धीरे धीरे रे मना...
By admin | Published: September 3, 2016 05:58 AM2016-09-03T05:58:09+5:302016-09-03T05:58:09+5:30
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पांढरीशुभ्र साडी नेसून निघाले होते. अचानक आलेल्या सरीने ओले केले. हातातली पुस्तके भिजली. चपला मातीने माखल्या. अचानक आलेला
- डॉ. सौ. प्रज्ञा आपटे
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पांढरीशुभ्र साडी नेसून निघाले होते. अचानक आलेल्या सरीने ओले केले. हातातली पुस्तके भिजली. चपला मातीने माखल्या. अचानक आलेला पाऊस अचानक थांबला. वाहनांनी वेढलेल्या चौकात सिग्नलमुळे कारही थांबली. कारच्या बंद काचांना नाक लावून हातातले तिरंगे झेंडे दाखवत ४-५ लहान मुले ते विकण्यासाठी गयावया करीत होती. अंगावर लक्तरे, तेलाचा-साबणाचा स्पर्श न झालेले केस, पोट खपाटीला गेलेले. त्यांचे बालपण पाहून मनात कालवाकालव झाली.
ध्वज उभारण्यासाठी जवळच्या मैदानात साफसफाई सुरू झाली होती. संकटांवर मात करत, स्वत:ला घडवत, श्रेयस्कर जगण्याची प्रत्येक माणसाची जी दुर्दम्य इच्छाशक्ती असते त्याचे प्रतीक, चिन्ह म्हणजे हा ध्वज, हे केशवसुतांचे मार्मिक शब्द आहेत.
कुमारी भिकाबाई सोराबजी फ्रेमजी म्हणजेच भिकाबाई सोराबजी कामा या जर्मनीत स्ट्रॅटगार्ड शहरी आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताच्या प्रतिनिधी म्हणून गेल्या होत्या. तिथे व्यासपीठालगत सर्व राष्ट्रांचे ध्वज फडकत होते. लाल केशरी हिरवा असा तिरंगी भारतीय राष्ट्रध्वज त्या जागतिक परिषदेत त्यांनी सर्वप्रथम फडकवला. ध्वजावर वंदेमातरम् हा चैतन्यमंत्रही लिहिला होता. सनदशीर मार्गाने, समाजसुधारणेचा पथ आचरणारे आणि क्रांतिकारक अशा तऱ्हेने तिन्ही मार्गांनी प्राणपणाने स्वातंत्र्य मिळविण्याचे प्रयत्न झाले आणि भारत राष्ट्राचा मानबिंदू असणारा हा ध्वज डौलाने फडकायला लागला. ध्वजावरचा केशरी रंग शौर्याचे, पौर्णिमेच्या चांदण्यासारखा शुभ्रधवल रंग शांतीचे-बंधुभावाचे तर तळाकडील हिरवा रंग श्यामल सुपीक भूमीवर धान्याच्या सुवर्णराशी देणाऱ्या शेतांचे श्रमनिष्ठ शेतकऱ्यांचे प्रतीच. ध्वजाच्या मध्यभागी असणारे अशोकचक्र गतिमान काळाचे प्रतीक आहे. ‘नव्या मनूचा प्रवास याच्या मंगल प्रकाशी’ असा आशावाद आणि आत्मविश्वास कुसुमाग्रजांनी ‘ध्वजगीत’ या कवितेतून व्यक्त केला आहे. गांधीजींनी सुचवल्याप्रमाणे सर्व जात, पंथ, धर्मांच्या एकजुटीचे प्रतीक असणारा आजचा ध्वज पिंगली व्यंकय्या यांनी ३० देशांच्या राष्ट्रध्वजांचा अभ्यास करून तयार केला. डॉ. राजेंद्रप्रसाद आणि समितीने तिरंग्याचे रंग, रचना मान्य करीत चरख्याऐवजी अशोकचक्र निश्चित केले. अहर्निश प्रयत्न आणि पराक्रमाने आपल्या देशाचे उज्ज्वल भवितव्य घडवण्याचा पं. जवाहरलाल नेहरूंनी तेव्हा जनतेच्या वतीने ‘नियतीशी करार’ केला होता. संत कबीरांनी केलेली सूचना देश घडायला शतके अपुरी पडतात हेच सुचवते. ‘धीरे धीरे रे मना, सबकुछ होय। माली सिंचे सौ घडा, ऋतु आये फल होय.’