नऊपैकी सहा दिवे विझलेत अन् सातवाही फडफडतोय...!

By Shrimant Mane | Published: November 11, 2023 08:35 AM2023-11-11T08:35:57+5:302023-11-11T08:36:53+5:30

दहा हजार वर्षांत हिमयुग संपल्यानंतर पृथ्वीची तब्येत खालावतच गेली. औद्योगिक क्रांतिपूर्व काळाशी तुलना केली तर पृथ्वीच्या आजारांची परिस्थिती गंभीर आहे.

Six of the nine lights are out and the seventh is also flickering...! | नऊपैकी सहा दिवे विझलेत अन् सातवाही फडफडतोय...!

नऊपैकी सहा दिवे विझलेत अन् सातवाही फडफडतोय...!

- श्रीमंत माने
(संपादक, लोकमत, नागपूर)

दिल्ली-मुंबई महानगरांसह उत्तर व मध्य भारतातील वायुप्रदूषणाच्या बातम्या थरकाप उडविणाऱ्या आहेत. लाखोंचे श्वास कोंडलेत. कोरोना महामारीपेक्षा गंभीर स्थिती आहे. उपाय शोधताना सरकारे मेटाकुटीला आलीत. फटाके, बांधकामांवर बंधने घातली आहेत. वाहनांसाठी सम-विषम प्रणाली अंमलात आलीय. शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या आधीच दिल्या आहेत. धुळीसाठी कृत्रिम पावसाचा उपाय विचारात आहे.  काहीही करा; पण लोकांचे प्राण वाचवा, अशी तंबी सर्वोच्च न्यायालयाने दिली. दिल्ली हे जगातले सर्वाधिक प्रदूषित शहर असून, त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागत आहेत. प्रदूषणामुळे राजधानीतल्या रहिवाशांचे आयुष्य सरासरी बारा वर्षांनी, तिच्याभोवतीच्या शहरांमधील नागरिकांचे आयुष्य अकरा-बारा वर्षांनी, तर मुंबईकरांचे आयुष्यही दहा वर्षांनी कमी होते.  

तथापि, दिवा फडफडत असला तरी अजून तो पूर्णपणे विझलेला नाही. आधीचे असे सहा दिवे मात्र विझलेत. होय, पृथ्वीच्या आरोग्याच्या ठळक नऊपैकी सहा चाचण्यांचा रिपोर्ट चिंताजनक आहे. संशोधनाच्या भाषेत त्यांना प्लॅनेटरी बाउंड्रीज म्हणतात. हवामानबदल, बायोस्फिअर इंटेग्रिटी (यात जैवविविधता आलीच), शुद्ध पेयजल उपलब्धता, जमिनीचा वापर आणि पोषण द्रव्यांमधील प्रदूषण तसेच नॉव्हेल एंटिटीज अर्थात थेट मातेच्या दुधातून अपत्याच्या शरीरात प्रवेश करणारे मायक्रोप्लॅस्टिक तसेच किरणोत्सर्गी कचरा या मानवनिर्मित संकटांनी धोक्याची पातळी कधीच ओलांडली आहे. नऊपैकी सहा चाचण्यांचे निष्कर्ष चिंताजनक असणे म्हणजे रुग्ण व्हेंटिलेटरवरच आहे. दिलासा इतकाच, की प्रिय वसुंधरेच्या आरोग्याची तीन लक्षणे थोडी ठीक आहेत. वायुप्रदूषण, ओसियन ॲसिडिफिकेशन व ओझोन डिप्लेशन या तीन चाचण्यांची स्थिती सध्या अगदीच चिंताजनक नसली तरी निश्चिंत राहण्यासारखीही नाही. 

जगभरातील हजारो अभ्यासकांनी एकत्र येऊन पृथ्वीचे आरोग्य तपासले. त्यासाठी तब्बल दोन हजार अभ्यास केले. या संशोधनाचे निदान सायन्स ॲडव्हान्सेस नियतकालिकात गेल्या सप्टेंबरमध्ये प्रकाशित झाले. डेन्मार्कमधील कोपेनहेगेन विद्यापीठाच्या कॅथरिन रिचर्डसन त्याच्या मुख्य लेखिका आहेत. त्या म्हणतात, नऊपैकी सहा गोष्टींमध्ये नापास असलो तरी सारे काही संपलेले नाही. हे रक्तदाब व हृदयविकाराच्या परस्पर संबंधासारखे आहे. रक्तदाब वाढला की हृदयविकाराचा झटका येतोच असे नाही. परंतु, त्याची शक्यता कैकपटीने वाढते. थोडक्यात, प्रयत्न केले तर विझलेले दिवेही पेटू शकतात. जागतिक तापमान वाढ व ओझोन थरासाठी जग एकत्र येणे आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसणे यातून हेच स्पष्ट होते. 

कारण, बिघडले ते काल-परवाचे नाही. ही दहा हजार वर्षांची प्रक्रिया आहे. हिमयुग संपून होलोसीन युग प्रारंभ झाले तेव्हाच शेतीचा शोध लागला. एकेका टप्प्यावर पृथ्वीची तब्येत खालावत चालली. आजाराच्या कुरबुरी वाढल्या. औद्योगिक क्रांतिपूर्व काळाशी तुलना केली तर या आजारांची परिस्थिती गंभीर आहे. आजारांची कारणे एकमेकांशी निगडित आहेत. हवामान बदल व जैवविविधतेचा ऱ्हास किंवा खतांच्या अतिरेकी वापरातून जमिनीत फॉस्फरस व नायट्रोजनचा मारा, इंधन व खाद्यान्नासाठी प्लान्ट बायोमासचा अतिरेकी वापर, समुद्रात शैवालाचे थर, महासागराच्या काही भागात जीवसृष्टी संपुष्टात येणे, ओसियन डेड झोन तयार होणे, अशी ही दुष्परिणामांची गुंतागुंत आहे.

प्लॅनेटरी बाउंड्रीज नावाची संकल्पना २००९ साली पहिल्यांदा जगापुढे आली. २०१५ च्या अहवालाने जगाला सावधगिरीचा इशारा दिला. यंदा तुलनेसाठी आकडेवारीचा आधार घेतला गेला. अर्थातच थोडा सैल. उदा. पृथ्वीतलावर शेतीला सुरुवात झाली आणि तिच्या माध्यमातून निसर्ग ओरबाडला जाऊ लागला, संसाधनांची होरपळ सुरू झाली तेव्हा हवेत कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण २८० पीपीएम होते. संशोधनासाठी ते ३५० पीपीएम गृहीत धरले. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जगात हे प्रमाण सरासरी ४१९ पीपीएम होते. अर्थात, ही जगाची सरासरी आहे. दिल्ली-मुंबईची स्थिती त्याहून कितीतरी गंभीर आहे. हा सातवा दिवा विझू नये यासाठी आडोसा धरण्याची नितांत गरज आहे. 
 

Web Title: Six of the nine lights are out and the seventh is also flickering...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.