थप्पड, चप्पल, दगड आणि तलवारी; राष्ट्रवादीला का नको असेल शिवसेनेची लाठी, भाजपाच्या माथी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 09:22 AM2021-08-27T09:22:40+5:302021-08-27T09:24:58+5:30

what next After Narayan Rane Arrest: राणेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. दोन भगवे पक्ष कट्टर शत्रू बनण्याचे, एकमेकांवर तुटून पडण्याचे हे दिवस आहेत!

Slaps, slippers, stones and swords; Shivsena, Narayan Rane clash is part of plan? | थप्पड, चप्पल, दगड आणि तलवारी; राष्ट्रवादीला का नको असेल शिवसेनेची लाठी, भाजपाच्या माथी

थप्पड, चप्पल, दगड आणि तलवारी; राष्ट्रवादीला का नको असेल शिवसेनेची लाठी, भाजपाच्या माथी

Next

- यदु जोशी, वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या विधानावरून चाललेला राडा थांबायचे नाव घेत नाही. भाजप आणि शिवसेनेत पुन्हा एकदा नव्यानं युतीची बोलणी सुरू झाली होती आणि त्यात खोडा घालण्यासाठी राणेंनी मुद्दाम मिठाचा खडा टाकला, असा एक तर्क दिला जात आहे. भाजप-शिवसेना जवळ येऊ पाहत असताना दोघांना कायमचे दूर करण्यासाठी राष्ट्रवादीनं राणेंच्या अटकेची कळ दाबली, अशी दुसरी मांडणी केली जात आहे. या दोन्हींमध्ये तथ्य नाही. खरे हे की राणेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. भाजप-मार्गे राणे-शिवसेना अशी संघर्षाची नवीन बस सुरू झाली आहे. मुंबई, ठाणे महापालिकेची निवडणूक जवळ येईल तसा हा संघर्ष तीव्र होत जाईल. परवाची घटना ही अपवाद वा अपघात नव्हती हे सिद्ध होत राहील. राज्यातील दोन जुने मित्र, दोन भगवे पक्ष  कट्टर शत्रू बनण्याचे, एकमेकांवर तुटून पडण्याचे हे दिवस आहेत. राष्ट्रवादी अन् काँग्रेस मजा पाहत आहेत. शिवसेनेच्या काठीने भाजपला मार बसला, तर त्यांना का नको असेल? शिवसेनेचा मूळ स्वभाव दबंगगिरीचा आहे आणि त्यांना त्याच पातळीवर जाऊन प्रत्युत्तर देण्याची भाजपची रणनीती दिसते.  

मूळ स्वभाव जात नाही म्हणतात; पण भाजप हा राणेंच्या निमित्ताने स्वत:चा डीएनए बदलायला निघाला आहे. भाजपची मुळे रा. स्व. संघात आहेत. काही वर्षांपूर्वी नागपूर विमानतळाजवळच्या डॉ. हेडगेवार चौकाच्या चबुतऱ्याची विटंबना समाजकंटकांनी केली होती. संघ स्वयंसेवक त्या ठिकाणी गेले; डागडुजी केली, संघाची प्रार्थना म्हटली अन् शांतपणे घरी परतले. संस्कारांचा हा धागा घेऊन आलेल्या भाजपला शिवसेनेशी उघड पंगा घेताना भूमिकेत ‘पॅराडाईम शिफ्ट’ करावा लागेल. तसे करण्याची सर्वच भाजप नेत्यांची मानसिकता आहे का आणि ती कार्यकर्त्यांमध्ये झिरपली आहे का याची खात्री न करताच पुढे गेलात तर माघार घ्यावी लागण्याची शक्यता अधिक. मुंबई-कोकणपुरते शिवसेनेला शिंगावर घ्यायचे, अन् राज्याच्या इतर भागात एरवीचे भाजप धाटणीचे राजकारण करायचे, अशी दुहेरी भूमिकाही आता घेता येणार नाही.  एकदा परतीचे दोर कापले गेल्यानंतर लढल्याशिवाय पर्याय नसतो. राणेंनी भाजपला त्या टप्प्यावर नेऊन ठेवल्याचे दिसते आहे. “राणेंच्या विधानाशी सहमत नाही; पण त्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत,” असे परवा म्हणालात; पण परतीचे दोर कापल्यानंतर पुन्हा तसे म्हणता नाही येणार. 

