स्मार्ट पोलिसिंगचा मानवी चेहरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 01:56 AM2018-06-08T01:56:40+5:302018-06-08T01:56:40+5:30
कायदा आणि सुव्यवस्था राखताना समाजातील प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहणेही पोलिसांचे काम असते. पुणे पोलिसांनी ज्येष्ठ नागरिक कक्षाच्या रूपाने हे पाऊल उचलले.
-अविनाश थोरात
कायदा आणि सुव्यवस्था राखताना समाजातील प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहणेही पोलिसांचे काम असते. पुणे पोलिसांनी ज्येष्ठ नागरिक कक्षाच्या रूपाने हे पाऊल उचलले. ‘फेडरेशन आॅफ इंडियन चेम्बर्स आॅफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीज’च्या (फिक्की) वतीने ‘स्मार्ट पोलिसिंग अवॉर्ड २०१८’अंतर्गत पुण्याच्या ज्येष्ठ नागरिक कक्षाला पारितोषिक मिळाले आहे. देशभरातून स्मार्ट पोलिसिंगसाठी एकूण २११ प्रस्ताव आले होते. त्यातून हा गौरव झाला आहे. पुणे पोलिसांकडे ३३० ज्येष्ठांचे अर्ज आले होते. त्यात ३१२ अर्ज निकाली काढून ज्येष्ठांना न्याय मिळवून दिला होता. त्यामुळे हा गौरव झाला. ही सगळी तांत्रिक आकडेवारी झाली. पण ज्येष्ठ नागरिक कक्षाचे काम हे त्यापेक्षाही खूप वेगळे आहे. निवृत्तांचे शहर म्हणून पुण्याची गेल्या अनेक वर्षांपासून ओळख आहे. राज्याच्या सर्व भागांतून नागरिक येथे निवृत्तीनंतरचे जीवन व्यतीत करण्यासाठी येतात. त्याचबरोबर देशातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीची पहिली हाक पुण्यातील तरुणाईने ओळखली. त्यातून मोठ्या प्रमाणात येथील तरुण परदेशात नोकरीच्या निमित्ताने स्थिरावला. पण त्यातून सामाजिक पातळीवर ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न निर्माण झाला. ही मंडळी आर्थिकदृष्ट्या सधन; परंतु एकटेपणाने वेढलेली. कुणीतरी आपल्याशी बोलावे, गप्पा माराव्यात, आपले फक्त ऐकून घ्यावे यासाठी आसुसलेली. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक कक्षाकडे अनेकदा रात्री-अपरात्रीही फोन येतात. पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी तातडीने पोहोचल्यावर त्याने फक्त गप्पा माराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करतात. अगदी या अपेक्षाही पूर्ण करण्याची मानसिकता ज्येष्ठ नागरिक कक्षातील पोलीस कर्मचाऱ्यांची तयारीने केली गेली. केवळ तक्रार आणि त्यानंतर तक्रारीचा निपटारा यामध्ये न अडकता सामाजिक पातळीवर ज्येष्ठांना आधार देण्याचे काम केले, हे खरे वेगळेपण. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांच्या नावावरील स्वकमाईची मालमत्ता हडप करणे, आई-वडिलांना घराबाहेर काढणे, जेवण्यास वेळेवर न देणे, औषधपाणी न करणे आदींसारख्या अनेक तक्रारी ज्येष्ठ नागरिक करत असतात. दररोज किमान तीन ते चार तक्रारी येत असतात. या तक्रारींकडे नेहमीच्या दंडुकेशाहीने पाहून चालत नाही. संवेदनशीलतेने त्याची उकल करावी लागते. आत्मीयतेने लक्ष देऊन नातेवाईकांना आवश्यक ते समुपदेशन करण्यात येते. सुमारे दीड वर्षांपासून पुण्यात हा उपक्रम सुरू आहे. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी त्याकडे विशेषत्वाने लक्ष दिले. ज्येष्ठ नागरिक संघांसोबत विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने अनेक कार्यशाळा घेतल्या. ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पोलीस ठाण्याच्या स्तरावरही अधिकारी-कर्मचारी नेमले. अगदी साध्या साध्या गोष्टींतून ज्येष्ठांना जगण्याची ऊर्जा मिळावी, यासाठी प्रयत्न केले. त्यातील एक उपक्रम म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसाची आठवण ठेवून त्यांना शुभेच्छा देणे. यातून अनेक ज्येष्ठांचे पोलीस कर्मचाºयांशी ऋणानुबंध निर्माण झाले आहेत.
ज्येष्ठांच्या मानसिकतेचा वेध घेणाºया प्रसिद्ध नटसम्राट नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर म्हणतात, ‘‘एक बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरलेत आणि दुसºया बाजूला ज्यानं आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरलास. मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणाकरा आम्ही जायचं तरी कुठे?’’ पुणे पोलिसांच्या ज्येष्ठ नागरिक कक्षाने या प्रश्नाचे किमान एका पातळीवर उत्तर दिले आहे, हे निश्चित!