संथ प्रवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 12:21 AM2017-10-20T00:21:04+5:302017-10-20T00:21:17+5:30
जलशास्त्र अभियांत्रिकीमध्ये पाण्याचा प्रवाह मुख्यत: दोन भागांत विभागला जातो. एक म्हणजे संथ प्रवाह ज्याला लॅमिनार फ्लो असे म्हणतात. दुसरा प्रवाह म्हणजे प्रक्षुब्ध प्रवाह ज्याला टरबुलंट फ्लो असे म्हणतात. संथ प्रवाह म्हणजे तो लयबद्ध पद्धतीने वाहतो.
प्रा. डॉ. संदीप ताटेवार
जलशास्त्र अभियांत्रिकीमध्ये पाण्याचा प्रवाह मुख्यत: दोन भागांत विभागला जातो. एक म्हणजे संथ प्रवाह ज्याला लॅमिनार फ्लो असे म्हणतात. दुसरा प्रवाह म्हणजे प्रक्षुब्ध प्रवाह ज्याला टरबुलंट फ्लो असे म्हणतात. संथ प्रवाह म्हणजे तो लयबद्ध पद्धतीने वाहतो. पाण्याचा प्रत्येक कण एकामागून एक संथगतीने वाहतो. एका थरातील कण दुसºया थरात जात नाही. थर एकमेकांना समांतर वाहतात. पाण्याचे कण एकमेकांवर आदळत नाहीत. त्यामुळे या प्रवाहाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पाण्याच्या शक्तीचा -हास फारच कमी होतो. याविरुद्ध प्रक्षुब्ध प्रवाहामध्ये पाणी खळखळाट करीत बेधुंद वाहते. पाण्याचा प्रत्येक कण वाटेल त्या दिशेने धावतो व एका थरातून दुस-या थरात जातो. थर एकमेकांना समांतर वाहत नाही. पाण्याचे कण एकमेकांवर आदळतात व टक्कर होऊन वेगाने एकमेकांपासून वेगळे होतात. त्यामुळे या प्रवाहाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पाण्याच्या शक्तीचा -हास जास्त होतो. आपल्या जीवनाचेसुद्धा असेच असते. समाजात काही लोक असतात की ते आपले जीवन शांतपणे, सरळ मार्गाने, दुस-यांना धक्के न देता, दुस-यांशी भांडण-तंटा न करता, दुसºयांना प्रेम, जिव्हाळा, आनंद देत जगत असतात. त्यांच्या शक्तीचा पाण्याच्या संथ प्रवाहाप्रमाणे कमी प्रमाणात -हास होतो. विश्वाला मार्गदर्शन करणारे संत महात्मे, थोर समाजसेवक, जीवनात यशाची उत्तुंग भरारी मारणारे व्यक्ती व विज्ञान जगात नावलौकिक असलेले शास्त्रज्ञ अशा महान व्यक्ती या प्रकारात मोडतात. याविरुद्ध समाजात मोठ्या प्रमाणात लोक असतात की ते सरळ मार्गाने प्रवास करीत नाही. प्रत्येक वेळेस आडमार्गाचा वापर करायचा प्रयत्न करतात, दुस-यांचे पाय ओढून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या शक्तीचा पाण्याच्या प्रक्षुब्ध प्रवाहाप्रमाणे जास्त प्रमाणात -हास होतो. त्यांची मानसिक शक्ती टिकून राहत नाही. भरपूर संपत्ती व धन असते, पण बहुदा मन:शांती नसते. त्यामुळे त्यांच्याकडून विध्वंसक गोष्टी घडून येतात. अत्याचारी, भ्रष्टाचारी, व्यभिचारी, दुर्जन अशा व्यक्ती या प्रकारात मोडतात. म्हणूनच जीवन हे संथ प्रवाहाप्रमाणे आनंद घेत दुस-याला आनंद देत जगायला पाहिजे. शेवटी विकल्प हे आपल्या जवळच असतात, मात्र योग्य वेळी योग्य विकल्प जो निवडतो तोच यश संपादन करीत असतो, तोच परमानंद प्राप्त करून स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त करतो.