

कोरोना काळात आपण सारेच चार भिंतीत कोंडले गेले होतो. अगदी शेजारच्या घरातही डोकावण्याची सोय नव्हती.  सोशल मीडिया हाच आपला सांगाती झाला होता. त्याच काळात ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामवर गर्दी वाढली. त्या एकाकी संकटात सोशल मीडियाने आपल्याला आधार दिला. फेसबुक असो की इन्स्टाग्राम येथे एखाद्या अभिनेत्रीच्या छायाचित्रावर किंवा एखाद्याच्या पोस्टवर तुम्ही रेंगाळलात तर त्याच व्यक्तीचे छायाचित्र, पोस्ट तुम्हाला दिसत राहते. युट्यूबवरही तेच होते. हळूहळू तुमची मनोभूमिका आर्टिफिशअल इंटलिजन्समुळे समजली की, तुमच्या आवडीनिवडीच्या माणसांच्या कम्युनिटीमध्ये तुम्ही ओढले जाता. त्यातून लिबरल-सेक्युलर, कट्टर उजवे वगैरे वैचारिक, जातीय, धार्मिक मंडळींचे व्हॉट्सॲप ग्रुप तयार झाले. त्यावर दिवसभर बरेचदा एकांगी चर्चा होतात. तेच तेच ऐकले की, तेच खरे वाटायला लागते. एकांगी मांडणी करणाऱ्यांना सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. सम्यक व तौलनिक मांडणी करणाऱ्यांना फारसे लाईक्स मिळत नाहीत. शिवराळ भाषेत हल्ला चढवणाऱ्यांची अगदी विरोधकही दखल घेतात. त्यामुळे ‘‘मला शिव्या द्या; पण माझ्याबद्दलच बोला’’ हे इप्सित साध्य होते. 

न सुटणाऱ्या मूलगामी प्रश्नांची चर्चा न होणे हे कुठल्याही सरकारच्या पथ्यावर पडणारे असते. माध्यमांसमोर कमअस्सल मुद्द्यांवरून नौटंकी करणाऱ्यांना परग्रहावर धाडून तरी परिस्थिती सुधारते का, ते पाहायला काय हरकत आहे? sandeep.pradhan@lokmat.com

Web Title: situation in maharashtra and should gamblers be sent to the planet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.