विश्वाचा आकार

By admin | Published: March 14, 2017 11:37 PM2017-03-14T23:37:21+5:302017-03-14T23:37:21+5:30

महाविद्यालयाला नवे प्राचार्य मिळाले़ सुटाबुटात वावरणारे, सुधारणावादी़ त्यांच्या प्रयत्नातून वाङ्मयीन चर्चा, परिसंवाद, पिकनिक, अ‍ॅन्युअल सोशल गॅदरिंग जोरात व्हायला लागले़

Size of the universe | विश्वाचा आकार

विश्वाचा आकार

Next

डॉ. गोविंद काळे
महाविद्यालयाला नवे प्राचार्य मिळाले़ सुटाबुटात वावरणारे, सुधारणावादी़ त्यांच्या प्रयत्नातून वाङ्मयीन चर्चा, परिसंवाद, पिकनिक, अ‍ॅन्युअल सोशल गॅदरिंग जोरात व्हायला लागले़ विद्यार्थीवर्ग खूश़ त्यांनी ‘देव नाही’ या विषयावर गावच्या मंदिरातच व्याख्यान दिले़ तरुण मंडळी एकदम फि दा झाली़ देवाचे अस्तित्व नाकारणारा हा प्राचार्य म्हणजे मोठा क्रांतिवीर ठरला़ मंदिराचा पुजारी व्याख्यान ऐकून धास्तावला़ ज्येष्ठ मंडळी हवालदिल झाली़ साधीभोळी माणसे मनातूनच हादरली़ म्हणे देव नाही!
आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी प्राचार्यांच्या घरी जाण्याचा योग आला़ प्राचार्य चक्क सोवळ्यात, कपाळी भस्माचा पट्टा, अनामिकेमध्ये दर्भाचे पवित्रक़ चर्चा झाली तसे प्राचार्य म्हणाले आलाच आहात तर थोडी खीर घेऊन मग जा़ कारण आज माझ्या वडिलांचे श्राद्ध आहे़ खीर भक्षण करून कडवट चेहऱ्यांनी प्राचार्यांचे घर सोडले़ देव नाही असे व्याख्यान देणारा हा प्राचार्य वडिलांचे श्राद्ध मात्र व्यवस्थित करतो़ त्यांचा दुटप्पी स्वभाव समजल्यामुळे त्यांच्या व्याख्यानाची गर्दी ओसरू लागली़ त्यांची बदली होऊन नवे प्राचार्य त्यांचे जागी रुजू झाले़ ते गुड मॉर्निंगऐवजी नमस्कार म्हणत़ कपाळी अष्टगंध, धार्मिक वृत्तीचे वाटत़ ‘देवाचे अस्तित्व’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले़ संस्कृत भाषेतील असंख्य अवतरणे सांगून त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकले़ मंदिरातही त्यांना व्याख्यानासाठी निमंत्रित केले़ त्यांची लोकप्रियता वाढली़ तरुणाईसुद्धा त्यांच्या व्याख्यानाला गर्दी करू लागली़ गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून एका रविवारी पुष्पगुच्छ घेऊन प्राचार्यांच्या भेटीसाठी गेलो़ प्राचार्य उठले नव्हते़ खोलीतील दर्प सोसवत नव्हता़ प्राचार्य आल्यावर त्यांच्या पायावर डोके टेकवून पुष्पगुच्छ अर्पण केला. त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांच्या हातावर चमचा चमचा साखर घातली़ ‘थँक यू’ म्हणून निरोप घेतला़ देवाला न मानणारा वडिलांचे श्राद्ध मनोभावे घालतो आणि देव मानणाऱ्याला गुरुपौर्णिमेचे महत्त्व कळू नये़ हे असे कसे? विद्यार्थ्यांची द्विधा मनोवस्था झाली़ देव आहे का नाही? दोन्ही प्राचार्यांचे एकही भाषण न ऐकलेला माधव म्हणाला, आमच्या शेजारी गंगूबाई नावाच्या वृद्ध बाई राहतात़ त्यांच्याकडे जाऊ़ विद्यार्थ्यांनी गंगूबाईच्या दारात गर्दी केली़ एकाने विचारले - गंगूबाई तुम्ही देवाला मानता का? आम्हाला समजावून सांगा की, गंगूबाई बोलू लागल्या ‘मी फारशी शिकलेली नाही़ बालवाडीला शिकविण्यात माझे आयुष्य गेले’. एक सांगते, ‘तुमच्या मानण्या न मानण्यावर त्याचे अस्तित्व अवलंबून नाही़ तुम्हाला तुमचे डोके आहे का नाही? अरे! हे मानणे न मानणे म्हणजे बुद्धिभेदाचे खेऴ मी थोडी भगवद्गीता अभ्यासली आहे़’ न बुद्धिभेदं जनयेत् अज्ञानां कर्मसंगिनाम्’. बुद्धिभेद होऊ देऊ नका़ चांगला अभ्यास करा़ पास व्हा़ आईवडिलांची सेवा करा़ गरिबांना मदत करा. नसती उठाठेव कशाला रे, विश्वाचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा, मानला तर देव नाही तर दगड़ ’
गंगूबाईच्या रूपात देवच भेटला़

Web Title: Size of the universe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.