२०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले; पण त्यांनी असे एकमेकांचे कोथळे बाहेर काढले नव्हते. त्या वेळी शब्दांच्या तर या वेळी प्रत्यक्ष तलवारी परजल्या जात आहेत. शिवसेनेच्याच अंगाने शिवसेनेशी दंगा करण्याची जोखीम देवेंद्र फडणवीस घेत आहेत. राणे निमित्त आहेत; पण शेवटी नेतृत्व हे फडणवीसांचेच आहे. ‘नो रिस्क नो गेन’ म्हणतात. गेल्या वेळी महापालिकेत वेगळे लढत फडणवीसांनी शिवसेनेच्या जवळपास बरोबरीने जागा जिंकून दाखवल्या होत्या. या वेळी शिवसेनेची महापालिकेतील सद्दी संपवून दाखवली तर फडणवीसांसह राज्यातील भाजप नेत्यांचे दिल्लीतील वजन एकदम वाढेल, महाराष्ट्र भाजपला बळ मिळेल आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही फायदा होईल. मात्र, ही जोखीम ‘कांटोें भरी’ आहे. गेल्या वेळी भाजप-शिवसेनेची सत्ता होती; पण सत्तेची सूत्रे भाजपकडे होती. या वेळी शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत आणि भाजप विरोधी पक्षात आहे. ठाकरे हे ठाकरे आहेत. शिवसेना व सत्तेची सूत्रे हाती असलेले उद्धव ठाकरे विरुद्ध केंद्राचा वरदहस्त असलेले विरोधी पक्षनेते फडणवीस असा हा रंगतदार सामना आहे. 

राणेंना शिवसेनेने उगाच मोठे केले, असा एक सूर आहे; पण त्यांच्यापासूनचे धोके शिवसेनेपेक्षा अधिक कोणाला ठाऊक असणार? ते काँग्रेसमध्ये असतानाही शिवसेनेविरुद्ध आग ओकायचे. मात्र, त्यांची भूमिका ही पक्षाची भूमिका असल्याचे काँग्रेसने कधी म्हटले नव्हते. आता ज्या पद्धतीने भाजपकडून त्यांना ताकद दिली जात आहे तशी काँग्रेसकडून कधीही दिली गेली नाही. मुंबईतील हिंदी, गुजराती ही भाजपची हक्काची मतपेढी आहे. कोकणशी नाळ जुळलेल्या मराठी मतदारांचा काहीएक टक्का राणेंच्या माध्यमातून  आपल्याकडे वळविता आला तर ते फायद्याचेच हे भाजपचे साधेसोपे गणित दिसते. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही राणेंची पाठराखण केली आहे. त्यांना मंत्रिमंडळातून काढले जाण्याची शक्यता अजिबात नाही. उलट दिल्लीत त्यांचे गुण वाढले आहेत. कारण, शिवसेना खच्ची व्हावी हे दिल्लीतल्या धरम-वीरना हवेच आहे; पण, राणे दुधारी शस्त्र ठरले तर? कारण, शिवसेनेला डिवचले, की ती आणखी मोठी होते हा आजवरचा अनुभव आहे. 

दोन दिवसांच्या राड्यात शिवसेनेने झलक दाखवली. गेल्या दीडपावणेदोन वर्षांत अशा राडेबाजीला मुकलेल्या शिवसैनिकांना आयती संधी मिळाली. शस्त्रे परजली नाहीत की ती गंजतात तसे त्यांचे झाले होते. पक्षप्रमुखच मुख्यमंत्री असल्याने त्यांना खळ्ळखट्याक् करता येत नव्हते. मात्र, राज्यातील कायदा-सुव्यवस्था स्थितीची जबाबदारी आमची असली तरी शिवसेनेचा म्हणून वेगळा कायदा आहे आणि तो आम्ही वापरू, असा संदेश शिवसेनेने दिला. भाजपनेही प्रत्युत्तर दिले; पण सराव कमी पडला. होईल तो पुढे. आपल्याला कोण अटक करणार? अशा अविर्भावात सकाळी असलेल्या राणेंना रात्री अटक करून ठाकरेंनी मात दिली. न्यायालयात मात्र राणे जिंकले.  यानिमित्ताने दोन भगव्या पक्षांमधील ‘आपसी रंजिश’ उफाळून येईल का, हे येत्या महिनाभरात दिसेल. शिवसेना वा राष्ट्रवादीचे काही नेते केंद्रीय एजन्सींच्या थेट कारवाईच्या टप्प्यात येण्याची शक्यता आहे. वाशिमपासून मुंबई महापालिकेतील कथित घोटाळे रडारवर येऊ शकतात. तिकडे भाजपच्या राज्यातील एका बड्या नेत्याला मकोकामध्ये अडकविण्याचे चालले आहे. त्यासाठीच्या हालचाली पुण्यात सुरू आहेत. आधीच्या सरकारमधील काही फायलीही निघू शकतील. राणे असोत की ठाकरे.. दोघांनीही फक्त म्हटलेल्या पण प्रत्यक्षात न मारलेल्या ‘थप्पड, चप्पल’ची गुंज दूरवर उमटत राहील.
शब्द मोफतच मिळतात, कधीकधी त्यांची किंमत चुकवावी लागते, एवढेच!!

Web Title: Slaps, slippers, stones and swords; Shivsena, Narayan Rane clash is part of plan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.