सुखनिद्रा : तरुण मुलींच्या झोपेची रहस्यं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:43 AM2021-04-16T04:43:08+5:302021-04-16T04:43:44+5:30
Sleep: लहानपणी मुलांच्या आणि मुलींच्या झोपेत फारसा फरक नसतो परंतु पाळी येण्याच्या आसपासच्या वेळापासून मुली आणि मुलांच्या झोपेत फरक पडू लागतो.
यशस्वी जीवनासाठी सम्यक आहार, सम्यक विहार आणि सम्यक निद्रा यांची गरज असते. यात आहार आणि विहार यांच्याबद्दल आजकालच्या तरुण मुलींमध्ये सजगता आहे. परंतु स्वत:च्या झोपेबाबत मात्र नाही. पौगंडावस्थेत पदार्पण करणाऱ्या तरुण मुलींच्या झोपेबाबत आज जाणून घेऊया.
लहानपणी मुलांच्या आणि मुलींच्या झोपेत फारसा फरक नसतो परंतु पाळी येण्याच्या आसपासच्या वेळापासून मुली आणि मुलांच्या झोपेत फरक पडू लागतो. झोपेचे प्रमाण कमी होणे, झोपेमध्ये सारखे व्यत्यय येणे, झोप जास्त सावध होणे आणि दिवसा झोप येणे असे प्रकार तरुण मुलींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. निद्रानाशाचे (इनसोम्नीया) प्रमाण मुलींमध्ये अधिक दिसते.
पौगंडावस्थेत येत असताना शरीरात विशेषत: संप्ररेकातील (हार्मोन्स) बदल हे यामागचे मुख्य कारण! यातील ल्यूटीनाइझिंग हार्मोन आणि मेलाटोनीन ही दोन संप्रेरके रात्री उशिरा स्त्रवली जातात. यामुळे झोप यायला उशीर होऊ शकतो. यामुळेच जाग यायला उशीर होऊ लागतो. काही कारणामुळे लवकर उठायलाच लागत असेल तर त्याचा परिणाम म्हणजे सततचा थकवा.
जितक्या लहान वयात मासिक पाळी सुरु होते तितक्या प्रमाणात दिवसा थकवा येणे, जांभया येणे हे जास्त आढळते. “डिप्रेशन” चे प्रमाण तरुण मुलींमध्ये जास्त असते. बोस्टन विद्यापीठात एक अभ्यास करण्यात आला. झोप आणि वाटणारा ताण (परसिव्हड स्ट्रेस) यांचा संबंध विशेषत: अभ्यासला गेला. त्यात आढळलेल्या काही महत्वाच्या बाबी :
१) बऱ्याचशा तरुणी किमान वेळेपेक्षा (८ तास) सरासरी दोन तास कमीच झोपत होत्या. शैक्षणिक वर्ष सरत गेले, तसतशी झोप कमी होत गेली. २) ऑक्टोबर आणि मार्च या महिन्यात ताण सर्वात जास्त होता, तर झोप कमी होती. ३) जशी झोप जास्त झाली तसा ताण कमी वाटला. ४) मानसिक ताणाचा परिणाम जास्त काळ टिकणारा दिसला.
कमी झोप आणि मानसिक ताणाची वाढ याचे दुष्टचक्र असते. वयात येताना आणखी एक घटना होत असते. ती म्हणजे मुलांच्या झोपेचे घड्याळ आणि सर्वसामान्य समाजाच्या घड्याळात तफावत येऊ लागते. हे झोपेचे घड्याळ म्हणजे काय? त्याबद्दल पुढच्या लेखात.
- डॉ. अभिजित देशपांडे,
(इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेस)
iissreports@gmail.com